आश्विनी भोईर
नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन झाला आहे. सर्व भारतभर बंद असून भारतीय घराघरात बसून सरकारी सूचनांचे पालन करत आहे. पण ज्यांचे खरोखरीच हातावर पोट आहे. हलाखीची परिस्थिती आहे. घरात खाणारी चार तोंडे आहेत, त्यांनी जगायचे कसे? हातावर हात ठेवून भागणार नाही. यावरही तोडगा काढून अनेकांनी आपले व्यवसाय बदलून घरच्यांची उपजिविका भागविणे सुरू केले आहे. नेरूळमधील अखिलभाई हा त्यातीलच एक. नेरूळ पश्चिमला अखिलभाई हा पानटपरीवाला तसा फेमस गृहस्थ. ग्राहकांनी काही मागावे, अखिलभाई उपलब्ध करून देणार. सतत हसतमुख असणारा अखिलभाई आतमध्ये कितीही तणाव असला तरी चेहऱ्यावर कधीही अखिलभाई तणाव दिसू देत नाही. पान बिडी सिगारेटपासून पाण्याची बिसलेरी, गोळ्या-बिस्कीटे काहीही मागा, अखिलभाईच्या पानटपरीत मिळणारच. त्याच्या पानटपरीत काही भेटणार नाही, असे होणार नाही. टपरीवर आलेला ग्राहक कधी रिकाम्या हाताने परत जाणार नाही. सध्या लॉकडाऊनमुळे कुटूंबाची उपजिविका भागविण्यासाठी पानटपरी बंद करून सकाळी व संध्याकाळी पदपथावर, दुकानाच्या कोपऱ्यावर हाच अखिलभाई आपणास सध्या अंडी विकताना पहावयास मिळत आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये बुध्या बाळ्या वैती मार्गावर एसबीआय बॅकेच्या समोरील बाजूस वैष्णवी बिल्डींगच्या तळमजल्यावर हाच अखिलभाई आपणास गेल्या काही वर्षापासून पानटपरी चालविताना दिसत आहे. या टपरीचे भाडे महिन्याला १५ हजार रूपये आहे. त्यातचअखिलभाई यांनी सारसोळे गावात एक सदनिकाही विकत घेतली आहे. याच टपरीतून मिळणाऱ्या पैशावर घराच्या कर्जाचे हफ्ते जात आहे. घरात दोन लहान मुली आहेत. जुईनगरमधील अमृतानंदमयी विद्यालयात मुली शिक्षण घेत आहेत. अखिलभाईची पत्नी गृहीणी असल्याने संसाराचा गाडा एकट्या अखिलभाईच्याच खांद्यावर आहे.
लॉकडाऊनमुळे घरात बसून राहणे अखिलभाईला शक्यच नव्हते. पानटपरीचे भाडे, घराचे हफ्ते, घरखर्च याचा मेळ बसविण्यासाठी हातपाय हलविण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे घरात बसून न राहता पानटपरी बंद करून रस्त्याच्या कोपऱ्यावर अंडी विकण्याचा व्यवसाय अखिलभाई यांनी लगेच सुरू केला. सकाळी ९ ते १२ व सांयकाळी ५ ते ८ अखिलभाई अंडी विकण्याचा व्यवसाय करत आहेत. सकाळी ६ ते ६.१५च्या दरम्यान अंड्याची गाडी येते. अखिलभाई अंडी घेतात व दिवसभर त्या अंड्याची विक्री करतात.
अखिलभाई पानटपरीवाला म्हणून नेरूळ पश्चिमेला प्रसिध्दच. कोणाला सदनिका विकत अथवा भाड्याने लागत असली तरी अखिलभाई एक रूपायाही कमिशन न घेता त्यांना मदत करतो. दुपारच्या वेळी अथवा रात्री पानटपरी बंद झाल्यावर वयस्कर ग्राहकांच्या घरी अखिभाई स्वत:च्या खांद्यावर बिसलेरीच्या मोठ्या बाटल्या नेवून देतो. अखिलभाईने जगण्यासाठी व्यवसाय बदली केला असला तरीही चेहऱ्यावर तेच हास्य आजही कायम आहे. पोटासाठी कसली लाज म्हणत बदलत्या व्यवसायाता झोकून देताना अखिलभाई अंड्याचाही व्यवसाय तितकाच जोमाने करू लागले आहेत. कोणाची सहानूभूती न घेता, कोणापुढे हात न पसरता लॉकडाऊनच्या संघर्षमय परिस्थितीतही अखिलभाईने जगण्यासाठी तोडगा काढला आहे. अखिलभाईची आज सर्व प्रशंसा करत आहेत. एकेकाळी टपरीवर गर्दी करणारे ग्राहक आज अखिलभाईकडे अंडी घेवून जावू लागले आहेत. लॉकडाऊनला न घाबरता हातावर पोट असणाऱ्यांनी संघर्ष करायची मानसिक तयारी ठेवावी, असा संदेश एकेकाळच्या पानटपरीवाल्या व आता रस्त्यावर बसून अंडी विकणाऱ्या अखिलभाईने कृतीतून दिला आहे.