स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकाच्या रुग्णालयात काम करणार्या सफाई कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम ठेकेदाराने अजून पर्यत खात्यात जमा न केल्याने वाशी मधील महापालिका प्रथम संदर्भ रुग्णालयातील सफाई कामगारांनी ‘समाज समता कामगार संघ’च्या झेंड्याखाली 22 जुलै रोजी उपोषण आंदोलन केले. तसेच भविष्य निर्वाह निधी लवकरात लवकर खात्यात जमा न केल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशाराही सफाई कामगारांनी दिला आहे.
नवी मुंबई महापालिकाच्या अखत्यारित वाशी, ऐरोली, नेरूळ, बेलापूर येथील रूग्णालयांमार्फत नवी मुंबईतील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याच काम करण्यात येते. महापालिकाच्या आरोग्य सेवेचा आधीच बोजवारा उडाला असून त्यात आता सफाई कामगारांनी तथाकथित ठेकेदार आणि प्रशासन विरोधात उपोषणाचे हत्यार उपसल्याने रुग्णालयीन सेवा कोलमडली आहे.
सफाई ठेकेदार भारत विकास ग्रुप यांनी कामगारांच्या भविष्य निधीचे पैसे भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा केले नाहीत. त्यामुळे कामगारांना भविष्य निर्वाह निधी मिळवण्यास अडचणी येत आहेत. ज्या कामगारांचे अपघाती मृत्यु झाले आहे, त्या कामगारांना अजुनही भविष्य निर्वाह निधी आणि ई.एस.आय.सी.चे फायदे मिळाले नाहीत. त्यामुळे या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी तात्काळ देण्यात यावा. तसेच भविष्य निर्वाह निधी खात्यावर जमा ने केल्याने या ठेकेदाराची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या कामगारांनी केली आहे.
तसेच महापालिकाच्या धोरणानुसार रूग्णालयातील सफाई कामगारांकडून बहुउद्देशीय कामगार म्हणून सर्व प्रकारची कामे करून घेतली जातात. परंतु, प्रत्यक्षात वेतन मात्र सफाई कामगारांचे दिले जाते. त्यामुळे रूग्णालयातील बहुउद्देशीय कामगारांना महापालिकाच्या धारेणानुसार अर्धकुशल श्रेणी प्रमाणे वेतन मिळावे. अन्यथा सफाई कर्मचारी म्हणूनच काम करून घ्यावे, अशीही या कामगारांची मागणी आहे.
याशिवाय जून 2018 ते जून 2019 या कालावधीसाठी घोषित विशेष राहणीमान भत्ता त्वरित लागू करून थकबाकीची रक्कम अदा करावी. यासह इतर मागण्यांसाठी 22 जुलै रोजी ‘समाज समता कामगार संघ’च्या माध्यमातून प्रथम संदर्भ रूग्णालय वाशी येथे सफाई कामगारांच्या वतीने आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. तसेच सदरचे आंदोलन मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे घेतले जाणार नाही. अन्यथा काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ‘समाज समता कामगार संघ’चे सरचिटणीस मंगेश लाड यांनी यावेळी दिला.