स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोव्हीड – १९ चा प्रसार रोखण्यासाठी राज्य साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ ची अंमलबजावणी १३ मार्च २०२० पासून लागू करण्यात आली असून त्यामधील खंड २, ३ व 4 मधील तरतूदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम २०२० अन्वये १४ मार्च २०२० रोजी अधिसूचना काढण्यात आलेली असून नियमावली तयार केलेली आहे. या अधिसूचनेव्दारे महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व प्रतिबंध करण्यासाठी महापालिका आयुक्त यांस सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.
या अनुषंगाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनानुसार विविध उपाययोजना प्रभावी रितीने करण्यात येत असून यामध्ये अत्याधुनिक तंत्रप्रणालीचाही वापर करण्यात येत आहे.
सध्याच्या परिस्थितीत कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी माणसांचा परस्पर संपर्क टाळणे, यासाठी घरातच थांबणे तसेच काही अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर यायचे झाल्यास नाका-तोंडावर तिपदरी मास्क लावणे व सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सींग काटेकोरपणे पाळणे हाच प्रभावी उपाय आहे. तथापि अद्यापही काही नागरिकांना या गोष्टींचे गांभीर्य समजले नसल्याचे व त्यांच्या अशा बेजबाबदार वागणुकीमुळे ते त्यांच्या स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याला हानी पोहचविणारे कोरोना विषाणूचे वाहक होऊ शकतात हे समजले नसल्याचे लक्षात येत आहे.
अशाप्रकारे सार्वजनिक आरोग्याला हानी पोहचवित लॉकडाऊनचे नियम न पाळणाऱ्या बेजबाबदार नागरिकांना लॉकडाऊनमागील उद्देश नीट कळावा आणि लॉकडाऊनमधील प्रतिबंध आपल्याच आरोग्याच्या भल्यासाठी आहेत हे व्यवस्थितपणे लक्षात यावे यादृष्टीने साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करीत महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांचेमार्फत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये आपल्या वर्तनाने अडथळे आणणाऱ्या नागरिकांकडून दंडात्मक वसूली करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. यानुसार –
* सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क / रूमाल न वापरणेयाकरिता साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये ५०० रूपये इतकी दंडात्मक रक्कमवसूल करण्यात येणार आहे.
* रस्ते, बाजार, रूग्णालय, कार्यालय अशा सार्वजनिक स्थळी थुंकणेयाकरिता साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये १००० रूपये इतकी दंडात्मक रक्कमवसूल करण्यात येणार आहे.
* सर्व दुकानदार / फळे / भाजीपाला विक्रेते / सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते आदी व्यापारी तसेच त्याठिकाणी खरेदीसाठी जाणारे ग्राहक यांनी दोन ग्राहकांमध्ये किमान ३ फूट सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सींग) न राखल्यास ग्राहक / व्यक्ती यांचेकडून २०० रूपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येणार आहे.
सदर आस्थापना मालक / दुकानदार / विक्रेता यांनी सामाजिक अंतर राखले जाईल असे दुकानांसमोर मार्कींग करून घ्यायचे आहे व ग्राहकांना त्याचे पालन करण्यास सांगायचे आहे. ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर राखले न गेल्यास अशा आस्थापना मालक/ दुकानदार/ विक्रेत्यांकडून २ हजार रूपये इतकी दंडात्मक रक्कमवसूल करण्यात येणार आहे.
सदर दंड हा पहिल्यांदा आढळल्यास आहे. मात्र अशा प्रकारचा नियमभंग दुसऱ्यांदा केलेला आढळल्यास दुप्पट दंड अथवा फौजदारी कारवाई अथवा दोन्ही अशी कारवाईकरण्यात येईल असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त, परिमंडळ १ आणि २ असे दोन्ही उपआयुक्त, विभाग कार्यालयांचे कार्यकारी अभियंता, आठही विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी, क्षेत्रीय आरोग्य अधिकारी, विभाग कार्यालयांतील सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षक यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
सुजाण नवी मुंबई नागरिकांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये आपापल्या घरातच थांबून संसर्गातून होणारा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण योगदान द्यावे. अगदी अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर जावयाचे असल्यास घरातील एकाच व्यक्तीने तिपदरी मास्क लावून बाहेर पडावे, सार्वजनिक ठिकाणी परस्परांमध्ये किमान ३ फूट सामजिक अंतर राखण्याचे भान ठेवावे. जास्त काळ बाहेर न रेंगाळता काम झाल्यावर लगेच घरी परत जावे. सातत्याने साबणाने हात धुवावेत.
नवी मुंबई हे आधुनिक शहर म्हणून नावाजले जात असताना सुशिक्षितांचे शहर अशीही नवी मुंबईची वेगळी ओळख आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये आपल्या फिरण्यावर आलेली बंधने ही आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या आरोग्य हितासाठीच आहेत याची नोंद नागरिकांनी घ्यावी आणि नियम तोडून दंडात्मक कारवाई करण्याची वेळ आपल्यावर येऊ देऊ नये असे आवाहन नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.