सध्या काश्मिरपासून ते थेट कन्याकुमारीपर्यत कोरोना व्हायरसचीच चर्चा सुरू आहे. या आजाराने देशाचा कानाकोपरा व्यापला आहे. देशाच्या अर्थकारणाला कोरोनामुळे पूर्णपणे खिळ बसलेली आहे. रेल्वेसेवा, विमानसेवा. स्थानिक वाहतूक सेवा ठप्प आहे. कंपन्या, कारखाने बंद आहे. अनेकांचे रोजगार जावून त्यांच्यावर बेरोजगारीची पाळी आलेली आहे. अनेकांच्या पगारामध्ये खासगी क्षेत्रातील कंपन्या, कारखान्यांनी कपात केलेली आहे. ही कपात दहा टक्क्यापासून ते थेट ५० टक्क्यांपर्यत आहे. देशातील महान उद्योजक रतन टाटा यांनी दोन महिन्यापूर्वीच भारतीयांना सांगितले होते की, आता विकासासाटी नाही तर जगण्यासाठी, अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करा. याचाच अर्थ कोरोनामुळे देशामध्ये किती भयावह उलथापालथी होणार आहेत, याचा साक्षात्कार महान उद्योजक रतन टाटांना झाला असावा.
२० मार्चपासून कोरोनाच्या उद्रेकामुळे आपल्या देशाचे अर्थकारण मंदावले आहे. आजही अधिकाश कंपन्या व कारखान्यांना मार्चच्या मध्यावर लागलेले टाळे अजूनही कायम आहे. नोकरदार वर्ग घरात शांतपणे बसून आहे.अनेकांचे रोजगारच गेल्याने ते कोरोना काळातही ओळखीच्या माध्यमातून बायोडाटा पाठविण्यात व्यस्त आहेत. मिळेल ते काम करण्याची आता त्यांची मानसिकता आहे. अनेकांच्या वेतनातच कपात झाल्याने संसार चालविण्याचे अग्निदिव्य कसे पेलवायचे या समस्येच्या विळख्यात ते चिंताग्रस्त झाले आहेत.
जुलै महिना सुरू झाल्याने शाळा सुरू झाल्या नसल्या तरी अनेक शाळांनी विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन वर्ग सुरू केले आहे. पालकच कोरोनामुळे कफल्लक झाल्याने फी भरण्याची त्यांची सध्या आर्थिक क्षमता नाही. शाळांनाही सर्व परिस्थिती माहिती असल्याने शाळा व्यवस्थापण फीसाठी तगादा लावत नाही. केवळ ज्यांची आर्थिक क्षमता आहे, त्यांनी फी भरा आणि ज्यावेळी वातावरण निवळेल, त्यावेळी उर्वरित पालकांनी फी भरण्याला प्राधान्य द्यावे, अशी विनंती शालेय व्यवस्थापनाकडून पालक वर्गाला सतत केली जात आहे. सानपाड्यातील रायन इंटरनॅशनल शाळेने मात्र बुधवारी, दि. १ जुलैपासून ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली नाही, त्यांना ऑनलाईन वर्गात बसू दिले नाही. फी भरा तरच मुलांना ऑनलाईन शिक्षण दिले जाईल, अशी ताठर भूमिका रायन इंटरनॅशनल शाळेच्या व्यवस्थापणाने घेतली आहे. त्यातच पालकांना शाळेत भेटावयास जाणाऱ्या पालक वर्गाला थातूतमातूर व उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. फी भरा, नंतरच मुलांना ऑनलाईन वर्गामध्ये सामावून घेवू अशी भूमिका शालेय व्यवस्थापणाची, प्राचार्याची व तेथील शिक्षकांची आहे. पालक वर्ग हतबल झालेला आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी आर्थिक ऐपत नसतानाही मुलांच्या शिक्षणात अपव्यय नको म्हणून पालकांनी ईकडेतिकडे उसनवारी करून मोबाईल घेतल्याचे तेथील पालकांशी चर्चा करताना समजले. सरकार व न्यायालयानेही कोरोना काळात मुलांची कोणत्याही प्रकारची शैक्षणिक कोंडी करू नका असे स्पष्टपणे निर्देश दिलेले असतानाही सानपाड्यातील रायन इंटरनॅशनल शाळेने आपली मुजोर भूमिका कायम ठेवलेली आहे. पालक वर्गाला सध्या रोजच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागत असतानाच त्यांच्याकडे आता फी भरण्यासाठी पैसेही नाहीत. बरे, कोणाकडे उसने मागण्याची सध्याची परिस्थिती नाही, कोरोनामुळे येथे प्रत्येकजण हतबल झालेला आहे. उसनवारी मागूनही फायदा नाही, कारण उसने पैसे मागितले तर मिळण्याची शक्यता नाही. घरातील दागिने गहान ठेवायचे झाले तर सोनाराची दुकानेही बंद आहे. खासगी सावकारांनीही सध्या खासगी सावकारी बंद केली आहे. कारण कोरोना संकटामुळे व्याज तर सोडा पण मुद्दलही परत मिळण्याची शक्यता नसल्याने खासगी सावकारांनी आपला हात आखडता घेतल्याने सानपाड्यातील रायन शाळेचा पालक आता हतबल झाला आहे.
केवळ आपल्या पालकांकडे पैसे नसल्याने आपले शिक्षण थांबल्याचा समज आता मुलांचा झाल्याने मुलांचा सामना करण्यास रायन इंटरनॅशनलच्या पालकांना खजिल वाटू लागले आहे. कोरोना जावू द्या, आम्ही काहीही करू असा टाहो पालकवर्गाने फोडूनही रायन इंटरनॅशनलच्या व्यवस्थापणाला, प्राचार्याना व शिक्षकांना पाझर फुटलेला नाही. या शाळेकडून विद्यार्थ्यांवर व पालकांवर होत असलेला अन्याय पाहून सर्वप्रथम सानपाडा परिसरातील भाजपचे नेते पांडूरंग आमले हे धावून गेले. त्यांनाही सुरूवातीला शाळेत प्रवेश नाकारला, प्राचार्याची भेट करून देण्यास नकार दिला. तथापि पांडूरंग आमले यांनी प्राचार्याची भेट होत नाही तोपर्यत आपल्या शाळेच्या प्रवेशद्वारापासून आपण हटणार नाही अशी भुमिका घेत शाळेचे प्रवेशद्वारालगतच ठाण मांडले. तथापि शाळेने ताठर भूमिका कायम ठेवली. आमलेंनी पालकांची व पालकांनी आमलेंची साथ कायम ठेवली. शाळेने दुसऱ्या दिवशी आमलेंना व पालकांना निवेदन घेवून येण्यास सांगितले.
तथापि भाजपचे पांडूरंग आमले नि:स्वार्थी भावनेने पालकांना मदत करत होते. त्यांच्या पाठपुराव्यातून हा प्रश्नही तडीस गेला. आमलेंनी या विषयाचे कोठेही राजकारण केले नाही अथवा स्वत:ची मार्केटींगही केली नाही. त्यांनी शाळेला ठणकावून सांगितले होते की, सानपाडा विभागात सर्वाधिक डोनेशन व फी केवळ तुमच्याच शाळेकडून घेतले जात आहे. आता कोरोना काळ आहे. पालक हतबल झाले आहेत. सर्व पालक तुमची फी भरतील, आजवर त्यांनी भरली आहे, आता का भरणार नाहीत, तुम्ही परिस्थिती समजून घ्या अशी भूमिकाही प्राचार्यासमोर मांडली.
दुसऱ्या दिवशीही शाळेने फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात बसू न दिल्याचे समजताच संतप्त झालेल्या भाजप नेते पांडूरंग आमले यांनी सकाळीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि नवी मुंबईचे पोलिस आयुक्त यांना निवेदन पाठवून समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. (आमलेंच्या निवेदनानंतर तब्बल पाच तासांनी त्या परिसरातील इतर राजकीय घटकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदने सादर केली.) पोलीस आयुक्तांनीही आमलेंच्या निवेदनातील गांभीर्य जाणून घेताना अवघ्या दहा मिनिटाच्या आत ते निवेदन डिसीपींना फॉरवर्ड करून प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी पालकांसमवेत जावून शाळेला आमलेंनी निवेदनही सादर केले. शाळेसमोर पालकांनीही कोरोना ओसरताच फी भरण्याचे मान्य केले व मुलांना परत ऑनलाईन वर्गात सामावून घेण्यात आले.
आमलेंना या प्रकरणात पालकांचा मनापासून पाठिंबा मिळाला. बिगर राजकीय स्वरूप या आंदोलनाला आमलेंनी देत पालकांना न्याय मिळवून दिला. आमलेंचा समजूतदारपणा पाहत शाळेंनीही दोन पावले मागे घेण्याचा सकारात्मक प्रतिसाद दिला. अन्य राजकारण्यांनीही पाठपुरावा केला. परंतु सुरूवातीपासून शेवटपर्यत या प्रकरणात आमलेंनी पाठपुरावा केल्याने प्रकरण न चिघळता शांततेत तोडगा निघाल्याने पालकांनीही मान्य केले.
दोन दिवसात भाजपच्या पांडूरंग आमलेंच्या व अन्य राजकीय घटकांच्या प्रयत्नामुळे अवघ्या दोन दिवसात हे प्रकरण तडीस गेले असले तरी कोरोना काळात सानपाड्याच्या रायन इंटरनॅशनल शाळेने केलेला उद्योग प्रसिध्दीमाध्यमांमुळे सर्वत्र पोहोचला. मुळातच सध्या कोरोना काळ असताना मुलांकडे फीसाठी तगादा लावून त्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे धाडस रायन इंटरनॅशनलने दाखविलेच कसे? हा संतापजनक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. मान्य आहे की, या शाळांना सरकारचे अनुदान नसते. शिक्षकांचे तसेच बिगर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे असतात. शाळेचे वीज बिल असते. मुलांच्या फीमधूनच हे खर्च भागविले जातात. पालकांनी तीन महिने फी न भरल्याने शालेय व्यवस्थापणाची आर्थिक कोंडी झाले असणार, या सर्व गोष्टी मान्य आहे. पण कोणत्याही पालकांने जाणिवपूर्वक फी भरली नाही अशातला प्रकार या प्रकरणात नाही. आजवर शाळेने कमविलेले डोनेशन व घेतलेली फी इतक्यात संपली का, शाळा इतकी हतबल झाली का, हेही प्रश्न येथे उपस्थित होतात. कोणत्याही समस्येवर विचारविनिमयाने तोडगा काढणे शक्य आहे. तथापि मुलांना ऑनलाईन शिक्षणापासून फी भरली नाही म्हणून वंचित ठेवणे योग्य नाही. हा अमानुषतेचा कळस आहे. उद्या आपल्याला फी भरता आली नाही म्हणून शाळेने मुलाला ऑनलाईन वर्गातून काढले यामुळे मनावर परिणाम होवून कोणत्या पालकाने आत्महत्या केली असती तर शाळेने तो पालक विद्यार्थ्यांना भरून दिला असता का? अथवा संतप्त पालकांनी मुलाला ऑनलाईन वर्गाला बसू दिले नाही म्हणून कायदा व सुव्यवस्था हाती घेत शाळेतील प्राचार्य व शिक्षकांना मारहाण केली असती तर प्रकरण किती चिघळले याचाही शाळेने तडकाफडकी निर्णय घेताना विचार करावयास हवा होता. फी भरण्यास पालकांनी कधीही नकार दिलेला नाही. फक्त त्यांना मुदत हवी आहे, सध्या कोरोनामुळे पालक हतबल झाले आहेत. चला या प्रकरणाचा अंत झाला, यातच समाधान आहे. परंतु केवळ फी भरली नाही म्हणून मुलांना ऑनलाईन वर्गाला बसू न देणे या तुघलकी निर्णयाचे कोणीही समर्थन करणार नाही. या प्रकरणात मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कोणालाही नैतिक अधिकार नाही. रायन इंटरनॅशनल यापुढे असा प्रकार करताना शतदा विचार करावा. कोरोनामुळे सर्वाचीच मानसिकता विचित्र झालेली आहे. एकवेळच्या अन्नासाठी आता संघर्ष करावा लागत आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान कोणताही पालक होवू देणार नाही, याचे भान रायन इंटरनॅशनल शाळेला असणे आवश्यक आहे. घडला प्रकार माणूसकीला काळीमा फासणारा आहे. आजवर रायनने कमविलेले डोनेशन व फीचा हिशोब घेतला तर ही शाळा निश्चितच तोट्यात नाही. या प्रकरणात पालकांसाठी धावपळ करणाऱ्या पांडूरंग आमले, नितीन चव्हाण, सोमनाथ वास्कर व अन्य सर्वच घटकांचे मनापासून आभार यानिमित्ताने मानणे आवश्यक आहे.