अॅड. महेश जाधव : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबईतील राजकारण्यांना, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, आजी-माजी नगरसेवकांना आता एप्रिल २०२०मध्ये येवू घातलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीचे वेध लागले आहे. अवघ्या पाच-साडे पाच महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणूकीत प्रस्थापितांनी तसेच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांनी जय्यत तयारीही सुरू केलेली आहे. राज्यातील बदलत्या घडामोडींचे पडसाद नवी मुंबईच्या राजकीय सारीपाटावरही उमटण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील भाजपाचा प्रभाव कमी करण्यासाठी एप्रिल २०२० मध्ये येवू घातलेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजपाविरोधात महाशिवआघाडी लढण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत भाजपाचा प्रभाव असला तरी खुर्द व बुद्रुकच्या वादात दोन आमदार असतानाही भाजपाला विजय नाहटाच्या रणनीतीपुढे पराभवाचा सामना करावा लागण्याची भीती खुद्द भाजपा कार्यकर्त्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.
१९९५ पासून झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाच सार्वत्रिक निवडणूका या एक प्रभाग या निकषावर झालेल्या होत्या. एकाच प्रभागात आपला प्रभाव दाखवून महापालिका सभागृहात जाण्याची संधी प्राप्त होत असे. २०२० ला होणारी महापालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक ही पॅनल तत्वावर होणार आहे. सध्या महापालिकेचे १११ प्रभाग आहेत. त्यात कदाचित पाच-दहा प्रभागांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे पॅनल पध्दतीने निवडणूकीला जावू पाहणाऱ्या प्रस्थापितांना तसेच निवडणूक लढवू पाहणाऱ्या हवशा-नवशा-गवशांना आता प्रभाग रचनेचे वेध लागले आहेत. कोणते चार प्रभाग येतात व त्या चार प्रभागांचे आरक्षण काय पडते याकडे सर्वाचे लक्ष लागून राहीले आहे. आपण सक्षम असून फायदा नाही तर आपल्या पॅनलमध्ये असणाऱ्या शेजारील तीन प्रभागामधील आपल्या पक्षाचेही उमेदवार तितकेच सक्षम व तोलामोलाचे असणे आवश्यक आहे.
राज्यात राजकारणात सत्तेच्या कलगीतुऱ्यात भाजपा व शिवसेना यात वाद निर्माण झाला आहे. राज्यातील सत्तेत महाशिवआघाडी सत्तेवर येण्याचे संकेत निर्माण झाले आहेत. नवी मुंबईत सध्या लोकनेते गणेश नाईक व सौ. मंदाताई म्हात्रे हे दोन्ही आमदार आहेत. या दोन्ही आमदारांमध्ये असलेले विळ्या भोपळ्याचे नाते उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. विधानसभा निवडणूकीत बेलापुरात गणेश नाईकांनाच तिकिट मिळणार हे सर्वांनीच गृहीत धरले असताना भाजपाने सौ. मंदाताई म्हात्रेंच्या नेतृत्वावर विश्वास दाखवित त्यांना पुन्हा बेलापुरातून उमेदवारी दिली व त्या निवडूनही आल्या. दादांचे तिकिट कापले जावू शकते, तर आपले काय, या विचाराने नाईकांसोबत आलेले नगरसेवकही धास्तावले आहेत. आमदार गणेश नाईक हे सातत्याने सार्वजनिक कार्यक्रमातून माझ्यासोबत आलेल्या नगरसेवकांवर अन्याय होणार नसल्याचे सांगत त्यांना दिलासा देत आहे. परंतु ताई-दादा राजकीय सुंदोपसुंदीत आपले तिकिट कापले जावू नये यासाठी अनेकांनी ‘गौरव’ बंगल्याशी जवळीक ताईच्या चरणी लोटांगण घालण्यासही सुरूवात केली आहे. एकेकाळी क्रिस्टलपुढे उभी राहणारी वाहने आता ‘गौरव’ बंगल्यासभोवताली आढळू लागली आहेत.
विधानसभा निवडणूकीपूर्वी अनेकजण भाजपात आले असले तरी काही नगरसेवकांच्या जनसंपर्क कार्यालयावर अजूनही भाजपचे फलक लागलेले नाहीत. बॅनरवर अजून कमळ तसेच आमदार सौ. मंदाताईचे छायाचित्र दिसत नाही. याचा भडका पालिका निवडणूकीत तिकिट वाटपाच्या वेळी निश्चितच होणार असल्याची चर्चा नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विधानसभा निवडणूकीत शिवसेनेला नवी मुंबईतील दोनपैकी एका विधानसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्याने शिवसैनिक, शिवसेना पदाधिकारी व शिवसेना नगरसेवक आजही संतप्त आहेत. शिवसेना उपनेते विजय नाहटा व त्यांचे समर्थक पालिका निवडणूकीत याचे उट्टे व्याजासह फेडण्यास उत्सूक असल्याची राजकारणात चर्चा आहे. राज्यात सुरू असलेल्या महाशिवआघाडीचा प्रयोग नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत करून नाईकांच्या पर्यायाने भाजपाच्या प्रभावाला सुरूंग लावण्याच्या हालाचाली एव्हाना सुरूही झाल्या आहेत. विधानसभा निवडणूकीत मनसेला चांगला जनाधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पडद्याआड शिवसेनेच्या व युवा सेनेच्या अनेक घटकांनी राष्ट्रवादीला तसेच मनसेला सहानुभूती दाखविल्याचे एव्हाना स्पष्टही झाले आहे.
भाजपाविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, मनसे ही महाशिवआघाडी पालिका निवडणूकीत उतरण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे ४० नगरसेवक आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस फाटाफुटीमुळे हतबल झालेली आहे. मनसेला जनाधार वाढला असला तरी १० नगरसेवक निवडून आणण्याइतपत मनसेकडे मातब्बर उमेदवारही नाही. जे दोन-चार आहेत, त्यांचा पॅनलमध्ये कितपत निभाव लागेल याबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळेच शिवसेना या तीनही पक्षांना सोबत घेवून भाजपाला जेरीस आणणार असल्याचे नवी मुंबईच्या राजकारणात बोलले जात आहे.