कर्तव्य दक्षता व सामाजिक जबाबदारीचे भान शासनात आल्यावर लगेच येते. याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे विभागीय माहिती कार्यालयातील कर्मचारी प्रफुल्ल पाटील यांचे नाव घेता येईल. पाटील हे विभागीय माहिती कार्यालयात २७ जुलै २०१८ रोजी अनुकंपातत्वावर शिपाई या पदावर रुजू झाले. पाटील यांचे आई आणि वडील दोघेही हयात नसल्याने ते एकटेच राहतात. दोन्ही बहीणींची लग्न झाली आहेत. त्यांचा संसार आपापल्या सासरी सुखाने सुरु आहे. प्रफुल्ल एकटा राहत असल्याने जेवण बनवणे यापासून घरातील सर्व कामे त्यालाच करावी लागत होती. अशा परिस्थितीत ‘लग्न’ हा एकच पर्याय त्याच्या समोर उरला होता.
लग्नासाठी प्रफुल्लच्या कुटुंबातील वरिष्ठांनी पेण मधीलच आंबिवली या गावातील मुलगी पसंत केली. लग्नाची तारीख ठरवताना मुलीकडील मंडळींनी लग्न फेब्रूवारीमध्ये करण्याचा आग्रह धरला. परंतु आर्थिक अडचणींमुळे प्रफुल्लने लग्न एक ते दोन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याने मुहूर्तानूसार २ मे २०२० ही तारीख ठरवली होती. या घेतलेल्या निर्णयाचे परिणाम गंभीर होतील याची प्रफुल्लला पुसटशीही कल्पना नव्हती. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने १९ मार्च २०२० तर केंद्र शासनाने २३ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन घोषित केला. सर्व प्रकारचे सामाजिक, धार्मिक कार्यक्रम समारंभ यांना बंदी घालण्यात आली. अशापरिस्थितीतही प्रफुल्ल निश्चिंत होता. कारण त्याला असे वाटत होते की, मे महिना येईपर्यंत स्थिती सामान्य होईल आणि आपले लग्न सुखरुप पार पडेल. परंतु लॉकडाऊच्या काळात डोंबिवलीतील एका समाजाच्या लग्नसोहळ्यामुळे शासनाला जमावबंदीचे निर्बंध अधिक कठोर करावे लागले. जर एखादे लग्न करायचेच असेल तर मुलीकडील ५ आणि मुलाकडील ५ व्यक्ती अशा मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत शासनाची पूर्व परवानगी घेऊन, शासनाने लागू केलेल्या सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियमांचे पालन करुन लग्नविधी करण्याची मुभा शासनाने दिली.
रोजच्या शासकीय कामात निघणाऱ्या बातम्या, येणारी वृत्तपत्रे, दूरचित्रवाणीवर दिसणारे सारे दृश्य आणि कोरोना संदर्भात शासन करीत असलेले प्रयत्न लक्षात घेऊन प्रफुल्लने पूर्ण शासन नियम पाळून लग्नाचा निर्णय घेतला. घरातील सर्व नातेवाईक यांची समजूत काढली.
आगरी समाजातील लग्नसोहळा व हळदीचा कार्यक्रम हा रायगड जिल्ह्यात प्रसिध्द आहे. हळदीच्या कार्यक्रमातील धम्माल ही बघण्यासारखी असते. डीजे, गाणीनाच, सर्वत्र रोशनाई अशा थाटात हळदीचा कार्यक्रम केला जातो. रायगडमधील हळदीचे जेवणही भन्नाट असते. प्रफुल्ल स्वत: आगरी समाजातील असल्याने त्यालाही आपल्या लग्नात या सर्व गोष्टींचा अनुभव घ्यायचा होता. मात्र त्याने परिस्थितीचे भान ओळखले व साधेपणाने लग्न करण्याचे ठरविले. त्याची पत्नी दिपांजली हिनेही साधेपणाने लग्नाला होकार दिला. हवंतर प्रफुल्लला लग्न अजून सहा महिने पुढे ढकलून थाटामाटात करता आले असते. परंतु त्याने सामाजिक जबाबदारी ओळखली. प्रसिध्दी विभागात काम करताना ‘सामाजिक भान’ ही ठेवावे लागते आणि सध्या चालू असलेल्या कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे स्वत:चे लग्न शासनाने ठरवून दिलेल्या नियमांच्या अधिन राहून केले. हे विशेष होय.
कोरोनाचे जगावरील संकट पाहता भविष्यात मानवाच्या जीवन शैलीत बदल घडवून आणणे आता गरजेचे झाले आहे. यापुढे अशा लग्न समारंभांना वऱ्हाडींची कमीत कमी उपस्थिती, कमीत कमी खर्च, सोशल डिस्टन्सींग पाळून लग्न सोहळा देखील साजरा करणे आवश्यक झाले आहे. शासनात काम करतांना सामाजिक आणि वैद्यकीय संकटाचे भान ठेवणाऱ्या प्रफुल्लसारख्या कोरोना योध्दाला सलामच केला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, माहिती व जनसंपर्क सचिव डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी या लग्नाची दखल घेतली आणि प्रफुल्ल यास शुभेच्छा दिल्या. इतरांच्या बातम्या प्रसिध्द करणाऱ्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या या योध्याने सामाजिक भान जपले हे विशेष होय.
———–
प्रविण डोंगरदिवे
माहिती सहायक
विभागीय माहिती कार्यालय,
कोकण भवन,नवी मुंबई