सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुप्रिमो शरद पवारांनी राजकीय रणधुमाळीत महाराष्ट्राचा कानाकोपरा सध्या पिंजून काढला आहे. त्यांच्या पक्षातील रथ-महारथी भाजपमय होत असताना त्याची कोणतीही खंत न बाळगता ८० वर्षाचा हा योध्दा न डगमगता नव्याने राजकीय सारीपाटावर आपल्या अस्तित्वाची लढाई नव्या उमेदीने लढू लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाज पुन्हा मोठ्या संख्येने शरद पवारांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होवू लागला आहे. त्यातच शरद पवारांवर ईडीने दाखल केलेला गुन्हा व शरद पवारांनी चौकशीसाठी ईडीकडे जाण्याची दाखविलेली तयारी यामुळे शरद पवारांना निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप ईडीमध्ये अडकवू पाहत असल्याची संतापाची भावना महाराष्ट्रातील मराठा व इतर महाराष्ट्रीयन समाजामध्ये निर्माण झालेली आहे. रथी-महारथींनी शरद पवारांना उतारवयात सोडून जाणे आणि सरकारने ईडीमध्ये गोवण्याचा प्रयत्न करणे यामुळे एकीकडे महायुतीच्या हवेला काही प्रमाणात खिळ बसली आहे. राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या मराठा समाजाची नाराजी ओढवून घेणे भाजप शिवसेना महायुतीला परवडणारे नाही. शरद पवारांच्या सक्रियतेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशाच बदलली असून महायुती विरूध्द शरद पवार असाच विधानसभा निवडणूकीच्या राजकीय सारीपाटावर रणसंग्राम आपल्याला आगामी २४ दिवसांमध्ये पहावयास मिळणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमधील रथी-महारथी भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. भाजपच्या छावणीत व त्यानंतर काही प्रमाणात शिवसेनेच्या छावणीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रथी-महारथींनी केलेला प्रवेश हा महायुतीला बळकटी आणणारा व कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाआघाडीला हतबलता आणणारा होता. त्यामुळे महाराष्ट्राची विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक एकतर्फीच होणार असल्याचे चित्र सुरूवातीच्या काळात निर्माण झाले होते. परंतु गुराख्याने गुरे सोडली म्हणून मालकाला गुरे सोडता येत नाही. अर्धलेणी जमीन कसणारा जमीन सोडून गेला म्हणून मूळ शेतकऱ्याला आपली जमिन वाऱ्यावर सोडता येत नाही. त्याच निकषावर ८० च्या वयोमानातील शरद पवारांसारख्या नेतृत्वाला गल्लीबोळात फिरताना महाराष्ट्र पिंजून काढण्याची वेळ आली आणि महाराष्ट्रातील मराठा व इतर समाज हळहळला व त्यातूनच शरद पवारांप्रती सहानुभूतीची लाट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निर्माण होवू लागली.
एकीकडे शरद पवार महाराष्ट्र पिंजत असतानाच दुसरीकडे ईडीने शरद पवारांवर गुन्हा दाखल झाला आणि तेथेच महाराष्ट्रातील जनतेच्या संयम व सहनशीलतेचा खऱ्या अर्थाने अंत झाला. इतरवेळी ईडीचा गुन्हा दाखल झाला असता तर समजण्यासारखे होते. परंतु ऐन निवडणूक काळातच गुन्हा दाखल करताना ईडीने इतका वेळ का घालविला असा प्रश्न आता महाराष्ट्रातल्या जनतेकडून विचारला जावू लागला आहे. एरव्ही राजकारणातील रथी-महारथी ईडीच्या चौकशीचा ससेमिरा आपल्यामागे लागू नये म्हणून भाजपात मोठ्या संख्येने प्रवेश करत आहे, हे चक्रीवादळाप्रमाणे होत असलेले पक्षांतर हे न समजण्याइतपत महाराष्ट्रातील जनता आता दुधखुळी राहीलेली नाही. ईडीच्या नावाने भल्याभल्यांना घाम फुटत असल्याचे व ईडीच्या चौकशीनंतर अनेक राजकीय बोलघेवडे ‘हाताची घडी आणि तोंडावर बोट’ याप्रमाणे चुप्पी साधून शांत झाल्याचे महाराष्ट्रातील जनतेने जवळून पाहिले आहे आणि मुंबईकरांनी अनुभवलेही आहे. परंतु ईडीने गुन्हा दाखल केल्यावर चौकशीला ईडी कधी बोलविणार याची वाट न पाहता शरद पवार स्वत: ईडीच्या कार्यालयात माझी चौकशी करा असे सांगावयास गेले. या ८० वर्षाचा निधड्या छातीचा महाराष्ट्रातील काळ्या मातीचा नेता पक्षातील रथी-महारथी गेल्यावरही डगमगला नाही आणि ईडीने गुन्हा दाखल केल्यावरही खचला नाही. यातून महाराष्ट्रातील जनतेमध्ये पुन्हा एकवार शरद पवारांच्या नेतृत्वाप्रती आकर्षण वाढीस लागले आहे.
महाराष्ट्राच्या शहरी व ग्रामीण भागात शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यात प्रामुख्याने मराठा समाजाचे असलेले प्राबल्य व त्या समाजामध्ये शरद पवारांचे असलेले स्थान याकडे महायुतीला कानाडोळा करून चालणार नाही. सध्या राजकीय सारीपाटावर पुन्हा एकवार शरद पवारांचा बोलबाला सुरू झाला आहे. भाजप व शिवसेनेत नाराज असलेले घटक मोठ्या संख्येने शरद पवारांच्या पर्यायाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वळचणीला जाण्याची भीती आहे. पक्षातील साथीदारांची सोडचिठ्ठी आणि ईडीने नुकतीच शरद पवारांना मारलेली मिठी यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळालेली आहे. मतदान आता अवघ्या २४ दिवसावर आलेले आहे. चलतीच्या काळात राजकीय लाभ उचलायचे आणि पक्षाच्या पडझडीच्या काळात उतारवयातील शरद पवारांना सोडून जायचे यामुळे सोडून गेलेल्या रथी-महारथींबाबत महाराष्ट्रीयन जनतेत विशेषत: मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. पवारांना सोडून गेलेल्या गद्दारांना पाडा आणि मतदान करू नका असे संदेश महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मराठा समाजामध्ये फिरू लागले आहेत. शहरी भागात सर्वभाषिक मतदार असल्याने याचा फारसा प्रभाव पडणार नसला तरी ग्रामीण भागात या संदेशाने उलथापालथ होण्याची शक्यता आहे. शहरी भागात मराठी टक्का कमी असला तरी आपले अस्तित्व दाखवून येण्याइतपत निश्चितच आजही सक्षम आहे. मतदानाला दिवस कमी राहतील, तसा प्रचाराला जोर वाढत जाईल. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात मात्र महायुती विरोधात शरद पवार असेच चित्र आज निर्माण झाले आहे. मराठा समाजाचे शरद पवारांकडे झुकणे महायुतीसाठी धोक्याची घंटा आहे. तुर्तास महाराष्ट्रातील राजकीय सारीपाट शरद पवारमय झालेला आहे. रथीमहारथीच्या जाण्याचे शरद पवारांना मिळालेल्या सहानूभूती ईडीप्रकरणानंतर शरद पवारांच्या जनाधारात वाढ होवू लागली आहे.