स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com
मुंबई : राज्यात आणि महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या भाजप शिवसेनेच्या भ्रष्ट कारभारामुळे मुंबई शहर असुरक्षित झाले असून रोज घडणा-या दुर्घटनांमध्ये निष्पाप मुंबईकरांचे जीव जात आहेत. शिवसेना भाजपने मुंबईकरांना मृत्यूच्या दारात उभे केले आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
मुंबई वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना आ. थोरात म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई शिवसेना भाजपच्या गलथानपणामुळे आणि भ्रष्ट कारभारामुळे दुर्घटनांची राजधानी झाली आहे. रोज विविध दुर्घटनांमध्ये निष्पाप मुंबईकरांचे बळी जात आहेत. याला शिवसेना भाजपचा भ्रष्ट कारभार जबाबदार आहे. राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराला पाठीशी घालून मुंबईकरांना मृत्यूच्या दारात उभे केले आहे. मुंबईकरांच्या जीवावर उठलेल्या पालिकेच्या भ्रष्ट अधिका-यांवर कडक करावाई करावी अशी मागणी आ. थोरात यांनी केली.
कालच मुंबईमध्ये एका रहिवाशी इमारतीला लागलेल्या आगीत एका मृत्यू झाला होता तर दोन जण जखमी झाले आहेत. मुंबई शहरात दररोज आगीच्या घटना घडत असताना महापालिकेचा अग्निशमन विभाग काय करत आहे? हा खरा प्रश्न आहे. दुर्घटना घडल्यानंतर इमरातीचे फायर ऑडीट करण्याच्या चर्चा होतात पण पुढे काहीच होत नाही. चेंगराचेंगरीत, उघड्या गटारात वाहून गेल्याने, पूल कोसळणे, झाडं कोसळणे अशा विविध घटनांमध्ये मुंबईकर नागरिक मारले जात आहेत. पण महापालिकेतील सत्ताधा-यांना सर्वसामान्य मुंबईकरांच्या जीवाचे मोल राहिले नाही हे दुर्देव आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.