सौ. सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबईतील वाढत्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर मांडवेंनी केली विस्तृत चर्चा
नवी मुंबई : शिवसेनेचे माजी नगरसेवक व माजी पालिका पक्षप्रतोद आणि शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवे यांनी शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेवून विस्तृतपणे चर्चा केली.
पालिका आयुक्त बांगर यांच्याशी झालेल्या चर्चेत शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवे यांनी
१) महापालिका प्रशासनाकडून दररोज कोरोना रूग्णांची आकडेवारी प्रसिध्द होते. तथापि प्रशासनाने आकडेवारी जाहिर करताना सौम्य, अतिसौम्य, मध्यम या तीन प्रकारातील कोरोना रूग्णांची आकडेवारीही त्यात नमूद करावी. जेणेकरून नवी मुंबईकरांमध्ये असलेली भीती कमी होईल. नागरिक केवळ आकडेवारी पाहूनच भयभीत होत आहेत. आपण सौम्य, अतीसौम्य व मध्यम असे प्रसिध्दीस दिले तर वस्तूस्थिती समजण्यास मदत होईल.
२) आकडेवारी जाहिर करताना नवी मुंबईतील कोणत्या रूग्णालयात किती जागा कोरोना रूग्णांसाठी जागा शिल्लक आहे, कोणकोणत्या रूग्णालयात किती आयसीयू बेडस आहेत याचीही दैनंदिन आकडेवारी प्रसिध्द केल्यास रूग्णांना उपचारासाठी धावपळ करावी लागणार नाही.
३) प्रशासनाकडून नवी मुंबई शहरातील कोविड व बिगर कोविड रूग्णालयाची यादी वरचेवर प्रसिध्द करावी. जेणेकरून बिगर कोविड रूग्णांना उपचारासाठी धावपळ करावी लागणार नाही आणि योग्य रूग्णालयांमध्ये कमी वेळेत पोहोचणे शक्य होईल.
४) कोरोनाच्या भीतीमुळे कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजनची गरज लागते, परिणामी आयसीयू बेड लागतात. अनेक रूग्णालयात आयसीयू बेडस उपलब्ध होत नाही. पालिकेने वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर, आगरी-कोळी भवन, बेलापुरचे वारकरी भवन या ठिकाणी पालिका प्रशासनाने जास्तीत जास्त आयसीयूची व्यवस्था स्वतंत्ररित्या करावी, जेणेकरून रहीवाशांची गैरसोय होणार नाही.
५) सरकारची महात्मा फुले योजना कोविड रूग्णांसाठी कॅशलेस म्हणून वापरावी. कोरोनामुळे रूग्ण भयभीत असतात. उपचार घेतानाही ते चिंताग्रस्त असतात, त्यामुळेच त्यांना ऑक्सिजन व आयसीयूची गरज भासते. ते उपचारादरम्यान डिसचार्ज घेताना पैसाची कोठे जमवाजमव करणार? या पार्श्वभूमीवर सरकारची महात्मा फुले योजना कॅशलेस झाल्यास रूग्णांना दिलासा मिळेल. यासाठी आपण प्रशासनाच्या माध्यमातून संबंधितांकडे प्रयत्न करावेत.
६) नवी मुंबईतील डोंगराळ परिसर, खाण परिसर, झोपडपट्टी, स्लम परिसर, गावठाण परिसर, एलआयजी वसाहती, एपीएमसी मार्केट, चाळी व दाटीवाटीची रहीवाशी परिसर या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून अॅण्टीजेनच्या माध्यमातून कोरोना अभियान राबवावे. तात्काळ कोरोना रूग्णांची माहिती मिळून उपचारास सुरूवात करता येईल. त्यामुळे कोरोनाची चैन तोडणे आपणास शक्य होईल.
७) पालिका प्रशासनाकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. कोरोना काळात व साथीच्या आजाराची शक्यता पाहता रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही. खासगी संस्था व सामाजिक कार्यकर्ते रक्तदान शिबिरे आयोजित करतात, पण त्यांना मर्यादा पडतात, या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने स्वत: रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेतल्यास रक्तदाते स्वत:हून रक्तदानास बाहेर पडतील.
८) पालिका प्रशासनाकडून आर्सेनिक गोळ्यांचे वितरण करण्यात यावे. त्या गोळ्यांचे वितरण पालिका प्रशासनाकडूनच करण्यात यावे.
९) कोरोना काळात पालिका प्रशासनाचा आरोग्य विभाग, डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार तसेच अत्यावश्यक सेवेतील कामगार नवी मुंबईकरांसाठी देवासमान आहेत. कायम कामगारांसाठी कोरोना काळात मृत झाल्यास जी मदत मिळते, त्याचधर्तीवर कंत्राटी कामगारही मृत झाल्यास कोरोना काळात मिळणारी मदत त्यांच्याही परिवाराला देण्यात यावी.
या विषयावर विस्तृत चर्चा केली व आयुक्त बांगर यांना निवेदनही सादर केले.