अनंतकुमार गवई
राज ठाकरे आणि भाजप सध्या एकत्र येणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. राजकारणात आणि युध्दात सर्व काही क्षम्य असते असे म्हटले जाते. कोणत्याही क्षणी कोणत्याही घडामोडी होतील, हे कोणीही सांगू शकत नाही. कालचा मित्र आजचा दुश्मन असू शकतो, तर आजचा दुश्मन हा उद्याचा मित्र असू शकतो. देशाच्या राजकारणात हे यापूर्वी नेहमीच पहावयास मिळालेले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हा प्रकार पूर्वी नव्हता. एक नैतिकतेचा मुलामा महाराष्ट्राच्या राजकारणात होता. परंतु विधानसभा निवडणूकीनंतर घडलेल्या घडामोडी पाहिल्यावर महाराष्ट्राला राजकारणाला काहीही वर्ज्य नसल्याचे पहावयास मिळाले. एकेकाळची मैत्री, या मैत्रीचा सुमारे अडीच दशकाचा शिवसेना-भाजप युतीचा प्रवास मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून संपुष्ठात आला. एकेकाळचे हाडवैरी असलेले शिवसेना- कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेसाठी आणि भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या नावाखाली एकत्र आले.
महाराष्ट्रात भाजपला सत्ता गमवावी लागली. त्याहून मोठे शिवसेनेसारखा अडीच दशकापासून एकत्र असलेला मित्रही भाजपला गमवावा लागला. भाजप आणि शिवसेना युती ही हिंदूत्वावर आधारित होती. केवळ हिंदूत्वाच्या मुद्यावर ही मंडळी एकत्र आली, युती झाली, युती फोफावली. केंद्रात व राज्यात सत्तेवरही आली. वाजपेयींच्या व त्यानंतर नरेंद्र मोदींच्या काळात शिवसेना केंद्रात भाजप मंत्रिमंडळात सहभागीही झाली. राज्यातही मार्च १९९५ ते ऑक्टोबर १९९९ या साडे चार वर्षाच्या काळात महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजप सत्तेवर होती. ऑक्टोबर २०१४ ते सप्टेंबर २०१९ या पाच वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीसाच्या काळात शिवसेना-भाजप सत्तेवर होती.
सध्या भाजपकडे आरपीआय तसेच सदाभाऊ खोतांची शेतकरी संघटना यासह काही मित्र पक्ष असले तरी शिवसेनेसारखा भक्कम मित्र गमविणे भाजपला परवडण्यासारखे नाही. त्यामुळे मित्रत्वामध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मनसेचा पर्याय स्विकारणे ही भाजपची अगतिकता होती. मैत्री ही जितकी भाजपला गरज होती, तितकीच किंबहूना त्याहून अधिक गरज मनसेसाठीही होती. महाराष्ट्राच्या राजकारणात स्थापनेपासूनच मनसेने ‘एकला चलो रे’ ही भूमिका स्विकारलेली आहे. मनसेचा स्थापनेनंतर जनाधाराचा जो काही प्रमाणात गगनभेदी आलेख होता. तो आलेख उंचावण्याऐवजी दिवसेंगणिक खालावत चालला आहे. नुकत्याच झालेल्या ऑक्टोबर २०१९च्या विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत सहभागी होवून निवडणूक लढविण्याची मनसेच्या अनेक नेत्यांची इच्छा होती. आघाडीमध्ये मनसेला सहभागी करून घेण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसही आग्रही होती. परंतु आघाडीमध्ये मनसेला सहभागी करून घेण्यास कॉंग्रेसचा मोठा विरोध होता. मनसेने स्थानिक पातळीवर उत्तर भारतीयांविरोधात घेतलेली भूमिका पाहता मनसेला आघाडीत घेतल्यास त्याचा परिणाम कॉंग्रेसचा अन्य राज्यातील ‘व्होट बॅके’वरही झाला असता. कॉंग्रेसची नकाराबाबत आक्रमक भूमिका पाहता राष्ट्रवादीनेही आघाडीत मनसेचा समावेश करून घेण्याचा विषय फारसा ताणला नाही.
घटता जनाधार पाहता राज ठाकरेंनी मनसेला राजकारणात नवा ‘भिडू’ शोधताना भाजपने सुरू केलेल्या पर्यायाच्या चाचपणीचा स्विकार करण्याचा निर्णय घेतला असावा. मनसेला स्थापनेनंतर झालेल्या लोकसभा निवडणूकीत मनसेचा एकही उमेदवार विजयी झाला नसला तरी मनसेच्या उमेदवारांनी सव्वा लाखाच्या आसपास मते घेतल्याने मनसेची महाराष्ट्राच्या राजकारणात तात्काळ दखल घेतली गेली. त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणूकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले. पण यानंतर मनसेच्या जनाधाराला ओहोटी लागली. नाशिक महापालिकेत मनसेला सत्ता मिळाली, पण पुढे ती टिकविता आली नाही. कल्याण-डोंबिवली महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून आले तरी सत्ता मिळविण्यात मनसेला यश आले नाही. मुंबईतही काही नगरसेवक निवडून आले. त्यानंतरच्या निवडणूकीत केवळ ७ नगरसेवक मनसेचे निवडून आले. त्यातले ६ शिवसेनेत गेले. महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदा, पंचायत समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मनसेला आपले अस्तित्व निर्माण करण्यात अपयश आले. ऑक्टोबर २०१४च्या विधानसभा निवडणूकीत जुन्नर विधानसभा मतदारसंघातून मनसेचा शरद सोनवणे हा एकमेव आमदार विजयी झाला होता. नंतर शरद सोनवणेही शिवसेनेत दाखल झाले. ऑक्टोबर २०१९च्या विधानसभा निवडणूकीत मनसेचे संख्याबळ कायम राहीले. जुन्नरमधून मनसेचा आमदार निवडून न येता यंदा कल्याण ग्रामीणमधून मनसेचा एकमेव आमदार राजू पाटील यांच्या रूपाने विजयी झाला. एप्रिल २०१९ ला झालेल्या लोकसभा निवडणूकीत मनसे सहभागीही झाली नव्हती.
ऑक्टोबर २०१९च्या विधानसभा निवडणूकीत निवडून आलेला एकमेव आमदार, सातत्याने घटता जनाधार, कॉंग्रेसच्या दबावामुळे आघाडीत घेण्यास राष्ट्रवादीची हतबलता, एकला चलो रे भूमिकेमुळे राजकारणात पडलेल्या मर्यादा यामुळे राज ठाकरेंनाही राजकारणात प्रबळ मित्राची गरज आहेच, त्यातच भाजपही शिवसेनेच्या तोलामोलाचा ‘भिडू’ शोधत आहेच. त्या पार्श्वभूमीवर मनसे व भाजप एकमेकांना कोणत्याही क्षणी मैत्रीचा हात पुढे करण्याची शक्यता आहे.