स्वयंम नन्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने श्रीगणेशमूर्तींचे आगमन व विसर्जन सुव्यवस्थित रितीने व्हावे यादृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या निर्देशानुसार अभियांत्रिकी विभागामार्फत रस्ते सुधारणा कामे तातडीने करण्यात आली असून इतरही विभाग आपापली जबाबदारी नेटकेपणाने पार पाडण्यासाठी सज्ज आहेत.
अशाप्रकारे उत्सव कालावधीत शहर स्वच्छतेच्या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत उपआयुक्त श्री. तुषार पवार यांच्या नियंत्रणाखाली विशेष काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये शहरातील अंतर्गत रस्ते, जागा यांच्या नियमित स्वच्छतेविषयी अधिक काळजी घेण्यात येत असून निश्चित केलेल्या वर्दळीच्या रस्त्यांवर सकाळी व रात्री अशी दिवसांतून दोन वेळा काटेकोर सफाई करण्यात येत आहे.
याशिवाय दीड दिवसांपासून अनंत चतुर्दशी पर्यंतच्या सर्व विसर्जनांच्या दिवशी महापालिका क्षेत्रातील 23 विसर्जन स्थळांवर नागरिकांमार्फत श्रीमुर्तींसोबत आणले जाणारे पुष्पमाळा, फुले, दुर्वा, शमी यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे “ओले निर्माल्य” ठेवण्यासाठी स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात आला आहे तसेच तसेच श्रीमुर्तींच्या गळ्यातील कंठी, आभूषणे, सजावटीचे सामान असे “सुके निर्माल्य” ठेवण्यासाठी स्वतंत्र कलश ठेवण्यात आलेला आहे. तरी नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत या वस्तू पाण्यात टाकू नयेत आणि सुके व ओले निर्माल्य त्यासाठी स्वतंत्रपणे ठेवलेल्या वेगवेगळ्या निर्माल्य कलशातच टाकावे असे आवाहन आहे.
23 विसर्जनस्थळांवरील या ओल्या व सुक्या निर्माल्याची वाहतुक करण्यासाठी स्वतंत्र निर्माल्य वाहन व्यवस्था करण्यात आली असून त्याचे पावित्र्य जपत हे निर्माल्य महानगरपालिकेच्या तुर्भे येथील प्रकल्पस्थळी विशेष वाहनाव्दारे वाहून नेले जात आहे. त्यावर खतनिर्मिती प्रक्रिया करण्यात येणार आहे.
या स्वच्छता मोहिमेत स्वयंसेवी संस्थांचाही अत्यंत उत्साही प्रतिसाद लाभत असून यावर्षी अंकुर सामाजिक संस्था यांच्या वतीने चिंचोली तलाव, नेरूळ तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने धारण तलाव कोपरखैरणे या विसर्जन स्थळांवर गणेशोत्सव कालावधीत निर्माल्यापासून खतनिर्मिती प्रकल्प राबविले जाणार आहेत.
त्याचप्रमाणे श्रीमुर्तींसोबत आणली जाणारी फळे, प्रसाद व इतर खाद्य वस्तू यांच्यासाठी सर्व विसर्जनस्थळांवर कॅरेट ठेवण्यात येत असून भाविकांनी आपल्याजवळील खाद्यपदार्थ, फळे कुठेही न टाकता या कॅरेटमध्येच ठेवाव्यात असेही आवाहन आहे. हे खाद्यपदार्थ व फळे ही गरजू मुले व नागरिकांना महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार असून त्याचा योग्य विनीयोग केला जाणार आहे. तरी नागरिकांनी याही बाबतीत सहकार्य करावे असे आवाहन आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये लाभलेले राज्यातील सर्वात स्वच्छ शहराचे मानांकन कायम राखत, देशातील सातव्या क्रमांकाचे मानांकन उंचावून स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये प्रथम तीन क्रमांकात आणण्याचा संकल्प करीत स्वच्छतेसोबतच प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमही प्रभावीपणे राबविली जात आहे. त्यादृष्टीने महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार आठही विभाग कार्यालय क्षेत्रात प्लास्टिक व थर्माकोलमुक्त नवी मुंबई संकल्पनेच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येत आहे.
पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या भूमिकेतून यावर्षी पर्यावरणपूरक (Eco-Friendly) गणेशोत्सव साजरा करणा-या मंडळांना प्रोत्साहन देण्याचे महानगरपालिकेने निश्चित केले असून पारंपारिक ‘नवी मुंबई महापौर सार्वजनिक श्रीगणेश दर्शन स्पर्धे’ मध्येही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणा-या मंडळांना प्राधान्य देण्यात येणार आहे.तरी स्वच्छता व पर्यावरण प्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच प्लास्टिकला पर्यायी कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करावा आणि प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर पूर्णत: बंद करून पर्यावरण स्नेही इकोफ्रेन्डली गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.