नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमी आपल्या जीवाची पर्वा न करता नवी मुंबई कार्यक्षेत्रात सुविधा देणाऱ्या व समस्या सोडविणाऱ्या पालिका प्रशासनात काम करणाऱ्या करार पध्दतीवरील कामगारांना, ठोक मानधनावरील कामगारांना तसेच पालिका आस्थापनेवरील कामगारांना, घनकचरा विभागातील कामगारांना तसेच अत्यावश्यक सेवेतील कामगारांना नवी मुंबई इंटकच्या पाठपुराव्यामुळे अखेर पालिका प्रशासनाला दैनंदिन भत्ता ३०० रूपये जाहिर करावा लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांना दैनंदिन भत्ता मिळावा म्हणून मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे लेखी निवेदनातून, प्रत्यक्ष भेटीतून सतत पाठपुरावा केला होता.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यात प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य विभाग रूग्णालयात तर पोलिस रस्त्यावर कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पालिका प्रशंसनीय काम करत आहे. सध्या रेल्वे बंद आहेत. बससेवा विलंबाने सुरू आहेत. कामगारांना रिक्षाने ये-जा करावी लागत आहे. वास्तविक ही सुविधा प्रशासनाने पुरविणे आवश्यक असताना कामगारांवर पदरमोड करण्याची वेळ आली आहे. जेवण व अन्य सुविधाही विकत घेण्याची वेळ कामगारांवर आली असल्याचे रवींद्र सावंत यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.
कामगार जीव धोक्यात घालून नागरी सुविधा देण्याचे व नागरी समस्या सोडविण्याचे काम करत आहेत. ते आपल्या घरादाराचा व मुलाबाळांचा विचारही न करता आपणास सेवा देत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने कोरोनाच्या काळात प्रशासकीय सेवा देणाऱ्या ठोक मानधनावरील तसेच कंत्राटी आणि महापालिका आस्थापनेवरील कामगारांना दैनंदिन भत्ता देणे आवश्यक आहे. मुंबई महापालिकेने ३०० रूपये दैनंदिन भत्ता लागू केला आहे. नवी मुंबई महापालिकेनेही लवकरात लवकर यावर निर्णय घेण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी सातत्याने पालिका आयुक्तांकडे केली होती.
नवी मुंबई इंटकच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देताना महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी संबंधित कामगारांना ३०० रूपये दैनंदिन भत्ता लागू केला आहे. कामगारांनी आयुक्तांच्या या निर्णयाबद्दल महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ व कामगार नेते रवींद्र सावंत यांचे आभार मानले आहेत.