नवी मुंबई : महानगरपालिका आरोग्य विभाग माता बाल रूग्णालय, नागरी आरोग्य केंद्र, प्रथम संदर्भ रूग्णालय या माध्यमातून नवी मुंबईकरांना आरोग्य सुविधा उपलब्ध देत आहे. याशिवाय डॉक्टर, स्वच्छता निरीक्षक, बहूउद्देशीय आरोग्य कर्मचारी, परिचारिका, घनकचरा विभागातील कर्मचारी, सफाई कामगार व अत्यावश्यक सेवेतील अन्य कामगारही स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कोरोनाच्या काळातही नवी मुंबईकरांना आरोग्य सुविधा देत आहेत. परंतु नवी मुंबईकरांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी जे जीव धोक्यात घालत आहे, त्यांनाच पालिका प्रशासन वार्यावर सोडत आहे, आरोग्य सुविधा उपलब्ध नाही, साहीत्य उपलब्ध नाही अशा गंभीर व धक्कादायक बाबी उघडकीस आल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना अत्यावश्यक सुविधा पुरविण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
नागरी आरोग्य केंद्रामध्ये पीपी किट उपलब्ध नाही. रूग्णावर उपचार करणार्या डॉक्टर, परिचारीका व अन्य आरोग्य विभागातील कर्मचार्यांना पीपी किट, एन 95 मास्क, ग्लोव्हज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याचा पुरवठा अजून प्रशासनाकडून झालेला नाही. नॅशनल हेल्थ अर्बन मिशन (एनएचयूएम अंर्तगत) पालिका प्र्रशासनात काम करणार्या परिचारिकांना अवघ्या 8 हजार रूपये या तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे त्यांना रिक्षा व बसने यावे लागत आहे. दररोज रिक्षा व बसचा प्रवासखर्च पाहता त्यांचे वेतन किती शिल्लक राहील व घरात ते किती वेतन देणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे. समस्या गंभीर आहे. या कामगारांना प्रवास भत्ता द्यावा तसेच त्यांच्या वेतनात वाढ करणे आवश्यक असल्याचे रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
ज्या महिला कामगार अत्यावश्यक सेवा म्हणून कोरोनाच्या काळातही आरोग्य सुविधा देण्यासाठी लांबवरून येत आहेत. पालिका प्रशासनाने त्यांची राहण्याची व्यवस्था करावी. रेल्वे सुरू नसल्याने व बससेवा माफक नसल्याने या महिला कामगांराना घरी येताना-जाताना खूप त्रास सहन करावा लागत आहे. नागरी आरोग्य केंद्रांना आपण भेट दिल्यास तेथील पाण्याचे कुलर नादुरूस्त असल्याचे आढळून येईल. काही कुलरमध्ये तर पाण्यात किडे पहावयास मिळतात. त्यामुळे रूग्ण व त्यावर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचार्यांना दूषित पाण्यामुळे आजाराचा सामना करावा लागण्याची भीती आहे. या पाण्याच्या कुलरची लवकरात लवकर दुरूस्ती होणे आवश्यक असल्याचे रवींद्र सावंत यांनी म्हटले आहे.
रस्त्यावर काम करणार्या सफाई कामगार यांचीही अवस्था भयावह आहे. त्यांनाही मास्क, हॅण्ड ग्लोव्हज व सॅनिटरी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कोरोनाचा उद्रेक झाला आहे. महापालिका प्रशासनही सक्षमपणे काम करत आहे. पण काम करणार्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, सफाई कामगार व अत्यावश्क सेवेतील अन्य कामगारांना अद्यापि आरोग्य विषयक सुविधा मिळाल्या नसल्याची नाराजी रवींद्र सावंत यांनी व्यक्त केली आहे.