आश्विनी भोईर
नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, ओरिसा भागातील अनेक कामगार काही दिवसापूर्वीच त्यांच्या गावी पळून गेले. त्याचा परिणाम आता सर्वच कामावर जाणवू लागला आहे. गॅस वितरीत करण्यासाठी कामगारच गॅस एजंन्सीकडे न राहील्याने ग्राहकांना आता गॅस एजंन्सीसमोर रांगा लावाव्या लागत आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे गॅसच्या टाक्या घेवून येणाऱ्या वाहनांना विलंब होत असल्याने रांगा लावूनही अनेकदा ग्राहकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. संतप्त ग्राहक व गॅस एजंन्सीचे व्यवस्थापण यांच्यात दररोज जोरदार वादावादी होवू लागल्याने गॅस एजंन्सीसमोरही आता पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागत आहे.
महानगर कंपनीमुळे नवी मुंबईत घरोघरी पाईपमधून थेट स्वंयपाकघरात गॅस उपलब्ध झाला असला तरी गावठाणातील इमारती, चाळी, झोपडपट्टी तसेच अंर्तगत भागात लांबवर असलेल्या ईमारतीमधील रहीवाशांना आजही गॅसच्या टाक्याचाच आधार आहे. कोरोनाच्या लागणचे वृत्त पसरताच परराज्यातील कामगार रेल्वे सुरू असतानाच काही दिवसापूर्वीच त्यांच्या गावी निघून गेले. त्यामुळे दैनंदिन व्यवहारावर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. गॅसच्या टाक्या घरोघरी वितरीत करणारे कामगारच गावी निघून गेल्याने ग्राहकांना गेल्या काही दिवसापासून घरी गॅसची टाकी मिळणे अवघड झाले आहे. गॅस एजंन्सीमध्ये काम करणाऱ्या कामगारांचा दुष्काळ असल्याने आहे त्या कामगारांवर कामाचा ताण पडला आहे. त्यातच ग्राहकांच्या रांगा वाढत असल्याने ग्राहकांच्या संतापाचा सामना गॅस एजंन्सीच्या व्यवस्थापणाला व कामगारांना सहन करावा लागत आहे. गॅसच्या टाक्या घेवून येणारी वाहनेही संख्येने कमी येत असल्याने ग्राहकांचा टाक्या देण्यात कामगारांना अडचणी येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना अनेकदा रांगा लावून रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.
अनेक गॅस एजंन्सी रांगा लावलेल्या ग्राहकांना टोकन देत परत पाठवित असून उद्या गाडी आल्यावर गॅसची टाकी दिली जाईल सांगून त्यांना परत पाठविले जात आहे. गॅसच्या टाक्या घेवून येणाऱ्या वाहनांनाही गॅसच्या मुख्य कंपनीतही गाड्या भरणारे कामगार नसल्याने गाड्या येण्यास विलंब होत आहे. टोकन देवूनही वेळेवर गॅसची टाकी मिळत नसल्याने ग्राहक व गॅस कंपनीचे व्यवस्थापन व कामगारांत हमरातुमरीच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे अनेक गॅस एजंन्सींना स्थानिक भागातील पोलिसांचे सहकार्य घेण्याची वेळ आली आहे.