सुवर्णा खांडगेपाटील : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : शिवसेना-भाजपा युतीची जोरदार हवा पाहता नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांमध्येही अस्वस्थता वाढीस लागली आहे. लोकसभा निवडणूकीत नवी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसला असलेली ८२ हजाराची पिछाडी व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधूनच निवडणूक लढविण्याची गणेश नाईकांची ठाम भूमिका पाहता महापालिकेतील राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांना आपल्या राजकीय अस्तित्वासाठी अचानक कमळाच्या प्रेमाचा उमाळा फुटला आहे. त्यात नगरसेवकांसोबत पालिकेत महत्वपूर्ण पदे उपभोगणाऱ्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांमध्ये गेल्या काही महिन्यापासून अंर्तगत पातळीवर धुसफुस आहे. आपण पुन्हा राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून येणे शक्य नसल्याचे गृहीत धरून राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी भाजपसह शिवसेना प्रवेशाचीही तयारी सुरू केली आहे. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे तर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक असल्याचे बोलले जात आहे. प्रवेश करायचा असेल तर विधानसभा निवडणूकीपूर्वीच करा अन्यथा निवडणूकीनंतर प्रवेशाबाबत विचार केला जाणार जाणार नसल्याचा ‘डोस’ ही महायुतीच्या नेत्यांकडून राष्ट्रवादीच्या संबंधित नगरसेवकांना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणूकीत नाईकांनी भूमिका बदलल्यास आपली राजकीय अडचण होवू नये यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक नगरसेवक ‘वेट अॅण्ड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादीत राहून पालिका निवडणूकीत तिकिट मिळणार नसल्याचे पाहून कार्यकर्ते व पदाधिकारी शिवसेना-भाजपच्या नेतेमंडळींशी संपर्क करू लागली आहेत. त्यातच नेरूळ रेल्वे स्टेशनवरील दुसऱ्या मजल्यावरील भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयात राष्ट्रवादीच्या काही घटकांचा राबता अलिकडच्या काळात वाढीस लागला असून त्यांना नवी मुंबईचे गिरीश महाजन या नावाने संबोधले जात आहे. राष्ट्रवादीपाठोपाठ कॉंग्रेसचे नगरसेवक तसेच शिवसेनेच्या अंर्तगत गटबाजीला कंटाळलेले नगरसेवकही भाजपच्या संपर्कात असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.