मनसेचे महाअधिवेशन २३ जानेवारीला होत आहे. मनसेच्या स्थापनेनंतर हे होत असलेले त्यांचे पहिलेच महा अधिवेशन आहे. ९ मार्च २००६ ला मनसेची स्थापना झाल्यानंतर राजकीय वाटचालीत मनसेने अनेक चढउतार पाहिले. यशाची चव चाखली तर पराभवाची होत असलेली पाठराखणही मनसेचे सातत्याने झेलली आहे. मनसे स्थापनेनंतर मनसेला लोकसभा निवडणूकीत एकही जागा जिंकता आलेली नाही. एप्रिल २००९च्या लोकसभा निवडणूकीत सहभागी झालेल्या मनसेला यश मिळालेल्या नसले तरी मतपेटीतून महाराष्ट्राच्या जनतेने मनसेच्या उमेदवारांना लखपती, सव्वा लखपती बनविले होते.२०१४च्या लोकसभा निवडणूकीत मनसेच्या मतदानात घट झाली. २०१९च्या लोकसभा निवडणूकीत मनसे सहभागी झालीच नाही. २००९च्या विधानसभा निवडणूकीत मनसेचे १३ शिलेदार निवडून आले. २०१४च्या विधानसभा निवडणूकीत जुन्नरमधून शरद सोनवणे निवडून आल्यामुळे तरी मनसेचा खातेफलक कोरा राहीला नाही. २०१९च्या विधानसभा निवडणूकीत २०१४च्याच यशाची पुनरावृत्ती झाली.२०१९ विधानसभा निवडणूकीत मनसेचे कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील हे एकमेव आमदार निवडून आले. मनसेचे निवडणूक चिन्ह रेल्वे इंजिन होते. यशाने साथ सोडल्यावर मनसेच्या इंजिनाच्या तोंडाची दिशाही बदलण्याचा प्रयोग मनसेने करून पाहिला. परंतु यशाने नेहमीप्रमाणे हुलकावणी दिलीच.
मनसेचे महाअधिवेशन २३ जानेवारी रोजी होत आहे. २३ जानेवारी हिंदूहद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस. हिंदूत्वाचा उघडपणे, ज्वलंतरित्या पुरस्कार करणारे पुरस्कर्ते म्हणून बाळासाहेब ठाकरेंचा परिचय उभ्या महाराष्ट्राला नाही तर उभ्या देशाला होता. राज ठाकरेंच्या व्यक्तिगत आयुष्यावरही बाळासाहेब ठाकरेंचा कमालीचा प्रभाव आहे. आपल्या समर्थकांना शिवसेनेत न्याय मिळत नसल्याचे सांगत फेब्रुवारी २००६ मध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. मराठी भाषेचा आणि मराठी भाषिकांचा पुरस्कार करत मनसेने राजकारणात श्रीगणेशा गिरविण्यास सुरूवात केली खरी, पण त्या भूमिकेवर फारसे यश न मिळाल्याने मनसेच्या महाअधिवेशनात मनसेचा झेंडा व ध्येयधोरणे राज ठाकरे बदलणार असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे.
मनसेचे नेते व प्रारंभापासून राज ठाकरे यांच्याशी निष्ठावंत राहीलेले महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांनी चारच दिवसापूर्वी मनसेला कोणाशीही युती करण्याचे बंधन नाही. कोणाबरोबरही युती करण्याचे मनसेला स्वातंत्र्य आहे. २३ जानेवारीच्या महाअधिवेशनात मनसेचा झेंडा, मनसेची भूमिका, मनसेची ध्येयधोरणे नव्याने ठरणार असल्याचे सांगताना मनसे राजकारणात नवीन मित्र शोधत त्याच्याशी घरोबा करणार असल्याचे स्पष्टपणे संकेत बाळा नांदगावकर यांनी दिली आहेत.
त्यातच सोमवार, दि. ७ जानेवारी रोजी भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसेसुप्रिमो राज ठाकरेंची गुप्त बैठक झाल्याने लवकरच भाजप-मनसेमध्ये मैत्री होणार असल्याचे चर्चेला दुजोरा मिळू लागला आहे. शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत महाआघाडीत समाविष्ठ झाल्याने सत्ताकाळात शिवसेनेला काही प्रमाणात कडवट हिंदूत्वाच्या भूमिकेला मर्यादा पडणार आहे. शिवसेनेला सत्ता सांभाळण्यासाठी हिंदूत्वाच्या जहाल भूमिकेला काही प्रमाणात मवाळ करावे लागणार आहे. भाजप व शिवसेना हे दोन्ही हिंदूत्ववादी पक्ष असल्याने २५ वर्षे सत्ता असताना तसेच विरोधात असतानाही केवळ हिंदूत्वाच्या भूमिकेमुळे मैत्रीचा धागा घट्ट विणला गेला होता. सत्तासोपानाचे सुकाणू राखताना कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसला दुखावून मनसेला चालणार नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेला काही अंशी कडवट हिंदूत्वाला बगल द्यावी लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे काम मनसेला करावे लागणार आहे. भाजपकडून नुकत्याच मैत्री करण्याच्या हालचालींना सुरूवात झाल्यामुळे मनसेला आपली भूमिका व्यापक करण्याची संधी अनायसे चालून आली आहे. आजवर मराठी भाषिक व मराठी माणूस या एकमेव मुद्यावर वाटचाल करताना उत्तर भारतीयांवर टीका करून मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांना आता हिंदूत्ववादी भूमिकेचा अंगिकार करावा लागणार आहे.
मनसे व भाजपची मैत्री यापूर्वी कधी झालेली नसली तरी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरूवातीच्या काळात नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी गुजरातेत केलेल्या कामांची तोंड भरून स्तुती केली होती. आता एप्रिल २०१९ साली लोकसभा निवडणूकीत मनसेचा एकही उमेदवार उभा न करता राज ठाकरे यांची सभांचा धुराळा उडविताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर टीकेचा भडीमार केला होता. एप्रिल २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या अगोदर मनसेसुप्रिमो राज ठाकरे यांनी गुजरात राज्याचा दौरा करून तेथील विकासकामांची पाहणी केली होती. त्यानंतर सतत नरेंद्र मोदींवर स्तुतीसमुनांचा वर्षाव करून पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदीच सक्षम असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी एकप्रकारे नरेंद्र मोदी यांचे मार्केटींगच केले होते. परंतु एप्रिल २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत सभांच्या माध्यमांतून राज ठाकरेंनी मोदींवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. राज ठाकरेंना आलेल्या ‘ईडी’च्या नोटीसमुळे मनसे व भाजपमध्ये दरी आणखीनच वाढत गेली. राजकारणात सर्वच क्षम्य असल्याने कोणत्या क्षणी काहीही होवू शकते. भाजप व मनसेत मैत्रीपर्वाच्या पडद्याआडून हालचाली गतीमान झाल्याने मागच्या घटनांवर पांघरून घालण्याचे दोन्ही पक्षांनी ठरविले असावे. बाळा नांदगांवकराचे वक्तव्य, देवेंद्र फडणवीसांची राज ठाकरेंसोबतची भेट, सभांमधून राज ठाकरेंनी मोदींवर टीका केली होती, भाजपवर नाही ही भाजपच्या अन्य नेत्यांची भूमिका पाहता भाजप-मनसे दोस्तीवर कधीही शिक्कामोर्तब होवू शकते. पडद्याआडून मैत्रीसाठी घडामोडी गतीमान झाल्या आहेत, मनसेची ध्येयधोरणे व पक्षाचा झेंडा बदलण्याचे संकेत मनसेच्या नेत्यांकडून दिले जात आहे. भाजपसोबत मैत्री करून हिंदूत्वाची कास धरण्याची मानसिकता मनसे नेत्यांची तयार झाली आहे.महाअधिवेशनात त्याबाबत चित्र स्पष्ट होणार असल्याने भाजपेयींना व मनसैनिकांचे आता मनसेच्या महाअधिवेशनाकडे लक्ष लागून राहीले आहे.
सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com