भारतीय क्रिकेट संघाने नुकताच दक्षिण आफ्रिकेविरूध्दची कसोटी सामन्याची मालिका तीन-शून्य अशा फरकाने जिंकली. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने मुसंडी मारत आपले अग्रस्थान कायम ठेवण्याचा प्रयत्न टिकविला आहे. गेल्या दिपावलीपासून या दिपावलीपासून मंगलमय वर्षाचा आढावा घ्यायचा झाल्यास क्रिडा विश्वात भारताची दादागिरी सुरू झालेली आहे,. एकेकाळी केवळ क्रिकेट आणि हॉकी या खेळापुरतीच ओळख सिमित असलेला आपला भारत देश आता विविध खेळांमध्ये आपले अस्तित्वच नव्हे तर प्रभूत्व दाखवू लागला आहे. तथापि सव्वाशे कोटीच्या आसपास लोकसंख्या असलेल्या आपल्या देशातील क्रिडाप्रेम हे त्या त्या स्पर्धेपुरतेच पहावयास मिळते. स्पर्धा संपताच देशवासियांच्या तसेच सत्ताधाऱ्यांच्या आणि प्रशासनाच्या क्रिडाप्रेमाला ओहोटी लागते. मुळातच आपल्या देशाचा जागतिक पातळीवरील क्रिडा लौकीक आजही केवळ ठराविक खेळांपुरताच व ठराविक खेळांडूपुरताच सिमित राहीलेला आहे. खेळाडू बालपणापासून घडविले जावे, विविध क्रिडा स्पर्धात देशाचा नावलौकीक वाढीस लागावा यासाठी गांभीर्याने प्रयत्न केले जात नाहीत. तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, देशपातळीवरील स्पर्धा गांभीर्याने खेळविल्या जात नाहीत. येथे खेळाडू घडविण्यापेक्षा खेळाडूंना व त्यांच्या प्रशिक्षकांना दिले जाणारे पुरस्कार, खेळाडूंना दिले जाणारे मानधन, पुऱस्कार वितरणात झालेला अन्याय यासह अन्य बाबींचीच अधिक चर्चा होत असते. ज्या खेळामध्ये विशिष्ठ खेळाडू चमकतो, त्याच खेळाची चर्चा होते. त्या खेळाडूचा सूर हरवल्यास अथवा वयोमानानुसार त्या खेळाडूने खेळातून निवृत्ती पत्करल्यास पुन्हा त्या खेळाचा फारसा उदोउदो निर्माण होत नाही. टेनिस खेळाने रामनाथन कृष्णनपासून सुरूवात केली. त्यानंतर रमेश कृष्णन, लिएंडर पेस, महेश भूपती आदी खेळाडूंनी आपल्या कामगिरीने टेनिस खेळामध्ये भारताचा दबदबा कायम ठेवला. परंतु पुढे काय? टेनिसपटू घडत आहेत, खेळताना दिसत आहे, पण त्या दर्जाचे खेळाडू का घडत नाही? यावर कोणीही गांभीर्याने प्रयत्न करत नाही. पुढे काही वर्षात दर्जेदार खेळाडू टेनिस खेळामध्ये निर्माण न झाल्यास टेनिसमध्ये भारताचे अस्तित्व संशोधनाचा विषय ठरण्याची शक्यता आहे. विम्बलंडन, फ्रेंच ओपन, डेव्हिस चषक या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची दादागिरी राहीलेली आहे. रामनाथ कृष्णन, रमेश कृष्णन, लिएडर पेस यांनी युवा गटातील विम्बलंडनवर आपले नावही कोरले आहे. लिएडर पेसने तर त्याही पुढे जात दुहेरीतील विम्बलंडनवर आपले नाव कोरले आहे. सानिया मिर्झामुळे महिला टेनिसमुळे भारताचा दबदबा निर्माण झाला. सानियाची लय जाताच महिला टेनिसमध्ये भारत कोठे आहे, याचा शोध घेण्याची वेळ आलेली आहे. तिरदांजीमध्ये आदिवासी समाजाच्या लिंबारामच्या यशाला सलाम करावा लागेल. कोणत्याही सुविधा नसताना तुटलेल्या धनुष्यावर तिरंदाजीच्या जागतिक स्पर्धेत सहभागी झालेल्या लिंबारामने प्रशंसा मिळविली असली तरी देशाच्या क्रिडाक्षेत्रातील उदासिनतेचे धिंडवडे निघाले होते. त्यानंतर नेमबाजी खेळात अभिनव बिंद्रा व अंजली वेदपाठक यांनी आपल्या खेळाच्या जोरावर जागतिक पातळीवर देशाचा नावलौकीक उंचावला आहे. हॉकी खेळामध्ये गेल्या शतकापासून देशाचा नावलौकीक आहे. जागतिक हॉकी स्पर्धेत एकेकाळी भारताची दादागिरी होती. मधल्या काळात हॉकीचा नावलौकीक रसातळाला गेला होता. धनजंय पिल्ले, संदीप सिंग, परगतसिंग अनेक खेळाडूंच्या सांघिक कामगिरीवर हॉकीचे पुन्हा काही प्रमाणात वेगळे अस्तित्व निर्माण झाले. क्रिकेट क्षेत्रात १९८३ पासून भारताचा जो दबदबा होण्यास सुरूवात झाली, तो आजही कायम आहे. आता तर क्रिकेटमध्ये भारत ‘बापमाणूस’ म्हणून गणला जात आहे. केवळ पुरूषच नाही तर महिला क्रिकेटमध्ये भारतीय महिलांनी कर्तृत्वाच्या बळावर नावलौकीक उंचावला आहे. क्रिकेट खेळाइतका दबदबा आपल्या देशाचा अन्य कोणत्याही खेळामध्ये नाही. देशाच्या अर्थसंकल्पात क्रिडा क्षेत्रासाठी राष्ट्रीय तसेच त्या त्या राज्यातील प्रादेशिक अर्थसंकल्पात तरतूद केली जात आहे. मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद होवूनही विविध खेळांमध्ये आजही भारताचे खेळाडू निर्माण होवू नये ही खऱ्या अर्थाने आपल्या देशाची शोकांतिका आहे. क्रिडा खात्यासाठी मोदींनी मागील पंचवार्षिकमध्ये राज्यवर्धनसिंह राठोड हा क्रिडा क्षेत्रातील माणसावर जबाबदारी सोपवूनही पंचवार्षिकमध्ये क्रिडा क्षेत्र व क्रिडा धोरण यामध्ये विशेष फरक पडला नाही. खेळाडूंनी स्वबळावर नावारूपाला यावे, त्यांनी यश मिळवावे, त्यांच्या नावाचा व यशाचा बोलबाला झाल्यावर राज्य व केंद्र सरकारने दखल घ्यावी, त्यांच्यावर आर्थिक पुरस्कारांचा, भेटींचा वर्षाव करावा, या चित्रात आता कोठेतरी बदल झाला पाहिजे. ऑलिम्पक स्पर्धेत आपल्या देशाचा दिसत असलेला खातेफलक अजून किती काळ आपण पाहायचा. कोणत्या तरी खेळाडूने क्वचित कधीतरी कोणत्या तरी खेळात कांस्यपदक मिळवायचे आणि त्याच यशावर आपण समाधान मानत त्या खेळाडूंवर कोट्यावधी रूपयांची उधळण करायची. हे अजून किती दिवस चालणार. आपण खेळाडू घेण्यासाठी परिश्रम कधी घेणार आहोत, विशेष अभियान कधी सुरु करणार आहोत. मुळातच पिक कापण्यासाठी पीक उगवून येणे आवश्यक आहे. कोठेतरी खडकावर पीक उगवून आल्यास त्या यशावर किती दिवस अवलंबून राहायचे. अगदी काही लाख लोकसंख्या असलेल्या देशाला ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण, रौप्य, कांस्य पदके मोठ्या प्रमाणात मिळतात आणि आपल्या देशाचा खातेफलक अनेकदा कोराच असतो. मिळाले तर कधीतरी कांस्यपदक आणि त्यावरच आगामी काही वर्षे आपण समाधान मानायचे. शाळेतील व महाविद्यालयातील क्रिडा शिक्षकांवर आपण खर्च करतो कशासाठी, देशाच्या व राज्याच्या अर्थसंकल्पात क्रिडा विभागासाठी स्वतंत्र तरतूद करतो कशासाठी? खेळाडू घडविण्यासाठीच ना. मग खेळाडू का घडत नाहीत, का घडविले जात नाहीत याचाही तळाशी जावून शोध घेतला पाहिजे. सव्वाशे कोटीचा आपला भारत क्रिडा क्षेत्रातही चमकला पाहिजे यासाठी गंभीरपणे सरकारने पावले न उचलल्यास कदाचित आपले क्रिडा अस्तित्व नजीकच्या काळात गल्लीबोळापुरतेच दिसण्याची भीती निर्माण झालेली आहे.
:- श्रीकांत पिंगळे