आदरणीय संदीपजी नाईक यासी,
मी कोण याचा आपणास परिचय करून देण्याची गरज नाही. कारण आजवर शरीराने श्वासाला विचारले नाही की तु कोण? दोघांची जवळीक असते, तोपर्यतच या देहाला किंमत असते. शरीराची व श्वासाची एकदा ताटातूट झाली की त्या शरीरालाही अवघ्या काही सेंकदात ‘बॉडी’ असे संबोधले जाते. इतिहासात छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश असतील अथवा भगवान श्रीकृष्ण व सुदाम्याची मैत्री असेल, दुर्योधन व कर्णाची मैत्री असेल. परंतु जेव्हा कधी पुन्हा एकदा भुतलावर मैत्रीचा इतिहास कोणी लिहावयास घेईल, त्यावेळी त्या इतिहासकाराला आणि इतिहासाच्या पानालाही आपल्यासाठी नक्कीच काही पाने राखून ठेवावी लागतील.
मित्रा, सध्या तुमची काय अवस्था असेल याची कदाचित केवळ आणि केवळ मलाच कल्पना असेल. कारण माई,दादा आणि तुमच्या परिवारापेक्षाही मी तुमच्यावर अधिक प्रेम केले आहे. म्हणूनच इतर कोणापेक्षाही माझा नक्कीच तुमच्यावर अधिकार जास्त आहे, हे खासगीत तुम्हीही कदाचित नाकारणार नाहीत. मी नेहमी लोकांना सांगतो, माझा संदीप नाईक म्हणजे एक अजब रसायन आहे. अमृतमंथनामध्ये विष प्राशन केल्याने भगवान विष्णू आदरणीय ठरले, पण माझा मित्र मात्र राजकीय व सामाजिक क्षेत्रात पावलापावलावर विषाचे पेले पचवित असतानाही चेहऱ्यावर मात्र जगाला हास्यच दाखवित आहे. शरीरात तणावाचे, समस्यांचे आणि येणाऱ्या संकटाचे कल्लोळ चक्री वादळासारखे निर्माण झाले आहे. पण हा माझा मित्र खरोखरीच एक स्थित्यप्रज्ञ आहे. शांत आहे. खरोखरीच बोनकोडेच्या मातीने गेल्या काही शतकात मोठे पुण्य नक्कीच कमविले असणार, त्यामुळेच संदीप नाईकांसारखा शब्दातही वर्णन करता येणार नाही असा हिरा जन्माला घालण्याचे भाग्य बोनकोडेच्या मातीला लाभले असणार. बाळ जन्माला आल्यावर सटवाई पाच दिवसाने येते आणि भविष्य लिहून जाते असे म्हणतात. पण जर हे खरे असेल तर ती सटवाई जर यदाकदाचित माझ्या समोर आलीच तर त्या सटवाईचे तुकडे तुकडे केल्याशिवाय माझे हात व शरीराच्या हालचाली नक्कीच थांवणार नाहीत. सटवाईला मरण्यापूर्वी एकदाच विचारेल, की बाई, माझ्या मित्राने संदीपजी नाईकांनी असे तुझे काय घोडे मारले होते. प्रत्येक गोष्टीची क्षमता, वकूब असतानाही माझ्या मित्राला तु भविष्य लिहीताना ऐन मोक्याच्या क्षणीच का हात आखडता घेतला. एक जनकल्याणसाठी जन्माला आलेला महापुरूष तु का म्हणून अश्वत्थामा ठरविला. तुझ्या चुकीमुळे केवळ माझ्या मित्राच्याच नाही तर आजही आमच्या कपाळातून रक्त भळाभळा वाहत आहे.
माझा मित्र म्हणजे एक परिस आहे, ज्या ज्या लोखंडाला त्याने स्पर्श केला, त्या त्या लोखंडाचे सोन्यात रूपांतर झाले आहे. मित्रा माफ कर, पण एक वाक्य धाडसाने बोलावेच लागेल, की तुमचे मिठ नक्कीच अळणी असणार. ज्यांना ज्यांना नाईक परिवाराने मोठे केले, त्यांनी स्वार्थ साधेपर्यत निष्ठेचे गोडवे गायले. स्वार्थ संपताच, राजकारणात प्रतिकूलता निर्माण होताच तात्काळ छावणी सोडण्याचे धाडस दाखविले. वाशीतील शाळेत शिक्षण घेणारा माझा मित्र दादांनी रा.फ.नाईक शाळा सुरू करताच दादांचाही मुलगा या शाळेत शिक्षण घेतोय हे जगाला समजण्यासाठी संदीपजी नाईकांना बोनकोडेच्या शाळेत यावे लागले. एमबीएपर्यत शिक्षण घेतलेला माझा मित्र एक चांगला क्रिकेटपटू होता. राजकारणात आले नसते तर महाराष्ट्राच्याच नाहीतर देशाच्या क्रिडाक्षेत्रावर हा तारा चमकताना आपणा नवी मुंबईकरांना जवळून पहावयास मिळाला असता. डबघाईस गेलेले उद्योग परिश्रमपूर्वक आणण्याचे कसब संदीपजी नाईकांमध्ये आहे. पक्षाची गरज व घरच्याची हाक म्हणून संदीपजी नाईकांना राजकारणात प्रवेश करावा लागला. यामुळे देशाला एक चांगला क्रिडापटू व भविष्यातील एक चांगला उद्योजक गमवावा लागला. मुळातच हा माणूस राजकारणी नाही. मितभाषी नक्कीच आहे, पण दगाबाज व कपटी नक्कीच नाही. स्पष्टवक्त्या स्वभावामुळे काम होत असेल तर हो सांगतो, नसेल होणार तर का नाही होणार ते नम्रपणे सांगतो. माणसाला झुलवणे ही संदीपजी नाईकांची कालही कार्यप्रणाली नव्हती, आजही नव्हती आणि उद्याही नसणार.
महापालिकेच्या तिसऱ्या सभागृहात गेल्यावर दोन्ही वेळा महापौरपद महिलांसाठी आरक्षित होते. सुरूवातीचे दोन वर्ष इतर नगरसेवकांप्रमाणे स्थायी समिती सदस्य म्हणून काम केल्यावर पुढील तीन वर्षे स्थायी समितीचे सभापती म्हणून काम पाहिले. काही माणसांना खुर्चीमुळे शोभा येते, पण माझ्या मित्रामुळे त्या स्थायी समिती सभापती पदाच्या खुर्चीला शोभा आली. वातानुकुलित कार्यालयात बसून कारभार हाकणे हे संदीप नाईकांना कालही जमले नाही व आजही जमत नाही. प्रभागाप्रभागात ‘सभापती आपल्या अंगणात’ अभियान राबवून नवी मुंबईची पायपीट केली. समस्या जाणून घेतल्या. तळागाळातील लोकांशी सुसंवाद केला. मुसळधार पावसात वाशीतील नाला तुंबलेला असताना गळ्याएवढ्या पाण्यात अंगावरच्या कपड्यानिशी उतरून नाला सफाई करणारे संदीप नाईक नवी मुंबईकरांनी जवळून पाहिले आणि अनुभवले. त्यानंतर विधानसभा मतदारसंघ पुर्नरचनेत नवी मुंबईत दोन विधानसभा मतदारसंघ झाले. २००९ला ऑक्टोबरच्या विधानसभा निवडणूकीत ऐरोली विधानसभा मतदारसंघातून संदीप नाईक आमदार झाले. २००९ ते २०१४ यादरम्यान सभागृहात शंभर टक्के हजेरी, कामकाजात सक्रिय सहभाग, ताराकिंत प्रश्नातून नवी मुंबईकडे सर्व राज्याचे लक्ष वेधण्यात संदीपजी नाईक यशस्वी ठरले. ऑक्टोबर २०१४ विधानसभा निवडणूक. देशाच्या कानाकोपऱ्यात मोदी लाटेने पडझड झालेले. राजकारणात होत्याचे नव्हते झालेले. आजही जे क्रिस्टलला नाईक समर्थक म्हणून बसतात, तेही त्या काळात उघडपणे सांगत होते, दादा कसेही येतील, भाई पडणार. पण आम्हाला खात्री होती की ज्याचे नेहमीच जमिनीवर पाय, जनतेशी जुळलेली नाळ तो आमचा मित्र संदीप नाईक पराभूत होणे शक्यच नव्हते. मतदान संपताच अवघ्या १० मिनिटात सोशल मिडियाच्या माध्यमातून जगाला टाहो फोडून सांगणारा मी एकटाच होतो की उद्यापासून कामे घेवून या, माझा मित्र आठ ते अकरा हजारानी विजयी होतोय आणि घडलेही तसेच. परत सभागृहात हजेरी, कामकाजात सहभाग.
ऑक्टोबर २०१९ची विधानसभा निवडणूक. आमचा मित्र संदीपजी नाईक सलग तिसऱ्यांदा विधानसभेत जाणार म्हणून आम्ही आनंदित होतो. नवी मुंबईत सलग तीनदा जाणारा आमदार म्हणून प्रथमच अशी कामगिरी मित्राच्या नावावर लागणार होती.मित्राच्या विजयाबाबत खात्री होती. पण सटवाईने आपले काम पुन्हा चोख बजावले. मित्राचे २० वर्षाचे राजकारण एकाच रात्रीत संपुष्ठात आले. पद गेले म्हणून निराश होणारा माझा मित्र नाही. नव्या जोमाने कामाला लागला, प्रचारयंत्रणा राबविली आणि ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईकांना विक्रमी मतांनी विजयी करत पुत्राचे कर्तव्य पार पाडले. आजही संदीप नाईकांची जनसेवा सुरुच आहे. त्यात विघ्न पडलेले नाही. कणभर समाजसेवा करून सोशल मिडियावर डोंगराएवढी प्रसिध्दी घेणारे महाभाग आपल्या नवी मुंबईत पावलापावलावर आहेत. पण जनसेवेची प्रसिध्दी हे संदीप नाईकांना आवडत नाही. महाराष्ट्रातील अतिवृष्टी, बळीराजाला मदत, चिखलाने व गाळाने भरलेल्या विहिरीची सफाई यासह गोरगरीबांच्या मुलांना शैक्षणिक हातभार, ग्रामीण भागातील अतिदुर्गम भागातील मुलांची शैक्षणिक जबाबदारी अशी हजारोंनी कामे हा माणूस सतत करत असतो. पण कोणाला सांगत नाही. त्यामुळेच सुर्यप्रकाशाइतके तेज चेहऱ्यावर नेहमी झळकत असते. सदैव राजबिंड्या चेहऱ्यावर स्मित हास्य असते.
नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक आता दोन महिन्यावर आली आहे. सभागृहातील नगरसेवक साथ सोडून इतर ठिकाणी घरोबा करू लागले आहेत. या निवडणूकीत नाईक परिवाराची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. अशा वेळी हा माणूस शांत आहे. विचारांचे वादळ थैमान घालत आहे. जे करायचे ती रणनिती नक्कीच मनात आखली जात आहे. तथापि संपर्कात येणाऱ्या कोणालाही हा माणूस नाराज करत नाही. अरे पण माझा मित्र कोणी देव नाही रे, तुमच्या आमच्यासारखाच हात-पाय असणारा सर्वसामान्य माणूस आहे रे, त्यालाही खासगी आयुष्य आहे, भावभावना आहे हेही लक्षात ठेवा रे. खुप वेगळा आहे रे माझा मित्र. सभोवताली लक्षाधीश असो अथवा करोडपतींचा गराडा असो, नगरसेवकांचे जाळे असो. पण क्रिस्टलला गेल्यावर सर्वप्रथम मित्राचा आवाज येतो आणि आमची भेट सर्वात आधी ठरलेली असते. अनेकदा न सांगता मागे फिरायचे. आपल्या समस्या सांगून त्या सुर्यतेजोमय कपाळावर का चिंतेचे सावट आणायचे म्हणून माघारी फिरायचे, कधी राग अनावर झाला की मनात येईल ते बोलून मोकळे होवून परतायचे, पण गेल्या दोन दशकात या माणसाने कधी आम्हाला दुखावले नाही. मैत्री जपली. स्वत:चे दु:ख मात्र हा माणूस कधी सांगत नाही. पण तोही शेवटी माणूसच. कधी चारपाच शब्दातून आपल्यातील भावनांना वाट मोकळी करून देतो. त्याचवेळी जाणिव होते की महासागरालाही मनामध्ये दाबून ठेवायचे सामर्थ्य आहे माझ्या मित्रांमध्ये.
आगामी दोन महिने मित्रा खडतर आहेत तुझ्यासाठी. सोडून जाणाऱ्या नगरसेवकांमुळे नाईक परिवाराची व महाआघाडीच्या प्रयोगामुळे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे चक्रीवादळाला थोपवून धरण्याची माझ्या मित्रामध्ये क्षमता आहे. या संकटावर माझा मित्र मात करणारच याची खात्री आहे आम्हाला. पुन्हा निवडणूक काळात मित्राला धुरा सांभाळायची आहे. म्हणूनच मित्रा ठरविलेय, तुला त्रास द्यायचा नाही, तु पुढे चालत राहा, मागे वळून पाहू नको. कोणी असेल नसेल पण खात्री बाळग, तुझा झेंडा घेवून तुझ्या विकासकामांचा टाहो फोडताना मी मात्र नक्कीच असेल. मित्रा तक्रार अशी नाही, कारण तुझ्याकडे माझ्यासाठी काही मागून आपल्या मैत्रीला लाचारीचे स्वरूप आणायचे नाही.माझ्यासाऱख्या एका हट्टी मनोरूग्ण, फाटक्या खिशाच्या फाट्क्या तोंडाच्या मित्राला दोन दशके सांभाळले त्यातूनच आपला संयम व सहनशीलता दिसून येते. आपली मैत्री कायम राहणार . कोणीही बाजारबुणगे अथवा भाट ती तोडू शकणार नाही याची खात्री आहे. मित्रा महापालिकेची लढाई आपणास जिंकायची आहे. निवडणूक निकालानंतर त्याच चेहऱ्यावर सुर्यप्रकाशाइतके तेज पाहण्याची इच्छा आहे. बाकी काही नाही…