सुवर्णा पिंगळे – खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : फेब्रुवारी २०२०मध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपदाच्या निवडणूका होणार असल्याचे जाहिर होताच बाजार समिती आवारातील पाचही मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले आहे. बाजार समिती आवारातील पाचही मार्केटमध्ये यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच निर्विवाद वर्चस्व होते. भाजपने मागील वर्षाच्या काळात बाजार समिती संचालक निवडणूका न घेता बाजार समितीवर प्रशासक लादणे पसंत केले होते. बदलत्या राजकीय घडामोडीत अशोक वाळूंज यांच्यासह बाजार समितीमधील काही मातब्बर भाजपमध्ये दाखल झाले असले तरी व्यापारी वर्गावर अजूनही शरद पवारांचाच प्रभाव आहे. त्यामुळे येवू घातलेल्या बाजार समिती संचालक पदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपची प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याची चर्चा बाजार समिती आवारात रंगू लागली आहे.
बाजार समित्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रभावअसल्याने सहकारातील राष्ट्रवादीचे महत्व संपुष्ठात आणण्यासाठी भाजपने मागील पाच वर्षाच्या काळात जंग जंग पछाडले होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील पाचही मार्केटमध्ये भाजप व शिवसेनेचा फारसा प्रभाव नसल्याने सत्तेच्या काळात भाजपने संचालकपदाच्या निवडणूका घेतल्याच नाहीत. बाजार समिती संचालकपदाच्या आजवरच्या निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच घटक उभे राहत असत. निवडून येणाराही पवार समर्थक असे व पराभूत होणाराही पवार समर्थकच असे.
भाजपने मागील पाच वर्षाच्या काळात बाजार समिती संचालक पदाच्या निवडणूकीत संचालक ठरविण्यासाठी बाजार आवारात कृषी माल घेवून येणाऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला. राज्यातील ३०४ तालुकास्तरीय बाजार समित्यांना हा निकष लागू पडला. परंतु या सर्व तालुकास्तरीय बाजार समित्यांची शिखर बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कृषी मालाच्या बाजारपेठांमध्ये शेतकरी माल घेवून येत नसून हुंडेकरीमार्फत पारंपारिकरित्या कृषी माल विक्रीसाठी येत आहे. मागील काही महिन्यापासून शेतकरी संस्था कृषी माल विक्रीसाठी आणू लागल्या आहेत. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देणे शक्य नव्हते. त्यामुळे बाजार समिती संचालक निवडणूकीत व्यापारी व अ वर्ग खरेदीदारांनाच मतदानाचा अधिकार आहे.
राजकीय प्रवाहात अनेकांनी भाजपच्या छावणीत उडी घेतली आहे. गावापासून ते शहरापर्यत अनेकांनी भाजपमध्ये जाण्यास पसंती देत नव्याने राजकीय श्रीगणेशा भाजपमधून गिरविण्यास सुरूवात केली. कांदा बटाटा मार्केटच्या अशोक वाळूंज यांच्यासह बाजार समिती आवारातील अनेकांना भाजपचे आकर्षण वाढीस लागले. संचालकपदाची निवडणूक अनेक वर्षानी होणार असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार असली तरी भाजप व राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक बाजार समिती आवारातील अस्तित्वासाठी व प्रतिष्ठेसाठी महत्वाची ठरणार आहे.
गणेश नाईक भाजपत गेल्याने बाजार समिती आवारातील अनेक घटक भाजपमय झाले आहे. भाजपच्या बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून बाजार समिती आवारातील घटकांसाठी सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भाजी मार्केटमधील २८५ गाळ्यांचा अतिरक्त भाजी मार्केटचा रखडलेला प्रश्नही आमदार मंदाताई म्हात्रेंमुळेच मार्गी लागला आहे. बाजार समिती संचालक निवडणूकीसाठी व्यापारी व अ वर्ग खरेदीदार यांना मतदानाचा अधिकार आहे. हे अ वर्ग खरेदीदार प्रस्थापितांच्या मर्जीतील आहेत. त्या त्या काळातील तत्कालीन संचालकांनी आपल्या पदाचा वापर करत अ वर्ग खरेदीदार मोठ्या संख्येने बनवित आपली मतपेटी सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. बाजार समितीमधील मातब्बर जरी भाजपत गेले असले तरी व्यापारी व अ वर्ग खरेदीदारांवर शरद पवारांचा प्रभाव आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाला मानणारे अधिकांश घटक असल्याने भाजपमध्ये गेलेल्यांना बाजार समिती निवडणूक जिंकण्यासाठी निकराचा संघर्ष करावा लागणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे हे बाजार समिती आवारातील मोठे प्रस्थ आहे. अनेक वर्षे ते भाजी मार्केटचे संचालक होते. त्यामुळे बाजार समिती संचालक निवडणूकीत शरद पवारांचा प्रभावही निर्णायक ठरणार असल्याने मतदारांची मानसिकता पवारसमर्थकांकडे झुकण्याची शक्यता बाजार समिती आवारात व्यक्त केली जात आहे. बाजार समिती आवारातील घटक स्थंलातरापासून ते आजतागायत मार्केट आवारातील अनेक समस्या सोडविण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घेतला. राज्य सरकार ते केंद्र सरकारपर्यत शरद पवारांनी बाजार आवारातील घटकांसाठी धावपळ केली आहे. बाजार समिती संचालक निवडणूकीत शरद पवारांनी एक भाषण येवून बाजार आवारात केले अथवा पत्रकही प्रकाशित केले तरी बाजार समिती आवारातून भाजपत गेलेल्यांचा उदयनराजे होण्याची शक्यता बाजार आवारातील घटकांकडून व्यक्त केली जात आहे.