नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असतानाच नवी मुंबईतील राजकीय घटकही नवी मुंबईकरांसाठी रस्त्यावर उतरल्याचे पहावयास मिळत आहे. महापालिका प्रशासन रस्त्यावर सफाई मोहीम करत असतानाच राजकीय घटक मात्र स्वखर्चाने गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागात तसेच घराघरात जावून जंतुनाशक फवारणी करताना दिसून येत आहे.
कोरोनाचा प्रभाव वाढू लागताच नवी मुंबईतील दिघा ते बेलापुरदरम्यानच्या राजकीय घटकांनी, नगरसेवकांनी स्वखर्चाने स्वत:च्या प्रभागातील रहीवाशांना मोफत मास्क व सॅनिटायर्झस मोठ्या संख्येने वितरीत केले आहे. इतर भागाच्या तुलनेत नेरूळ, ऐरोली, तुर्भेमध्ये राजकीय घटकांनी आघाडी घेतली आहे. सिवूड, जुईनगर, वाशी, कोपरखैराणे, घणसोलीतीलही राजकारणी आता रस्त्यावर उतरू लागले आहेत. नवी मुंबईत पोलिस मित्रही आता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून जनतेमध्ये जनजागृती करू लागले आहेत. पालिका प्रशासनाकडून मध्यरात्रीच्या सुमारास नवी मुंबईत अंर्तगत व बाह्य रस्त्यावर धुरीकरण व फवारणी होत असताना नगरसेवक आपल्या प्रभागात स्वत: फिरून फवारणी करून घेत आहेत. प्रभागातील नागरिकांची भाज्यांच्या बाबतीत गैरसोय होवू नये तसेच अवाजवी दराने त्यांना भाज्या खरेदी कराव्या लागू नये म्हणून रवींद्र सावंत यांनी एपीएमसीतून भाजीचा टेम्पो आणून स्थानिक परिसरातील रहीवाशांना खरेदीच्या दरात भाजी विकण्यास सुरूवात केली आहे.
नवी मुंबईत सर्वप्रथम प्रभाग ९६च्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी स्वखर्चाने प्रभागातील घराघरात जावून जंतुनाशक फवारणी केली. त्यापाठोपाठ प्रभाग ८७च्या शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी स्वखर्चाने प्रभागातील घराघरात जावून जंतुनाशक फवारणी केली. कॉंग्रेस नेते व नवी मुंबई इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी स्वखर्चाने धुरीकरणाच्या मशिन खरेदी केल्या असून नेरूळ व जुईनगर परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जावून स्वत: कामगार कामावर ठेवून धुरीकरण करून घेत आहेत.
सोशल मिडियाच्या माध्यमातून नेरूळमधील जंतुनाशक फवारणीची सर्वत्र गवगवा होताच नवी मुंबईतील इतर प्रभागातील रहीवाशांकडून जंतुनाशक फवारणीबाबत विचारणा होवू लागली आहे. अनेक नगरसेवकांनी जंतुनाशक फवारणीविषयी विविध कंपन्यांकडून फवारणीचे कोटेशन मागितले असून एक-दोन दिवसात फवारणीचे काम सुरू होईल. सफाई कामगार दिवसातून दोन वेळा रस्ते सफाईचे काम करत आहेत. मूषक नियत्रंण कामगार अहोरात्र राबत आहेत. कचरा वेचक कामगार व कचरा वाहतुक संकलन कामगार कामावर हजर आहेत. प्रशासनाकडून सोसायटीच्या बाहेर व राजकारण्यांकडून सोसायट्यांच्या आत स्वच्छता अभियान राबविले जात आहे. पोलिस मित्र सक्रिय झाले आहेत. दुकान व्यावसायिकांच्या दुकानापुढे ग्राहकांसाठी नगरसेवकांकडून पांढरे पट्टे मारले जात आहे. कोरोनाविरोधात नवी मुंबईत पालिका प्रशासनासह राजकारणी, सामाजिक संस्था रस्त्यावर उतरल्याचे दिसून येत आहे.