सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
पनवेल संघर्ष समितीचे आयुक्त, प्रांताधिकारी, तहसीलदार गटविकास अधिाकार्यांना साकडे
पनवेलः गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूने पनवेल तालुक्यासह शहरी भागात थैमान घातले आहे. खासगी रूग्णालयात डेंग्यूच्या रूग्णांवर खर्चिक उपाय सुरू आहेत. शासकीय आरोग्य यंत्रणा उपचार करण्यास थोटी पडत असल्याने डेंग्यूच्या जीवघेण्या आजारापासून वाचण्यासाठी जनजागृती हाच रामबाण उपाय असल्याने पनवेल महापालिकेने पुढाकार घेवून तातडीने लोकपरिषद बोलवावी, अशी मागणी पनवेल संघर्ष समितीने केली आहे. त्यांनी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. तसेच निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकार्यांना दिल्या आहेत.
स्वच्छ पाण्याच्या गैरसाठ्यातून डेंग्यूच्या डासांची निर्मित्ती होत असल्याने त्याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. घरातील फ्रिज, झाडांच्या कुंड्या, पाण्याच्या टाक्या, सोसायट्यांमधील पाणी साठवणूकीची जागा आदींमध्ये कळत नकळत साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत आहे. त्या डासांपासून डेंग्यू होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सेवाभावी डॉ. गिरीश गुणे यांच्याशी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी संपर्क साधला असता, त्यांनीही पनवेल महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागात फोफावलेल्या डेंग्यूबाबत चिंता व्यक्त केली. डॉ. गुणे हे सध्या मध्य प्रदेशमधील मांडला येथे रोटरीच्या आरोग्य शिबिरासाठी गेले आहेत. मात्र, डेंग्यूच्याविरोधात मोहिम उघडल्यास त्यांनी सक्रीयतेने सहभाग घेण्यास तयारी दर्शविली आहे. औषधोपचारापेक्षा जनजागृतीने डेंग्यूचे उच्चाटन अधिक तीव्रतेने होईल, यावर त्यांचा विश्वास असल्याचे त्यांनी कडू यांना सांगितले.
दर आठवड्याला २५ ते ३० डेंग्यूबाधित रूग्णांची पनवेलच्या विविध रूग्णालयात भर्ती होत असताना दिसते. यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील रूग्णांचा समावेश असल्याने गेल्या दीड महिन्यात एकूण रूग्णांचा आकडा दीडशे ते दोनशेच्या घरात गेल्याने ही चिंताजनक परिस्थिती असल्याचे डॉ. गिरीश गुणे यांनी सांगितले आहे. त्याचा बिमोड करणे हे सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने हितकारक ठरले, असे मत व्यक्त केले.
दरम्यान, आयुुक्त देशमुख यांची भेट घेऊन त्यांना कडू यांनी निवेदन दिले. याबाबत संबंधित खात्याशी बोलून आपण निर्णय घेऊ. सध्या डेंग्यूचे रूग्ण वाढले असले तरी त्यावर उपाययोजना केली जाईल. शिवाय लोकपरिषद बोलविण्यासाठी नियोजन करण्याचे ठरवू, असे त्यांनी कडू यांना सांगितले. सरकारी रूग्णालयात आवश्यक ते उपाय केले जात नाहीत. त्यामुळे खासग रूग्णालयात डेंग्यूंच्या रूग्णांवर खर्चिक उपाय करावे लागत असल्याचे कडू यांनी देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिले.
पनवेलचे प्रांताधिकारी दत्ता नवले, तहसीलदार अमित सानप, गटविकास अधिकारी तेटगुरे आदींना निवेदनाच्या प्रती देवून संयुक्तीक अथवा त्यांच्या पातळीवर डेंग्यूबाबत जनजागृतीसाठी उपाययोजना करण्यासाठी पनवेल संघर्ष समितीने साकडे घातले आहे.
यावेळी कांतीलाल कडू, ऍड. वैशाली बोर्डे, स्वप्निल म्हात्रे व भावेश पाटील उपस्थित होते.