सुवर्णा खांडगेपाटील : navimumbailive.com@gmail.com
नाईकांनी पक्ष बदली करण्याबाबत कार्यकर्ते, पदाधिकारी आग्रही
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांना जेमतेम अडीच महिन्याचा कालावधी राहीलेला असताना नवी मुंबईतील ऐरोली व बेलापुर विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींमध्ये मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गतविधानसभा निवडणूकीत शिवसेना-भाजप स्वबळावर लढली असली तरी बेलापुर भाजप व ऐरोली शिवसेना लढण्याची शक्यता निश्चित मानली जात आहे. लोकसभा निवडणूकीमध्ये महायुतीचा मतपेटीत चौखुर उधळलेला वारू पाहता गणेश नाईकांनी पक्ष बदलीचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा याबाबत राष्ट्रवादीच्या अंर्तगत गटातून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा दबाव वाढू लागला आहे.
गणेश नाईकांनी आपण राष्ट्रवादीतूनच विधानसभा निवडणूक बेलापुरातून लढविणार असल्याचे जाहिर केले असले तरी अखेरच्या क्षणी नाईक पक्ष बदली करण्याची चर्चा नवी मुंबईच्या राजकारणात जोर धरू लागली आहे. लोकसभा निवडणूकीत ऐरोलीत ४२ हजाराची पिछाडी व बेलापुरात ३९ हजाराची पिछाडी पाहता राजकीय भवितव्यासाठी नाईकांनी भाजप नाहीतर शिवसेना प्रवेशाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच नगरसेवकांचाही अंर्तगत दबाव वाढीस लागला आहे. गणेश नाईक लवकरच शिवसेना अथवा भाजपात प्रवेश करणार असल्याच्या पैंजाही आता झडू लागल्या आहेत.
निवडणूका जवळ येवू लागल्याने राजकारणात वेगवेगळ्या अफवांनाही उधान आले आहे. जागावाटपाबाबत शिवसेना-भाजपात कोणतीही चर्चा झालेली नसताना बेलापुर शिवसेनेला व ऐरोली भाजपला दिल्याच्या चर्चांनाही उधान आले आहे. राजकारणातील चावडीवर महायुतीचे बेलापुरातून शिवसेनेचे विजय नाहटा तर ऐरोलीतून भाजपचे ममित चौगुले लढणार असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक ममित चौगुले हे शिवसेना नगरसेवक असून त्यांनी भाजपात अद्यापि प्रवेश केलेला नाही. नरेंद्र पाटील यांच्या नावाची ऐरोलीतून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा पूर्वी होती, पण ही चर्चा आता पूर्णपणे थंडावली आहे. आमदार मंदाताई म्हात्रे यांचे समर्थक मात्र चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत बेलापुरातून भाजपच्या मंदाताई म्हात्रे याच उमेदवार असणार व त्याच पुन्हा दणदणीत मतांनी विजयी होणार असल्याचे सांगत आहेत. तथापि पालिकेतील नगरसेवक व राजकीय पक्षाचे पदाधिकारी मंदाताईंना भाजप विधान परिषद अथवा सिडको महामंडळ देवून पुर्नवसन करण्याची शक्यता वर्तवित आहेत. निवडणूक जवळ येवू लागल्याने नाईकांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. गणेश नाईक, आमदार संदीप नाईक याबाबत कोणतेही भाष्य करत नसले तरी राजकीय घडामोडी व रागरंग पाहता गणेश नाईकांनी भाजप प्रवेश करावा असे आता सर्वसामान्य नवी मुंबईकरांकडून बोलले जावू लागले आहे. नाईक भाजपात आल्यास पनवेलपाठोपाठ नवी मुंबई मनपावरही भाजपचे कमळ फडकण्याचा आशावाद भाजपच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.