नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६,१६ए आणि १८ मधील रहीवाशांना अवाजवी विद्युत देयके आल्याने रहीवाशी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे रहीवाशांना अवाजवी आलेल्या देयकाची छाननी करून रहीवाशांना न्याय देण्याची मागणी जनसेवक गणेश भगत यांनी एमएसईडीसीचे कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ नोडमधील प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६, १६ ए, १८ या परिसराचा समावेश होत आहे. या परिसरात सर्व अल्प, अत्यल्प व मध्य उत्पन्न गटातील रहीवाशांचा समावेश होत आहे. एमएसईडीसीकडून सध्या रहीवाशांना अव्वाच्या सव्वा वीज देयके आल्याने रहीवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. रहीवाशी सध्या अस्तित्वासाठी संघर्ष करत असताना भरमसाठ वीज देयके पाठविताना वीज वितरण कंपनीने रहीवाशांना आगीतून फुफाट्यात टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे गणेश भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.
सध्या कोरोना काळात रहीवाशी आज जीवन जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. गेली तीन महिने घरात बसून लोकांची मानसिकता बिघडली आहे. अनेकांना रोजगार गमवावे लागले आहेत. जे कामावर जातात, त्यांना १५ ते ५० टक्केपर्यत वेतन कापून येत आहे. जे लॉकडाऊनमुळे कामावर जावू शकले नाहीत, त्यांना वेतन देण्याचे औदार्य कंपन्या-कारखान्यांनी दाखविलेले नाही. कोरोनामुळे घरात सर्वजण बसूनच असल्याने वीजेचा वापर सरासरीपेक्षा वाढणे स्वाभावकिच आहे. लॉकडाऊन व कोरोनामुळे घरातून बाहेर पडता येत नाही. त्यातच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून (एमएसईडीसी) अव्वाच्या सव्वा वीजदेयके येवू लागल्याने त्यास कोठेतरी आळा बसणे गरजेचे आहे. एकतर लोकांना सध्या खाण्यासाठी पैसा नाही, जेवायला अन्न नाही. घर चालविण्यासाठी इतरांपुढे हात पसरावे लागत आहे. एकीकडे जगणे अवघड झाले असताना ही अव्वाच्या सव्वा देयके भरणे कोणालाही कोरोना काळात शक्य नाही. त्यातच एमएसईडीसीने एप्रिल महिन्यापासून वीजेचे दरही वाढविले आहेत. कोरोना काळात एमएसईडीसीने सवलत देणे आवश्यक असताना वीजदर वाढवून सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचेच काम केले असल्याचा संताप गणेश भगत यांनी निवेदनातून व्यक्त केला आहे.
आजवर नवी मुंबईतून करोडो रूपयांचा नफा एमएसईडीसीने कमविला आहे. भारनियमनातून नवी मुंबईला वगळण्यासाठी प्रति युनिट ४३ ते ४७ पैसे अतिरिक्त आकारून अनेक महिने एमएसईडीसीने नवी मुंबईकरांकडून लाखो नाही तर करोडो रूपये उकळले आहेत. लोकांची सध्या वीज देयक भरण्याची आर्थिक क्षमता नाही. मीटर रिडींगनुसारच बिले आली पाहिजेत. त्यात सध्या कोरोनाची परिस्थिती व लोकांची खालावलेली आर्थिक क्षमता पाहता वीज कंपनीने सवलतीच्या दरात वीज देयके पाठविली पाहिजेत व ती भरण्यासाठीही काही हफ्त्यांची सुविधा वीज कंपनीकडून मिळाली पाहिजे. वीज वितरण कंपनीने सुधारीत देयके त्वरित पाठवून रहीवाशांना ही देयके टप्याटप्याने भरण्यासाठी मुदतही वाढवून देणे आवश्यक आहे. ज्या रहीवाशांनी कोरोना काळात वीज देयकाचा भरणा केला आहे, त्यांना पुन्हा नव्याने तीच देयके पाठविण्यात आल्याने वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार निदर्शनास आला आहे. देयके भरूनही पुन्हा भरण्यासाठी ग्राहकांना सांगणे हा कोणता न्याय आहे? ग्राहकांना सुधारीत देयके पाठवून मुदत द्यावी व चुकीचे देयके मागे घेवून देयके भरलेल्यांना मानसिक त्रास देण्याचे उद्योग थांबवावेत. मीटर रिडींग न करता अव्वाच्या सव्वा वीजदेयके पाठविणे हा वीज कंपनीने गाठलेला अमानुषतेचा कळस असून आपण प्रभागातील जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी गणेश भगत यांनी केली आहे.