भास्कर गायकवाड : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांना तातडीने रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेला तातडीने आदेश देण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी रविवारी (दि. १० मे) रोजी केली आहे.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात आज (रविवार, दि. १० मे) तब्बल ८२ चे कोरोना रूग्ण सापडले आहेत. नवी मुंबई शहरात कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात येण्याएवजी दिवसेंगणिक वाढतच आहे. ही बाब या शहराला भूषणावह नाही. एपीएमसीचे निमित्त पुढे करून प्रशासनाला आपले अपयश फार काळ लपविता येणार नाही. वाशीतील पालिका रूग्णालयातीलच पाच परिचारिका व एका ब्रदरला कोरोना झाला आहे. मुळात हेच चित्र कायम राहील्यास येत्या काही दिवसात नवी मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा हजाराच्या घरात जावून पोहोचलेला असेल अशी भीती पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.
मुळातच कोरोनामुळे आज नवी मुंबईकर भयभीत झालेला आहे. त्यातच कोरोना रूग्ण जाहिर झाल्यावर महापालिका प्रशासनाकडून त्याला उपचारासाठी घेवून जाण्यासाठी सात ते आठ तास रूग्णवाहिका उपलब्ध होत नाही.नागरिक, समाजसेवक, राजकीय घटक कोरोनाग्रस्ताला उपचारासाठी घेवून जाण्यासाठी सतत पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात हेलपाटे मारतात. आमचे नेरूळ पश्चिम नोड हे सिडको वसाहतीचे तसेच सारसोळे, कुकशेत, नेरूळ या तीन गावांचे आहे. शहर व गाव याचा मिलाफ या नेरूळ नोडमध्ये झालेला असून या नोडच्या लोकसंख्येने एक लाखाचा आकडा ओंलाडलेला आहे. कोरोनाचा रूग्ण सापडूनही पालिका प्रशासन रूग्णवाहिका शोधत असल्याचे कारण सांगत पाच ते आठ तासाचा विलंब करत असते. या वेळेत सिडको सोसायट्या व गावठाणात अफवांचे पीक येते. आज ही श्रीमंत महापालिका आहे. रूग्ण वाढत चालले आहे. महापालिकेकडे अडीच हजार कोटीच्या ठेवी आहेत. कोरोनाचा वाढता उद्रेक, रूग्णवाहिकेस होणारा सहा ते आठ तासाचा विलंब, यादरम्यान त्या परिसरातीलनागरिकांमध्ये पसरणारे भीतीचे वातावरण या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने पाच कोटीच्या ठेवी मोडाव्यात आणि कोरोनाग्रस्तांसाठी लागणाऱ्या ५० रूग्णवाहिका तातडिने खरेदी कराव्यात. कोरोनाग्रस्तांवर तातडीने उपचार करण्याकरिता अवघ्या काही मिनिटात रूग्णवाहिका उपलब्ध होणे आवश्यक आहे. या खरेदी केलेल्या रूग्णवाहिका नंतर माता बालरूग्णालय, वाशी हॉस्पिटल तसेच नागरी आरोग्य केंद्रातही वापरता येतील. कोरोनाग्रस्ताचा जीव वाचविणे व त्यावर निदान झाल्यावर लवकरात लवकर उपचार सुरू होणे आवश्यक आहे. २५०० कोटीच्या ठेवी (एफडी) असणाऱ्या महापालिकेला कोरोनाग्रस्ताला उपचाराचे निदान झाल्यावरही सात ते आठ तास रूग्णवाहिका भेटत नाही. या कालावधीत सभोवतालचे रहीवाशीही भयभीत झालेले असल्याचे पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोना रूग्णाचे निदान झाल्यास किमान अर्ध्या तासाच्या आत रूग्णाला उपचारासाठी घेवून जाण्याचे निर्देश आपण नवी मुंबई महापालिका प्रशासनाला द्यावेत आणि कोरोना रूग्णावर उपचारासाठी रूग्णवाहिका सहा ते आठ तास विलंबाने होत असलेल्या प्रकाराच्या चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.