सुवर्णा खांडगेपाटील
मुंबई : राज्यात राजकारणी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी व्यस्त असतानाच सर्वसामान्यांच्या घरात कांद्याच्या वाढत्या दराने चिंतेचे सावट दिसू लागले आहे. महाराष्ट्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात सडलेला कांदा आणि बाजारात विक्रीसाठी येत असलेल्या कांद्यामध्ये जेमतेम २० टक्केच कांदा चांगला आहे. त्यातच कर्नाटक, गुजरात व मध्यप्रदेशातील कांदा विक्रीसाठी महाराष्ट्रात येणे बंद झाले आहे. या राज्यानांच आता महाराष्ट्रातून कांदा पुरविला जात आहे. नवीन कांदा लागवडही उशिरा झाल्याने येत्या महिनाभरात कांदा किरकोळ बाजारात ‘शंभरी’ गाठणार असल्याचे चित्र आताच निर्माण झाले आहे.
सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा मार्केटमध्ये राज्यातून सरासरी १०० ट्रक कांदा विक्रीसाठी येत आहे. हा कांदा राज्यातील नाशिक, पुणे, नगर या भागातून येत आहे. राज्यात पडलेल्या मुसळधार पावसाचा कांदा उत्पादनावरही फरक पडला आहे. या १०० ट्रक कांद्यामध्ये जेमतेम २० ते २२ ट्रक कांदा चांगल्या दर्जाच असून उर्वरित कांदा हा हलक्या प्रतीचा असल्याची माहिती मार्केटमधील व्यापारी व माजी संचालकअशोक वाळूंज यांनी दिली.
पावसामुळे नवीन कांदा लागवडीस महिनाभर उशिर झाला असल्याने नवीन कांदा बाजारात डिसेंबर महिन्यामध्ये विक्रीला येईल. ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये प्रती क्विंटल २३०० ते २८०० रूपये दराने कांदा विकला जात असून त्या त्या स्थानिक बाजारात ४५ ते ५० रूपयांपर्यत कांदा विकला जात असल्याची माहिती तालुकास्तरीय बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांकडून देण्यात येत आहे.
एकीकडे राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रचाराचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना बाजार समिती आवारात कांदा ६० ते ८० रूपये दराने विकला जाण्याची शक्यता व्यापारी अशोक वाळूंज यांनी व्यक्त केली आहे. स्थानिक बाजारात कांदा शंभर रूपयांपर्यत विकला जाणार असून निवडणूकीत कांदा मतदारांसह उमेदवारांचाही वांदा करण्याची शक्यता आहे.
राज्य सरकार कांदा समस्येवर तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानी कांदा आयातीसाठी प्रयत्न करत असले तरी सध्या भारत-पाकिस्तान या दोन देशांचे चिघळलेले संबंध पाहता पाकिस्तानमधून कांदा आयात होण्याची शक्यता धुसर आहे. ‘एमएमटीसी’ने तब्बल २००० टन कांदा पाकिस्तानातून आयात करण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरी राज्यातील ग्राहकांकडून या कांद्याचा फडशा उडणार आहे. कांदा येत्या महिनाभरात शंभरी गाठणार असल्याने गृहीणींनी घरात कांदा साठवण्याचे ठरविले तरी शक्य होणार नाही. मार्केटमध्ये विक्रीसाठी येणारा कांदा हलक्या प्रतीचा असल्याने तो फार काळ टिकणारा नाही. एकीकडे वरूण राजाने आपल्या रौद्र रूपाने शेतांची हानी करताना बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आणले असताना दुसरीकडे महिन्याभरात कांदा शंभरी गाठताना घरातील महिलांच्या डोळ्यात अश्रू आणणार आहे. कांदा महाग दराने विकला जाण्याच्या शक्येतेने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत असतानाचा शेतकऱ्यांना मात्र महागड्या दराने विकल्या जाणाऱ्या कांद्यामुळे चार पैसे हाती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.