जागा न मिळाल्यास नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा राजीनामा देण्याचे दबावतंत्र
मुंबई : एकीकडे शिवसेना-भाजप युती होणार असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात येत असतानाच नवी मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नवी मुंबईतील ऐरोली व बेलापुर या दोन्ही विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेकडून दावा करण्यात आला असून शिवसेनेला जागा न सोडल्यास नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा इशारा देत दबावतंत्र वापरण्यास सुरूवात केली आहे. गणेश नाईक यांच्या भाजपप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील शिवसेना कमालीची आक्रमक झाली असून युती झाल्यास नवी मुंबईतील दोनपैकी एकही जागा शिवसेनेला मिळणार नसल्याची भीती शिवसैनिकांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जावू लागली आहे.
संदीप नाईक यांनी दीड महिन्यापूर्वीच भाजपात प्रवेश केला असून ऐरोली विधानसभा मतदारसंघातून ते यापूर्वी सलग दोन वेळा निवडून आले आहेत. मोदी लाटेतही राष्ट्रवादीकडून लढताना त्यांनी आपला ऐरोलीचा गड राखला होता. बेलापुर मतदारसंघातून भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी झाल्या होत्या. गणेश नाईक हे बुधवारी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर युती झाल्यास शिवसेना आपल्याला एकही मतदारसंघ मिळणार नाही या भीतीने आक्रमक झाली असून रविवार वाशीत शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या बैठकीत स्थानिक शिवसेना पदाधिकारी व नगरसेवकांकडून दोन जागांची मागणी व न मिळाल्यास राजीनाम्याची धमकी देण्यात आली आहे.
शिवसेनेची बैठक झाली असली तरी बैठकीनंतर कोणताही नगरसेवक राजीनामा देणार नसल्याचे शिवसेना पदाधिकारी व नगरसेवकांकडून सांगण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे युतीबाबत घेतील तो निर्णय आपल्याला मान्य राहील. युती झाली तर युतीधर्म पाळायचा आणि युती न झाल्यास स्वबळावर लढायचे असे बैठकीनंतर शिवसेना पदाधिकारी व नगरसेवक खासगीत सांगत असल्याने या बैठक आयोजनातील पडद्यामागील घटकांचा बार फुसकाच ठरला असल्याचे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. बेलापुर विधानसभा लढविण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या एका घटकाच्या महत्वाकांक्षेपायी शिवसेना नेतृत्वावर दबावतंत्र टाकणे योग्य नसल्याचा संतापही व नाराजीही शिवसेना वर्तुळात व्यक्त केला जावू लागला आहे. पालिका निवडणूकीला जेमतेम सहा महिन्याचा कालावधी राहीला आहे. निवडणूक खर्च काढण्यासाठी शेवटचे सहा महिने महत्वाचे असल्याने कोणताही नगरसेवक राजीनामा देण्याचे धाडस दाखविणार नसल्याचे शिवसेना वर्तुळातून सांगण्यात येत आहे.
गणेश नाईकांनी व त्यांच्या समर्थक ५५ नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्यावर भाजपचे संख्याबळ ६१ होत असून शिवसेनेला पूर्वीप्रमाणेच विरोधी पक्षांची भूमिका बजवावी लागणार आहे. आजवर नवी मुंबईच्या राजकारणात दुय्यम भूमिका स्वीकारलेल्या भाजपला गणेश नाईकांमुळे प्रथमच दुय्यम भूमिका सोडावी लागणार आहे. भाजपने दोन्ही जागा लढविल्यास शिवसेनेची अवस्था यापूर्वी नवी मुंबई न लढविणाऱ्या कॉंग्रेससारखी होण्याची भीती काही घटक व्यक्त करत असले तरी पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर दबावतंत्र वापरण्याचे धाडस शिवसेना नगरसेवक व पदाधिकारी दाखविण्याची शक्यता कमी आहे.
ताकद वाढेल त्याची जागा ही शिवसेनेचीच भूमिका
१९९५ साली ठाण्यात शिवसेनेची ताकद वाढल्याचे सांगत भाजपच्या राम कापसेंची जागा शिवसेनेने प्रकाश पराजंपेसाठी मागून घेतली. तोच न्याय आता नवी मुंबईत लागू होत आहे. ऐरोली व बेलापुरात भाजपचे आमदार आहेत. युतीधर्म पाळणे बंधनकारक असल्याने शिवसेनेने १९९५ साली ठाणे लोकसभेबाबत जो पायंडा पाडला, त्याचे अनुकरण करावे. भाजपने आजवर लहान भावाची निमूटपने नवी मुंबईत बजावली आहे. विधानसभा निवडणूकीत भाजपची ताकद वाढल्याने शिवसेनेने आता नवी मुंबईत लहान भावाच्या भूमिकेचा स्वीकार करावे. १९९५ जागा व ताकद हा पायंडा सेनेने पाडला आणि आम्ही केवळ मित्रांनी सांगितलेल्या वाटेवरूनच जात आहोत.
विजय घाटे
महामंत्री, नवी मुंबई भाजप