आश्विनी भोईर
नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभर लॉकडाऊन जाहीर केल्याचे परिणाम आता ठिकठिकाणच्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातही पहावयास मिळू लागले आहे. सोसायट्यांमध्ये वाढत्या वाहनांवरून पार्किगवरून होणारी भांडणे आता होताना दिसत नाही. कोरोनाचे पडसाद उमटू लागताच आणि रेल्वे सेवा बंद होताच अनेक आपल्या वाहनांसह गावी पळ काढल्याने गृहनिर्माण सोसायट्या आता सुन्यासुन्या झाल्या असून पार्किगसाठी उर्वरित लोकांना आता जागाच जागा उपलब्ध झाली आहे.
कोरोनापूर्वी गृहनिर्माण सोसायट्या भरलेल्या दिसायच्या. सोसायटीच्या खिडक्यांमधून कोणीतरी डोकावताना अथवा समोरच्या खिडक्यांमध्ये उभ्या असणाऱ्यांशी बोलताना दिसायचे. सोसायटीच्या आवारात मुले-मुली, ज्येष्ठ नागरिकांचा राबता दिसायचा. पार्क केलेली वाहने बाहेर काढताना भांडणे होताना दिसायची. पण गेल्या काही दिवसांपासून हे चित्र दुर्मिळ होवू लागले आहे. सोसायटीचा वॉचमन असणारा कोणाचा बहाद्दूर, कोणाचा थापा पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी चढवून झाल्यावर सोसायटी आवारातील वाहने धुताना, साफ करताना, स्वच्छ करताना दिसून यायचा. सोसायटीकडून मिळणारा पगार हा तुटपुंजा असला तरी सोसायटी आवारातील दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने धूवून, स्वच्छ करताना त्याला होणारी कमाई पगाराच्या तुलनेत बक्कळ असायची. आता सोसायटीचा बहाद्दूर, थापा पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी चढवून झाल्यावर सोसायटीच्या प्रवेशद्वारावर हताश होवून बसलेला पहावयास मिळत आहे. सकाळी १० वाजता मच्छी विक्रीसाठी उत्तर भारतीय आल्यावर सोसायटीत शिरण्यापूर्वी सोसायटीतील मांजरींना त्याला प्रथम मॅनेज करावे लागत असे. गेटवर या मांजरींना काही मच्छी टाकल्याशिवाय या विक्रेत्याला आतमध्ये शिरणे अवघड होवून जायचे. आता कोरोनामुळे मच्छिवाला मच्छि घेवून येत नसला तरी सोसायटीतील मांजरे मात्र आतुरतेने मच्छिवाल्याची वाट पाहताना दिसत आहेत.
आर्थिक राहणीमान उंचावत गेल्याने सोसायटीत वाहनांची संख्या वाढत गेली. पालकांच्या चार चाकी वाहनांची व मुलांच्या दोन चाकी वाहनांची संख्या वाढत गेल्याने सोसायटी आवारातील मोकळा परिसर कमी होत गेला. पार्किग मासिक दरामुळे सोसायटीच्या उत्पन्नात वाढ होत गेली असली तरी मुलांना खेळण्यासाठी व ज्येष्ठांना फिरण्यासाठी सोसायटी आवारात जागा आता दुर्मिळ होवू लागली. त्यातच कोणाला सकाळी, कोणाला दुपारी, कोणाला रात्री कामावर जायचे असल्याने गाड्या सोसायटी आवाराबाहेर काढणे अनेक ठिकाणी अग्निदिव्य होवून बसले आहे. अनेक सोसायट्यांमध्ये सोसायटीत आल्यावर बहाद्दूरकडे, थापाकडे गाडीच्या चाव्या देणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु आता सोसायटीतील अधिकांश गाड्या त्यांच्या मालकासह गावी गेल्याने सोसायटी आवारात जागाच जागा दिसू लागली आहे.
सोसायटीतील अनेक सदनिका रिकाम्या झाल्याने आता कोरोनासोबत घरफोड्यांचीही भीती सोसायटीतील उर्वरित रहीवाशांसमोर निर्माण झाली आहे. सोसायटीतील शिल्लक रहीवाशी बंद सदनिकांची काळजी घेताना, अगदी रात्री, अपरात्री सोसायटीत फेरफटका मारताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एरव्ही अबोला असणाऱ्या सदनिकांधारकांमध्ये आता सुसंवाद वाढीस लागला आहे. सर्व जण घरामध्ये असले तरी मोबाईलवरून सतत एकमेकांची ख्यालीखुशाली विचारताना दिसत आहे. सोसायट्या आता शांत झाल्या आहेत. सोसायट्यांच्या प्रवेशद्वारांना ठराविक वेळेचा अपवाद वगळता टाळे लागले पहावयास मिळत आहे. सोसायटी आवारात तळमजल्यावर बंद वाहने, सोसायटीचा थापा, कुत्री, मांजरी याशिवाय कोणाचेही दर्शन होत नाही.