नवी मुंबई
वसवायला घेताना येथील काही स्थानिकांच्या जमिनी तर त्यांच्या घराच्या
उंबरठ्यापासून बर्याचदा सक्तीने संपादित केल्या गेल्या. नवी मुंबईत सिडको,
एमआयडीसी, महापालिका, रेल्वे, एमएमआरडीए यांचे तसेच नवी मुंबई विमानतळ, आता
शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतु हे व असे कित्येक महाप्रकल्प आले, येत आहेत. या साऱ्यात
येथला भुमिपुत्र पार नागवला गेला. त्याची पारंपारिक उत्पन्न देणारी शेती गेली.
मिठागरे गेली. खायला व विकायला मिळणारी मासेमारीही गेली.
सिडको किंवा महानगरपालिकेने स्थानिकांना फारशा नोकऱ्याही दिल्या नाहीत. त्यामुळे
सर्वाधिक नुकसान कुणाचे झाले? तर या स्थानिक नवी मुंबईकर भुमिपुत्राचे. म्हणूनच मी
मागणी केली की नवी मुंबई महानगरपालिकेचे कोणतेच कर… जसे मालमत्ता, पाणीपट्टी हे
स्थानिकांना आकारले जाऊ नयेत, असे रोखठोक मत व्यक्त केले सारसोळे गावाचे सामाजिक
कार्यकर्ते मनोज यशवंत मेहेर यांनी. त्यांची एकूणच भूमिका जाणून घेताना येथील
प्रशासन यंत्रणा, राजकारण, समाजकारण, नागरी सेवा-सुविधा याबाबतच्या लोकभावनाही
समजून आल्या.
* तुम्हाला सामाजिक क्षेत्रात
कार्यरत झाल्याला किती वर्षे झाली?
मी गेल्या १५-१६ वर्षांपासून सारसोळे गाव व परिसराच्या समाजकारणात सक्रिय आहे. नवी
मुंबई महानगरपालिकेचा प्रभाग क्र ८६ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमच्या भागात मुख्य
वस्ती स्थानिक भुमिपुत्र आगरीकोळी समाजाची आहे. त्याखेरीज येथे राज्याच्या विविध
भागातून आलेले मराठी भाषिक तसेच हिंदी भाषक, गुजराती, मुस्लिम धर्मीय यांचीही
वस्ती आहे. कोळवणी माता मित्र मंडळ (रजि.) ही माझी संस्था २००९ पासून या परिसरातील
सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांवर आवाज उठवते. आमच्या संपूर्ण परिवारात राजकारणाची
परंपरा वगैरे नाही. तरीही मी हटकून समाजकारणासह राजकारणात प्रवेश केला. बायांची
(देवींची) गाणी कार्यक्रमातून आम्ही प्रारंभ केला. नारळी पौर्णिमा, बामनदेव भंडारा
अशा वेळच्या उपक्रमांतून आम्ही लोकांशी जोडलेले आहोत.
* तुमच्या मते कोणते प्रश्न या प्रभागाला भेडसावणारे आहेत?
तुमचा प्रश्न नेमका व माझ्या मनातला आहे. प्रश्न/समस्यांची अजिबात येथे कमतरता
नाही. आम्हाला सर्वात मोठी समस्या आहे ती रोजगाराची. आम्ही ग्रामस्थ आता भुमिहीन
झालो आहोत. आमच्या या भागाचा वर्षेनुवर्षे गावठाण विस्तार झाला नाही.
कुटुंबविस्ताराच्या कारणास्तव गरजेपोटी घरे बांधली, त्यावरही कारवाईची टांगती
तलवार असते. आमच्या खाडीमध्ये कारखान्यांतून सोडलेले तसेच नागरी भागातून सांडपाणी
सोडले गेल्याने ती प्रदूषित झाली. त्यामुळे मासेमारी घटली. गावातील काही जणांना
शिकूनही नोकऱ्या मिळाल्या नव्हत्या. म्हणून शिक्षणाप्रतीची आस्था युवावर्गात
नव्हती. करावे ग्रामस्थांचे प्रबोधन करणारे चांगले लोक त्यांना लाभले. त्यामुळे
तेथील लोक जागोजागच्या सरकारी आस्थापनांतून नोकरीस लागले. तसे आमचे झाले नाही.
त्यामुळे बेरोजगारी हा आम्हाला जाचणारा सर्वात मोठा प्रश्न आहे.
* मग या व यासारख्या विविध
प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तुम्ही काय केलेत?
गावाच्या व प्रभागाच्या विविध प्रश्नांवर पत्रव्यवहार करुन प्रशासनाचे लक्ष वेधणे
व ती समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणे हा माझा जणू छंदच आहे. मासेमारी हे
आमच्या उपजिविकेचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे सारसोळे जेटी, तेथील निवारा शेड
यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीलो. बामनदेव मार्ग, स्मशानभुमी नामकरण,
मृत्युउपरान्त विविध विधी (उत्तरकार्य-राखाडी धुणे), यासाठी पाणी व्यवस्था,
साडेबारा टक्के भूखंडांवर उभारलेल्या टापूतील रस्ते, पाणीपुरवठा, गटारे,
मलवाहिन्या यांसारख्या अनेक प्रश्नांवर मी पत्रव्यवहाराने पाठपुरावा करणे सुरु
ठेवले; पालकमंत्र्यांच्या जनता दरबारातही मी अनेक प्रश्न मांडले आहेत. त्यामुळे
यातील काही प्रश्न सुटलेही आहेत. २६/११ सारखा प्रकार होवू नये म्हणून जेटी भागात
सीसीटीव्ही बसवणे, सुरक्षा वाढवणे अशी मागणी केली. ६-७ वर्षांपूर्वी काही समाजकंटकांनी
आमच्या
ग्रामस्थांची मासेमारीची जाळी जाळून टाकली होती. आमच्याकडे मग सागर रक्षक
दल-ग्रामसेवा दलही स्थापन केले होते. गावात पूर्वीच्या गावकीच्या व्यायामशाळेच्या
जागेवर शाळा झाली, तशीच व्यायामशाळाही बनवली जावी अशी आमची मागणी आहे. २०१६ साली
मार्च महिन्यात स्थानिकांच्या विविध मागण्यासाठी सिडकोच्या मुख्यालयासमोर बेमुदत
उपोषण झाले होते; त्या उपोषणकर्तर्त्यात माझाही सहभाग होता. आम्ही मंडळाच्या
माध्यमातून १०वी-१२वी गुणवंतांचे सत्कार तर करतोच; पण महापालिका शाळेत सर्वाधिक
उपस्थिती लावणाऱ्या विद्यार्थ्याचेही जाहीर सन्मान करतो. शाळेला देणगी देण्यातही
सहकार्याचा हात ठेवला आहे. ग्रामस्वच्छता, परिसर-प्रभाग स्वच्छता, वृक्षारोपण
अशातही माझे पुरेपुर योगदान असते.
* तुम्हाला महापालिकेवर प्रभाग समिती सदस्य म्हणूनही संधी मिळाली होती..
होय. २०१८ च्या सुमारास मला ब प्रभाग समिती सदस्यपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
त्यानिमित्ताने मी अनेक प्रश्न मांडले. पण त्यांची नोंदच इतिवृत्तात घेतली जात
नसे, सोडवणे तर दूरच राहीले. मग दीड वर्षातच कंटाळून मी ते पद सोडून दिले. माझा
राजकीय पक्षांचाही अनुभव आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत मी भारतीय
जनता पक्षाला प्रभागातून चांगली मते मिळावीत यासाठी आवश्यक ती सारी मेहनत केली
आहे. म्हणून मला वाटते की यावेळी येथून मला संधी दिली गेली तर मी प्रभागातील विविध
समस्यांवर महापालिका सभागृहात आवाज ऊठवून त्या मार्गी लावू शकेन. भुमिपुत्रांच्या
व रोजगाराच्या प्रश्नांवर तसेच प्रभागातील अन्य रहिवाशांच्या समस्यांवरही काही
समाधानकारक तोडगे शोधू शकेन.
* या विविध प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी तुमच्याकडे काय कार्यक्रम आहे? कोणत्या
मागण्या प्रामुख्याने तुम्ही कराल?
स्थानिकांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचा मालकत्ता कर व पाणीपट्टी हे कर एकदम माफ
केले जावेत. कारण आमच्या त्यागामुळे हे शहर उभे आहे. कारखाने, अन्य उद्योगधंदे,
व्यापारी युनिट यांच्याकडून पुरेसा महसुल पालिकेला मिळत असतोच. रहिवाशांसाठी करात
कोणतीही दरवाढ केली जावू नये. गावठाण व गावठाण विस्तार भागात प्रॉपर्टी कार्ड दिले
जावे, विस्तारीत गावठाण भागातील तिहेरी करआकारणी रद्द होवून ती पुर्वपदावर यावी.
प्रभागातील रस्ते, गटारे, मलनिसा:रण वाहिन्यांची कामे तत्परतेने केली जावीत,
गरजेपोटी बांधलेली घरे नियमित व्हावीत, स्थानिक मासेमारांना रोजगार मिळावा म्हणून
परप्रांतीय मासेविव्रेत्यांवर बंदीची माझी मागणी आहे. अनेक ठिकाणी जसे शेतमाल थेट
ग्राहकांकडे जावून विकण्यास परवानगी असते, तसेच मासेमारांना सुध्दा त्यांनी
पकडलेले मासे ग्राहकांना थेट विकता यायला हवेत असे माझे म्हणणे आहे. मुंबईत
प्रकल्पग्रस्त माहुल ग्रामस्थांना जशी नुकसानभरपाई मिळाली, तशीच नुकसानभरपाई
शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूमुळे बाधित नवी मुंबईकर प्रकल्पग्रस्तांना मिळायला
हवी. कारण या पुलामुळे पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होवून मासळी मिळणे कठीण झाले
आहे, हात होडी (छोटी बोट) धारकांना मच्छिमार सोसायटी चालवण्याची परवानगी मिळावी,
जेटी भागातील गाळ साफ केला जावा, पोलीस गस्त वाढवण्यात यावी, उद्यानात ध्वनीवर्धक
लावले जाऊन तेथे भक्तिगीते ऐकायला मिळावीत, येथील गावांना सुशोभित कमानीचे
प्रवेशद्वार बनवले जावे, आमच्या भागातील तोडण्यात आलेले भाजी मार्केट पुन्हा
ऊभारण्यात यावे. बामनदेव परिसरात पर्यटनस्थळ बनवले जावे, वंडर्स पार्क येथे नवी
मुंबईकर ग्रामस्थांना प्राधान्याने रोजगार मिळावा, सीआर झेड-कांदळवन परिसरात येथील
महिलांना भोजनालय चालवण्यास परवानगी मिळावी, सारसोळे व अन्य ग्रामस्थांसाठी
मधुमख्खी पालन व अन्य छोटे कुटिरोद्योग करता येण्यासाठी मुभा मिळावी, सारसोळे जेटी
लगतच्या पाण्यात तरंगते हॉटेल चालवण्याची परवानगी मिळावी या व याप्रकारच्या अनेक
मागण्यांवर मी आजही ठाम असून यामुळे आमच्या ग्रामस्थांना रोजगार मिळण्यास मदत तर
होईलच; पण हा परिसरही उठून दिसेल.
साभार : दै. नवे शहर