स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे भाजप-शिवसेनेवर टीकास्त्र
मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष देण्याऐवजी भाजप-शिवसेना हे दोन्ही सत्ताधारी पक्ष ‘मुख्यमंत्री तुमचा की आमचा’ याच वादात व्यस्त आहेत. ‘मुख्यमंत्री तुमचा की आमचा’च्या साठमारीत शेतकरी मात्र पोरका झालाय, याची त्यांनी अजिबात फिकीर नसल्याचे टीकास्त्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोडले आहे.
राज्यातील सध्याची शेतकऱ्यांची परिस्थिती आणि सरकारच्या भूमिकेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी हे विधान केले. ते म्हणाले की, भाजप महाजनादेश यात्रा काढणार आहे. पण जनतेने २०१४ मध्ये दिलेला जनादेश त्यांना सार्थकी लावता आलेला नाही. आपली कर्तबगारी सिद्ध करता आलेली नाही. ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ असे विचारण्याची वेळ त्यांनी आणून ठेवली आहे. दुसरीकडे शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली आहे. आशीर्वाद हा नेहमी चांगल्या गोष्टींसाठी दिला जातो.‘स्टंट-इव्हेंट’ करून लोकांची दिशाभूल, फसवणूक करण्यासाठी आणि आपल्याच भूमिकेवरून घुमजाव करण्यासाठी आशीर्वाद मागायचा नसतो, हे शिवसेनेने लक्षात घेतले पाहिजे. शिवसेनेला पुन्हा आशीर्वाद दिला तर पुढील पाच वर्षसुद्धा ते मागील पाच वर्षांच्या दुतोंडी कारभाराचीच पुनरावृत्ती करतील, हे जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेने कितीही यात्रा काढल्या तरी जनतेवर त्याची ‘मात्रा’ लागू होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, या शब्दांत अशोक चव्हाण यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला.
राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत बोलताना ते म्हणाले की, मागील दोन दिवसांपासून विदर्भ-मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस होत असल्याने सरकार आणि प्रशासन निवांत झालेले दिसते. पाऊस आला म्हणजे शेतकऱ्यांच्या सर्व समस्या संपल्या, असा भ्रम त्यांनी करून आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही. गेल्या ४८ तासात पाऊस कोसळत असला तरी तो सार्वत्रिक नाही आणि पुरेसाही नाही. नांदेडसारख्या जिल्ह्यात काही गावात थोडा फार पाऊस झाला असला तरी बहुतांश गावांमध्ये अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही. परिणामतः पेरणी वाया जाण्याचा आणि पाणी टंचाईचा धोका कायम आहे. विदर्भ-मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अशीच परिस्थिती असल्याचेही अशोक चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.
नांदेड जिल्ह्याच्या भोकर, मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यात अनुक्रमे सरासरीच्या केवळ १५.१०, २४.९५ आणि १६.२५ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे या तीनही तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागते आहे. जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही. दुबार आणि तिबार पेरणी करुन सुद्धा पिकांची उगवण झाली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक टंचाईत सापडला आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या नजर आणेवारीची वाट न पाहता नांदेड जिल्ह्यातील या तीन तालुक्यांमध्ये तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आ.सौ. अमिता चव्हाण, काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर आदींच्या शिष्टमंडळाने आजच केली आहे. पशूधन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना चारा उपलब्ध करुन द्यावा, गावकर्यांच्या मागणीनुसार टँकर उपलब्ध करुन द्यावेत, दुबार आणि तिबार पेरणी करुन अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत आणि शेतकर्यांना हेक्टरी २५ हजारांची आर्थिक मदत करावी, अशी या शिष्टमंडळाची मागणी असून, त्यावर सरकारने तातडीने घेतला पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पुढे म्हणाले.