अॅड. महेश जाधव : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : विधानसभा निवडणूकीअगोदर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर नेते व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, संदीप नाईक, संजीव नाईक, सागर नाईक यांच्यासह महापालिकेतील नाईक समर्थक ५० हून अधिक नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. त्यावेळी खिळखिळी झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला खऱ्या अर्थाने सावरण्याचे काम नवी मुंबईतील मतदारांनी केले. फारसे प्रभावी नसणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांना बेलापुर व ऐरोली मिळून नवी मुंबईतून ८५ हजाराहून अधिक मतदान देत नवी मुंबईकरांनी राष्ट्रवादीला येथे अजून जनाधार असल्याचे मतपेटीतून कौल दिला. तथापि विधानसभा निवडणूकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे हे मतदारांना, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनाच काय पोलिसांनाही भेटेनासे झाल्याने नवी मुंबईची राष्ट्रवादी कॉंग्रेस र्निनायकी अवस्थेत वाटचाल करू लागली आहे. स्थानिक नेतृत्व कार्यकर्त्याना व पदाधिकाऱ्यांना उपलब्ध होत नसेल आणि पक्षाची प्रतिमा मलीन होत असेल तर पक्षाच्या नेतृत्वात लवकरात लवकर बदल करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
गणेश नाईकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. त्यापाठोपाठ तीन नगरसेवकांचा अपवाद वगळता नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवकही भाजपात दाखल झाले. अशोक गावडे, सपना गावडे व सानपाड्यातील बोऱ्हाडे परिवार या तीन नगरसेवकांचा अपवाद वगळता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पालिका सभागृहात कोणीही राहीले नाही. या पार्श्वभूमीवर शरद पवारांना मानणारी नवी मुंबईतील जनता , विशेषत: युवा पिढी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मागे काही प्रमाणात ठामपणे उभी राहीली. शरद पवार व सुप्रिया सुळेंच्या भेटीने मरगळ आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला नवसंजीवनी प्राप्त झाली.
विधानसभा निवडणूकीत नवी मुंबईतील दोन्ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने लढविल्या. बेलापुरातून अशोक गावडेंनी ४५ हजाराच्या आसपास तर ऐरोलीतून गणेश शिंदेंनी ३५ हजाराहून अधिक मतदान घेत राष्ट्रवादीचा नवी मुंबईतील जनाधार दाखवून दिला. दोन्ही उमेदवार पडूनही लाखाच्या जवळपास मतदान मिळाल्याने नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यात व शरद पवार समर्थकांत उत्साहाचे वातावरण संचारले.
विधानसभा निवडणूका संपन्न झाल्या, निकालही लागले, अपेक्षेप्रमाणे नवी मुंबईतील ऐरोली व बेलापुर दोन्ही विधानसभा मतदारसंघातून भाजपचेच दोन्ही आमदार निवडून आले. ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर नेते गणेश नाईक हे आपल्या आमदार व माजी खासदार पुत्रांसमवेत तसेच माजी महापौर असलेल्या पुतण्यासह भाजपात दाखल झाले. गणेश नाईकांसोबत नवी मुंबई महानगरपालिकेतील ५० हून अधिक नगरसेवक भाजपात आल्याने नवी मुंबई महानगरपालिकेत १९९५ नंतर प्रथमच भाजपच्या सत्तेचा झेंडा फडकू लागला आहे. नवी मुंबईतील राजकारण्यांना, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, आजी-माजी नगरसेवकांना आता एप्रिल २०२०मध्ये येवू घातलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीचे वेध लागले आहे. अवघ्या पाच-साडे पाच महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणूकीत प्रस्थापितांनी तसेच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांनी जय्यत तयारीही सुरू केलेली आहे.
१९९५ पासून झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाच सार्वत्रिक निवडणूका या एक प्रभाग या निकषावर झालेल्या होत्या. एकाच प्रभागात आपला प्रभाव दाखवून महापालिका सभागृहात जाण्याची संधी प्राप्त होत असे. २०२० ला होणारी महापालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक ही पॅनल तत्वावर होणार आहे. सध्या महापालिकेचे १११ प्रभाग आहेत. त्यात कदाचित पाच-दहा प्रभागांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे पॅनल पध्दतीने निवडणूकीला जावू पाहणाऱ्या प्रस्थापितांना तसेच निवडणूक लढवू पाहणाऱ्या हवशा-नवशा-गवशांना आता प्रभाग रचनेचे वेध लागले आहेत. कोणते चार प्रभाग येतात व त्या चार प्रभागांचे आरक्षण काय पडते याकडे सर्वाचे लक्ष लागून राहीले आहे. आपण सक्षम असून फायदा नाही तर आपल्या पॅनलमध्ये असणाऱ्या शेजारील तीन प्रभागामधील आपल्या पक्षाचेही उमेदवार तितकेच सक्षम व तोलामोलाचे असणे आवश्यक आहे.
पालिका निवडणूकीत शिवसेना-भाजपा युती होण्याची शक्यता विधानसभा निवडणूकीदरम्यान वर्तविली जात असली तरी निवडणूकीत शेवटच्या टप्प्यात जागावाटप व अन्य कारणावरून युती होणार नसल्याची शक्यता शिवसेना-भाजपचे मातब्बर नेतेमंडळीच खासगीमध्ये बोलत आहेत. भाजपचे पूर्वीचे ६ नगरसेवक व दाखल झालेले ५४ नगरसेवक आणि आता कॉंग्रेसच्या ५ नगरसेवकांनी व एका माजी नगरसेवकाने केलेला नुकताच प्रवेश पाहता आताच भाजपला ६६ ते ७० प्रभागात विद्यमान नगरसेवकांना तिकिट द्यावे लागणार आहे. परंतु आता सत्तासुंदरीच्या खेळात मुख्यमंत्रीपदावरून झालेल्या वादामुळे आगामी काही वर्षे शिवसेना-भाजपामधून वादाचा कलगीतुरा कायम आहे.
नवी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसला निश्चितच जनाधार आहे. पण नेतृत्व कुठे आहे. अशोक गावडेंच्या माध्यमातून जे नेतृत्व दिले आहे, ते विधानसभा निवडणूक निकालानंतर श्रीगणेश सोसायटीत सदनिका विक्रीप्रकरणामुळे फरार झाले आहे. न्यायालयात जामिन फेटाळला जात आहे. अशोक गावडेप्रकरणामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची जनसामान्यात प्रतिमा मलीन झालेली आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर सदनिका विक्री प्रकरणात जिल्हाध्यक्ष अशोक गावडे फरार झाल्याने राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हताश झाले आहेत. निवडणूकीत लाखाच्या जवळपास मते घेणारी राष्ट्रवादी कॉंग्रेस महापालिका निवडणूकीचा सामोरी कशी जाणार याचीच चिंता आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याकडून व्यक्त केली जात आहे. फरार असलेल्या अशोक गावडेंना जिल्हाध्यक्ष पदावरून तात्काळ हटवून कोणा प्रामाणिक शरद पवार समर्थकाकडे पक्षाची धुरा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.