सुवर्णा खांडगेपाटील : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागात आरोग्य सहाय्यक पदावर महिला व पुरूष काम करत आहेत. समान कामाला समान न्याय ही पालिका प्रशासनाची भूमिका असतानाही दुर्देवाने ही भूमिका केवळ कागदावर राहीलेली आहे. एकाच पदावर काम करणाऱ्या महिला व पुरूषांच्या वेतनात असलेली कमालीची तफावत ही संतापजनक बाब असून महिला कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी असल्याचे सांगत ही तफावत दूर करून त्यांना पुरूष कर्मचाऱ्यांइतकेच वेतन देण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
या महिला कर्मचारी महापालिका प्रशासनातील आरोग्य विभागात १९९३ पासून सहाय्यक परिचारिका परिचर्या म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतर १० वर्षांनी म्हणजेच २००३ साली आरोग्य सहाय्यक महिला या पदाच्या पदोन्नतीकरीता प्रशिक्षणासाठी ऑक्टोबर २००३ ते मार्च २००४ या सहा महिन्याच्या कालावधीकरिता मुंबईतील ‘कामा हॉस्पिटल’ येथे पाठविण्यात आले. तत्पूर्वी प्रशिक्षणाला जाण्यापूर्वी या महिला कर्मचाऱ्यांना प्रशक्षिण झाल्याबरोबर पदोन्नती देण्याचा ठरावही पालिका प्रशासनात मंजुर करण्यात आला होता. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावरही तब्बल २ वर्षांनी या महिलांना पदोन्नती देण्यात आली. त्यावेळी पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे ४५००-१२५-७००० ही वेतनश्रेणी देण्यात आली. वास्तविक पाहता ७ ते १० वर्षात या महिलांना प्रशासनाने पदोन्नती देणे आवश्यक असताना दहा वर्षांनी प्रशिक्षणाला पाठवून त्यानंतर दोन वर्षांनी पदोन्नती देण्यात आली. त्यानंतर १२ वर्षांनी आश्वासीत प्रगती योजना प्रशासनाने लागू केली. तथापि प्रशासनाकडून झालेल्या लालफितीच्या कारभारामुळे महिला कर्मचाऱ्यांचे आजवर मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. याबाबत संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविषयी प्रशासनाला वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना न्याय मिळालेला नाही. नागरी आरोग्य केंद्रात महिलांसोबत पुरूष कर्मचारीही कार्यरत आहेत. महिलांचे त्यांच्यापेक्षा शिक्षण व अनुभव जास्त असतानाही वेतनाबाबत दुजाभाव होत आहे. महिलांना ५२००-२०२०० प्रमाणे तर पुरूषांना ९३०० ते ३४८०० प्रमाणे वेतन दिले जात आहे. वास्तविक पुरूषांपेक्षा महिला कर्मचाऱ्यांना अधिक काम देण्यात येत आहे. मग वेतनातील तफावत कशासाठी? आजवर महिला कर्मचाऱ्यांसाठी अन्याय कशासाठी? पाचव्या वेतन आयोगातील तफावत कशासाठी? ही तफावत दूर करून समान वेतनश्रेणी देणे आवश्यक असल्याचे नवी मुंबई इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
यापूर्वीही पावसाळी साहित्याही पुरूष व महिलांंच्या बाबतीतही तफावत आहे. महिला व पुरूष असा दुजाभाव कशासाठी? वेतनश्रेणीतील फरक व पावसाळी साहित्यातही तफावत हा प्रकार गलथान व अक्षम्य असून आपण या प्रकरणाची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. आपण याप्रकरणी महिला कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी केली आहे.