सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूकीसाठीच्या मतदानाला आता अवघ्या २६ दिवसाचा कालावधी राहीलेला आहे. ठाणे जिल्ह्यातील ऐरोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार संदीप नाईकांना इतर संभाव्य उमेदवारांच्या तुलनेत अधिक पाठिंबा असल्याचे पहावयास मिळत आहे. सुशिक्षित मतदारांच्या पाठिंब्यावर, जनसंपर्कावर व १० वर्षात आमदारकीच्या कालावधीत केलेल्या विकासकामांच्या पाठबळावर महाराष्ट्राच्या विधानसभेत संदीप नाईकांचे तिसऱ्यांदा जाणे जवळपास निश्चित मानले जात आहे. मागील दोन वर्षापासूनअधिकाधिक मताधिक्यासाठी संदीप नाईकांचे समर्थक, कार्यकर्ते परिश्रम करत असून नुकताच भाजपात प्रवेश केल्यामुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कुमक मदतीला आल्याने संदीप नाईकांचे पारडे अधिकच जड झाले आहे.
संदीप नाईकांच्या विजयामुळे नवी मुंबईच्या राजकीय सारीपाटावर एक नव्या विक्रमाचीही नोंद केली जाणार आहे. सलग तीन वेळा या नवी मुंबईतून (अगदी जुन्या बेलापुर विधानसभा मतदारसंघातूनही) यापूर्वी विधानसभेत कोणीही निवडून गेलेले नाही. ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व भाजपचे मातब्बर नेतृत्व नवी मुंबईतून चार वेळा आमदार झाले असले तरी १९९० आणि १९९५ नंतर शिवसेनेच्या नवख्या सिताराम भोईरांनी त्यांना २७०० मतांनी पराभूत केले होते. पुन्हा लाखापेक्षा अधिक मतांनी २००४च्या निवडणूकीत सिताराम भोईरांना पराभूत करत पराभवाचे उट्टे काढले होते. २००४ व २००९ नंतर २०१४च्या निवडणूकीत भाजपच्या मंदा म्हात्रेंनी त्यांना १५०० मतांनी पराभूत केले होते. त्यामुळे सलग तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आणण्याचा विक्रम रचण्यासाठी संदीप नाईक व त्यांचे सहकारी जीवाचे रान करू लागले आहेत.
सुशिक्षितांचा ऐरोलीत अन्य पक्षांच्या तुलनेत भाजपकडे कल अधिक आहेत. त्यातच नुकतेच भाजपवासी झालेले संदीप नाईक हे उच्चशिक्षित आहेत आणि राजकारणात दोन दशके वावरूनही स्वच्छ प्रतिमा जपण्यात आजवर संदीप नाईकांना यश आलेले आहे. उच्चशिक्षितपणा, स्वच्छ प्रतिमा आणि केलेली विकासकामे या पाठबळावर संदीप नाईक हे सुशिक्षितांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहेत. २००४ ते २००९ या कालावधीत विधानसभेच्या कामकाजात संदीप नाईकांची १०० टक्के हजेरी होती तर २००९ ते २०१४ या कालावधीत संदीप नाईकांची विधानसभा अधिवेशनाच्या कामकाजात ९८ टक्के हजेरी होती. अंग तापाने फणफणले असताना व शरीरात कमालीचा अशक्तपणा असताना, अगदी उभे राहत नसतानाही शेवटच्या अधिवेशनात संदीप नाईकांनी नवी मुंबईच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लावलेली हजेरी नवी मुंबईकरांना आपला हक्काचा माणूस विधानसभेत संघर्ष करत असल्याचे दाखवून गेली.
ऐरोलीत संदीप नाईकांना प्रामुख्याने शिवसेना-भाजपा युती झाल्यास वंचित आघाडीच्या ख्वॉजामिया पटेल यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे. वंचितचा नव्याने निर्माण झालेला मतदार आणि गेल्या काही वर्षापासून ख्वॉजामियॉ पटेलांचे झोपडपट्टी भागात असलेले कार्य ही बाब काही प्रमाणात संदीप नाईकांच्या अडचणी वाढविण्याची शक्यता आहे. युती न झाल्यास सध्या तरी शिवसेनेकडे संदीप नाईकांशी तुल्यबळ लढत देईल असा उमेदवार शिवसेनेकडे सध्या तरी उपलब्ध नाही. ऐरोलीतून दोन विधानसभा लढविणाऱ्या विजय चौगुलेंना यंदा शिवसेनेकडून विधानसभेची तिकिट मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यांना मागील काही काळात राज्यातील भाजप नेतृत्व देवेंद्र फडणवीसांशी निर्माण झालेले प्रेम आणि महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदावरून सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसची कोंडी करण्यात साडे चार वर्षात आलेले अपयश यामुळे शिवसेना युती न झाल्यास नव्या चेहऱ्याचा शोध घेण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा ऐरोलीतील एक नगरसेवक मागील काही काळापासून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असला तरी शिक्षण, स्वच्छ प्रतिमा, शिवराळ भाषा, पालिका घोटाळे यामुळे प्रचारात शिवसेनेची आणखीनच प्रतिमा मलीन होण्याची भीती ऐरोलीतील काही शिवसेना नगरसेवकांकडून तसेच शिवसैनिकांकडून खासगीत बोलताना व्यक्त केली जात आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे मातब्बर नेतृत्वाचा या मतदारसंघात दुष्काळ असल्याने त्यांचा उमेदवार उभा राहीला तरी वंचितपेक्षा कमी मते त्यांना मिळण्याची शक्यता आहे. निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील रणधुमाळीत ऐरोली विधानसभा मतदारसंघात संदीप नाईकांच्या वाटचालीमध्ये फारसे अडथळे नसल्याचे उघडपणे पहावयास मिळत आहे. संदीप नाईकांवर जीवापाड प्रेम करणारी व त्यांच्यासाठी कधीही काहीही करण्याची तयारी असणारी त्यांची समर्थक मंडळी आम्ही विजयासाठी नाही तर विक्रमी मताधिक्यासाठी जीवाचे रान करत असल्याचे उघडपणे सांगू लागली आहेत.