सतत अपमानास्पद वागणूक सहन करणाऱ्या माणसाला घरच्या कारभाराचे निर्णय स्वातंत्र्य घेण्याचे अधिकार मिळाल्यावर त्या माणसाची अवस्था नक्कीच ‘आज मै उपर, आसमा निचे’ अशीच होणार. महाराष्ट्र राज्याच्या निवडणूकीचे निकाल लागल्यावर आज तीच अवस्था शिवसेनेची झाली असणार. सत्तेत असूनही भाजपापुढे काहीही चालत नसल्याने शिवसेनेला तोंड दाबून बुक्क्याचा मार खावा लागत असे. त्यातच सत्तेमध्ये भाजपचे धोरण व भाजपचेच तोरण मान्य करण्याची अगतिकता सहन करावी लागली. पण निवडणूक निकालाने चित्र बदलले आहे. स्वबळावर सत्ता स्थापण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या भाजपाचे विमान नक्कीच जमिनीवरआलेले असणार. त्यातच सत्ता स्थापनेत महाआघाडीकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता असल्याने शिवसेनेचा वाघ आता ही संधी नक्कीच सोडणार नाही.
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणूकांचे निकाल लागले. एक्झिट पोलच्या चर्चांचे निवडणूक निकालांनंतर सर्वप्रथम खऱ्या अर्थांने धिंडवडे निघाले. महायुतीला दोनशे ते सव्वा दोनशे जागा देणाऱ्या एक्झिट पोलच्या निकालांवर यापुढे कितपत विश्वास ठेवला जाईल, याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपेक्षेप्रमाणे भाजप-शिवसेना महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या असून जवळपास १६० जागांपर्यत महायुतीने मजल मारली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस या महाआघाडीने अनपेक्षितरित्या मुसंडी मारत ९५ जागांपर्यत मजल मारली. त्यातल्या त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची अर्धशतकी खेळी ही त्यांच्या शरद पवार नामक ‘युवा’ व ‘उमद्या’ खेळाडूच्या परिश्रमाचे यश मानावे लागेल. विशेष म्हणजे या निवडणूकांमध्ये मतदारांनी रथी-महारथींना घरी बसवित लोकशाहीमध्ये मतदाराला मतदारराजा का संबोधले जाते हे दाखवून दिले. मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणविणाऱ्या पंकजा मुंडेंवर पराभूत होण्याची वेळ आली. कॉलर उडवित युवकांची मने जिंकणाऱ्या उदयनराजेंना ८० वर्षाच्या श्रीनिवास पाटलांनी लाखापेक्षा अधिक मतांनी पराभूत केले. भाजपचे मातब्बर नेतृत्व असणाऱ्या एकनाथ खडसेंच्या मुलीला पराभूत व्हावे लागले. शिवसेनेच्या आपसातील वादामुळे मातोश्रीच्या आवारात मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर पराभूत झाले आणि त्या ठिकाणी कॉंग्रेसचा उमेदवार निवडून आला. भायखळ्यातूनही एमआयएमच्या वारिस पठाणांच्या पर्वाची समाप्ती करत शिवसेनेने आपला गड हिसकावून घेतला. किल्ले शिवनेरीचा समावेश असणाऱ्या जुन्नरमध्ये शिवसेना आमदार शरद सोनावणेंना मतदारांनी घरी पाठवत पुन्हा एकदा बेनके पर्वाची पाठराखण केली. २०१४ साली स्वबळावर निवडणूक लढविताना भाजपने १२३ तर शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या. एप्रिल २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील जवळपास २३५ विधानसभा मतदारसंघात महायुतीला आघाडी होती. त्यामुळे या विधानसभा निवडणूकीत महायुतीपुढे महाआघाडीचे नामोनिशाणही शिल्लक राहणार नाही अशी शक्यता सर्वच स्तरातून व्यक्त होत असतानाच शरद पवार नामक लढवय्यांने या शक्यता फोल ठरविल्या. कॉंग्रेसची प्रचारात फारशी हवा नसतानाही जवळपास ४३ जागा जिंकत अजूनही महाराष्ट्रात कॉंग्रेसला जनाधार असल्याचे त्यांनी दाखवून दिले. त्यातच मनसेच्या शरद सोनावणेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शेवटच्या क्षणी विधानसभेत मनसेचा खातेफलक कोरा झाला होता. कल्याणच्या राजू पाटलांनी चमकदार कामगिरी केल्यामुळे मनसेचे खाते उघडण्यास मदत झाली आहे. पश्चिम महाराष्ट्राने कॉंग्रेस-राष्ट्रवादीला साथ दिल्याने महाआघाडीला शतकी मजल मारता आली नाही. महायुतीत निवडणूक लढल्याने गतनिवडणूकीच्या तुलनेत शिवसेना भाजपला २८ ते ३० जागा गमवाव्या लागल्या. बारामतीतून अजित पवारांच्या लक्षवेधी विजयामुळे बारामतीत पवारमुक्त करण्याच्या चंद्रकांत पाटलांच्या वल्गनांना बारामतीकरांनी सुरूंग लावत एकप्रकारे ‘पवारांचा नाद करायचा नाय’ असा इशाराच मतदानातून चंद्रकामत पाटलांना दिला आहे. निवडणूकीपूर्वी स्वबळावर सत्ता आणण्याचे भाजपच्या प्रत्येकाचे स्वप्न होते. किमान स्वबळाच्या जवळपास जावून शिवसेनेवर अवलंबून राहू नये यासाठी भाजपाची धडपड होती. परंतु मतदारांनी वेगळाच कौल दिल्यामुळे किमान पुढची ५ वर्षे तरी भाजपा सेनेला ‘तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ अशी अवस्था सहन करत नांदा सौख्य भरेचा प्रयोग करत सत्ता सांभाळावी लागणार आहे. निवडणूक निकालानंतर शिवसेना वेगळे रूप दाखवू लागल्याने भाजपापुढील आगामी काळात अडचणी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील सरकारमध्ये शिवसेना सत्तेत असली तरी भाजपामागे शिवसेनेची फरफट होत असल्याचे महाराष्ट्राने जवळून पाहिले होते. सत्तेत असूनही महत्वाची खाती नाहीत, निर्णय प्रक्रियेत विश्वासाचे स्थान नाही यामुळे शिवसेनेला पदोपदी अपमान सहन करावे लागले. त्यातूनच शिवसेनेला सत्तेत राहून विरोधकाची भूमिका बजवावी लागली. परंतु आता निवडणूक निकालानंतर शिवसेनेला मागण्याची नाही भाजपला सत्ता हवी असेल तर देण्याची भूमिका वठवावी लागणार आहे. भाजपमुक्त महाराष्ट्र यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याची राजकीय चाल खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्रीपदाबाबतची शिवसेनेची महत्वाकांक्षा मागील काळात लपून राहीलेली नाही. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून मागील काळात शिवसेनेकडून मार्केटींगही करण्यात आली होती. हीच ती योग्य वेळ या शिवसेनेच्या घोषणेची अनेकांनी खिल्लीही उडविली होती. परंतु महाआघाडीचे शतकी संख्याबळाचे बाहेरून पाठबळ मिळाल्यास शिवसेनेला भाजपला लांब ठेवून सत्तासंपादन करण्यास व मुख्यमंत्रीपद मिळविण्यास फारशा अडचणी येणार नाही. अर्थात सर्व काही आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुप्रिमो शरद पवारांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. पवारांच्या निर्णयाला कॉंग्रेसकडूनही अनुमोदन मिळण्यास फारशा अडचणी येणार नाहीत. कारण पवारांनी प्रचारादरम्यान वादळी झंझावात निर्माण केल्याचा कॉंग्रेसला किमान १० ते १५ जागांवर फायदा झाल्याचा कॉंग्रेसचे नेतेही मान्य करू लागले आहेत. आता राजकारणात उलथापालथीला वेग येण्याची शक्यता आहे. भाजपला सर्वाधिक जागा मिळूनही त्यांना शिवसेनेच्या मागण्या जाणून घेण्याशिवाय आणि वेळ पडल्यास मान्य करण्याशिवायही पर्याय राहणार नाही. सत्तेतील समान वाटा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद ही शिवसेनेकडून मागणी पुढे केली जाण्याची शक्यता असून ती मागणी भाजपा मान्य करते अथवा धुडकावून लागते यावर आगामी राजकीय घडामोडी ठरण्याची शक्यता आहे. कर्नाटक पॅटर्नची पुनरावृत्ती महाराष्ट्रात व्हावी अशी इच्छा कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील मातब्बर व्यक्त करू लागले आहेत. अपक्षांमधील अनेक जण भाजप तसेच शिवसेनेच्या संपर्कात आहेत. अपक्षांचा कल हा सत्तेकडे असतो, त्यांची निष्ठा अथवा श्रध्दा ही कोणाशीही बांधिल नसते. त्यामुळे भविष्यात शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्रित सरकार स्थापन केले आणि कॉंग्रेसने त्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला तर हेच अपक्ष शिवसेना-राष्ट्रवादी सरकारमध्ये सामील होण्यासाठी सर्वप्रथम धावपळ करतील. महाराष्ट्रातील राजकारण निवडणूक निकालानंतर ढवळून निघाले आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यास कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नकारघंटा येणार नाही. शिवसेनेशी मिळतेजुळते घेवून सरकार बनवायचे अथवा विरोधात राहायचे हा निर्णय आता भाजपला घ्यावा लागणार आहे. चेंडू भाजपच्या कोर्टात आहे. निवडणूकीपूर्वी कॉंग्रेस व राष्ट्रवादीमधील अनेक रथी महारथी भाजपात गेल्याने महाआघाडीला शिवसेनेला पाठिंबा देवून भाजपाचा राजकीय वचपा काढायची नामी संधी चालून आलेली आहे. अर्थात शिवसेना मैत्रीला जागते अथवा मागील पाच वर्षाच्या मुस्कटदाबीची किंमत वसूल करते यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे.
– संदीप खांडगेपाटील
– दै. नवराष्ट्र
– संपर्क : ८३६९९२४६४६
(साभार : पत्रकार संदीप खांडगेपाटील यांच्या फेसबुक वॉलवरून)