सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : आयुष्यभर काबाडकष्ट करून बॅकेत पैसा ठेवायचा आणि सकाळीच बॅकेचा एसएमएस येतो, बॅक सहा महिन्याकरिता बंद राहणार आहे, अशा वेळी त्या बॅकेत पैसा गुंतवून बसलेल्या सर्वसामान्य गोरगरीबांची काय अवस्था होत असेल. बॅकेच्या समोर जावून तोंड झोडण्याशिवाय व हंबरडा फोडून रडण्याशिवाय अन्य कोणत्याही पर्याय त्या गरीबांपुढे शिल्लक राहत नाही. नेरूळ सेक्टर सहामधील पेट्रोलपंपानजिकच्या पंजाब अॅण्ड महाराष्ट्र (पीएमसी) बॅकेपुढे पहावयास मिळाले. गुंतवणूकदारांचे पडलेले चेहरे आणि बॅक अधिकाऱ्यांची उत्तरे देता देता झालेली हतबलता यामुळे देशातील चित्र काहीही असले तरी नेरूळमधील गोरगरीब ग्राहकांचे व गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे.
नेरूळ सेक्टर सहामधील पेट्रोलपंपानजिकच्या पंजाब अॅण्ड महाराष्ट्र (पीएमसी)बॅकेपुढे गुंतवणूकदारांची सकाळपासून असलेली गर्दी बॅकेत काहीतरी घोटाळा झाला असल्याची शक्यता वर्तविण्यास भाग पाडत होती. पामबीच मार्गावरून ये-जा करणारे वाहनचालकही बॅकेसमोर असलेली गर्दी पाहून वाहने थांबवून चौकशी करत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार बॅकेचे ऑडिट करताना रिर्झव्ह बॅक ऑफ इंडियाला काही प्रमाणात त्रुटी व अस्पष्टता आढळल्याने आरबीआयकडून या बॅकेला नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यामुळे सहा महिन्याकरिता बॅकेचे व्यवहार पूर्णपणे ठप्प करण्यात आले आहे. पंजाब, दिल्ली व महाराष्ट्र अशा तीन ठिकाणी बॅकेच्या १३७ शाखा आहेत.
नेरूळ पश्चिमेकडील गोरगरीब गुंतवणूकदारांना मात्र सकाळी बॅकेचा एसएमएस पाहून हादर बसला. अनेकांनी बॅकेकडे धाव घेताच त्यांना सहा महिन्यात केवळ हजारच रूपये काढता येणार असल्याचे बॅकेकडून सांगण्यात आले. लाखो रूपयांची आयुष्यभराची बचत व सहा महिन्यात हजार रूपये घेवून काय करणार असा संतापही गुंतवणूकदारांकडून व्यक्त करण्यात येत होता. नेरूळ पश्चिममधील असंख्य गृहनिर्माण सोसायटींचीही खाती त्या बॅकेत असून १० लाखापासून ६० लाखापर्यत ठेवी गृहनिर्माण सोसायट्यांच्या त्या बॅकेत आहेत. रविवारी, २९ सप्टेंबर रोजी अनेक सोसायट्यांच्या वार्षिक बैठका (एजीएम) असल्याने अनेक सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पैसेच अडकून पडल्याने सोसायटीअंर्तगत विकासकामांनाही आता आठ ते दहा महिने खिळ बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.बॅकेने ठेवी गोळा करण्यासाठी गुंतवणूकदारांना इतरांच्या तुलनेत अधिक व्याजाचे आमिष दाखविल्याने मोठ्या प्रमाणावर या बॅकेत नेरूळ पश्चिममधील गोरगरीबांनी गुंतवणूकही केली होती. गुंतवणूकदारांचा एक पैसाही बुडणार नसला तरी आरबीआयच्या प्रक्रियेप्रमाणे सहा ते आठ महिन्याचा विलंब पाहता बॅकेतील खातेदारांना किमान दहा महिने तरी मानसिक त्रास सहन करावा लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.