नवी मुंबई : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व नवी मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर (भाऊ) यांनी कोरोनाचा उद्रेक नवी मुंबई शहरात झालेला असतानाही पालिका प्रशासनाकडून गलथान कारभार होत असल्याची तक्रार थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात दिलीप घोडेकर (भाऊ) यांनी निवेदनात म्हटले आहे की, नवी मुंबई शहरात कोरोनाबाधित रुग्ण सर्वात आधी १२ मार्च रोजी आढळून आला. सुरुवातीला मनपा आरोग्य विभागाने कोरोनाची स्थिती व्यवस्थित हाताळली, मात्र सध्या याबाबत जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे. टाळेबंदीबाबत नागरिक उत्स्फूर्त साथ देत असून मनपा प्रशासन सर्वच पातळीवर अपयशी ठरत आहे. आजमितीस ५४ जणांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. शहरातील नागरिकांशी विलगीकरण करण्यासाठी १८ किलोमीटर दूरच्या पनवेल कोन येथील केंद्रावर नेले जाते. ५०० खाटांची सोय असलेल्या केंद्रात पुरेशा सुविधा नसल्याने नागरिकांनी आंदोलन केल्यावर आयुक्तांनी भेट देऊन आढावा घेतला. विशेष म्हणजे एवढ्या लांब जाण्यासाठी अधिकारी उत्सुक नसतात. अनेक अधिकारी हे ठाणे कल्याण डोंबिवली बदलापूर येथे वास्तव्यास असल्याने प्रवासातील वेळ दैनंदिन कारभार आणि कोरोनाबाबत काम करताना वेळेचा अपव्यय होत असल्याचे दिलीप घोडेकर (भाऊ) यांनी मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले आहे.
नेरूळ येथे सेक्टर १० मधील पॉझिटिव्ह रुग्ण नेण्यासाठी आरोग्य प्रशासनाने सकाळी १० ते ५ एवढा प्रदीर्घ कालावधी घेतला. याबाबत वारंवार संपर्क करून अधिकारी टोलवाटोलवी करत होते. या गलथान कारभारामुळे मृतदेहांची अदलाबदल झाल्याने प्रचंड रोष व्यक्त होत आहे. मृतदेहांवरील दागिने चोरीच्या घटनेने मनपा बदनाम झाली आहे. रुग्णांना न्यायला वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने रुग्ण रस्त्यावर ताटकळत उभे असतात, अशा खूप घटना घडत आहेत. महापालिका आयुक्त सगळे आलबेल आहे, असे दाखवत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अनुभवी अधिकाऱ्यांकडे जबाबदारी दिली नसल्याने तसेच अंतर्गत गटबाजी मुळे शहरातील नागरिक भरडले जात आहेत. १३ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च कोरोनासाठी मनपाने दीड महिन्यात केला आहे त्या तुलनेत सुविधा मात्र अत्यंत कमी आहेत. पुरेसे विलग आणि अलग कक्ष सुरू केल्याचा दावा करून रुग्णांना परत पाठवले जात असल्याचे दिलीप घोडेकर (भाऊ) यांनी मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले आहे.
डायबेटीस, हृदयविकार, रक्तदाब या कोरोना आजारांच्या रुग्णांना विलग करताना पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने ७ ते ८ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या कारभारात सुधारणा झाली नाही तर उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या मनपावर प्रशासक असल्याने राजकीय लोकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. आजतागायत प्रतिबंधक क्षेत्र कोणते याची साधी माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. रुग्ण अहवाल देण्याच्या पद्धतीत अचानक बदल केल्याने पत्रकारांमध्येही नाराजी व्यक्त केली जात आहे. पूर्वी तपशीलवार अहवाल दिल्याने त्यानुसार जनतेला आवश्यक सूचना देणे सोपे होते. मात्र आता याबाबत अंधारात तिर मारले जात आहेत. नवी मुंबईमध्ये २६ मेपर्यंत कोरोनाबधित ६३ रुग्ण आढळले
या आकडेवारी वरून अवघ्या १४ लाख लोकसंख्या असलेल्या शहराची स्थिती लक्षात येते. पॉझिटिव्ह आणि संशयित रुग्णांना एकाच रुग्णवाहिकेत नेले जात आहे. तसेच कोरोना रुग्णाची खाजगी रुग्णालयातील लूट थांबविण्याठी आयुक्त यांचे निर्बंध काही यांच्यावर दिसत नाही. इतर आजाराने ग्रस्त रुग्णांना हॉस्पिटल मध्ये दाखल करून घेण्यास टाळटाळ केली जाते. नवी मुंबई महापालिकेकडे कोरोना अहवाल प्राप्त होण्यासही ५ ते ७ दिवसांचा कालावधी लागत असल्याने अनेक अडचनींचा सामना करावा लागत आहे.या विषाणूच्या तपासणी करता नवी मुंबई महापालिकेस स्वतःची प्रयोगशाळा सुरु करण्याचीही मागणी दिलीप घोडेकर (भाऊ) यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.