नवी मुंबई : सीवूडस येथील गणपतशेठ तांडेल मैदानासमोरील चार रस्त्यावर सर्कल बनवावे कारण सदरच्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. बाजूलाच खेळाचे मैदान असल्यामुळे ये -जा असते. तसेच वाहनधारक कोण कुठे जातो व कोणत्याही दिशेला अचानक वळतो, त्यामुळे बरेचसे अपघात घडतात. तसेच तो रस्ता पुढे मॉल, डी-मार्ट, ज्वेलस ऑफ नवी मुंबई या दिशेने जातात. त्यामुळे त्या रस्त्यावरती दोन चाकी, चार चाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. अनेकदा सर्कल नसल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अशावेळी तिथे वाहतूक पोलिस ही नसतात, त्यामुळे वाहनधारकांच्या मध्ये वाद होतात, तरी वरील सर्व गोष्टींचा विचार करून तात्काळ सर्कल बनवावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सीवूडस विभाग अध्यक्ष अमोल आयवळे यांनी बेलापूर विभाग अधिकाऱ्यांना भेटून व पत्र देऊन केली आहे.
या मागणीची तात्काळ दखल न घेतल्यास विभागातील नागरिक व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषास सामोरे जावे लागेल, व त्यानिमित्ताने बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेची सर्वस्वी जबाबदारी महापालिका अधिकाऱ्याची राहील, असा इशारा आयवळे यांनी यावेळी दिला.
यावेळी उपविभाग अध्यक्ष अप्पासाहेब जाधव, राजू खाडे, शाखा अध्यक्ष संतोष टेकवडे, प्रभाकर सोनावणे, केलास यादव, प्रदुमन हेगडे इत्यादी उपस्थिती होते.