सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : नेरूळ नोडमधील प्रभाग ९६ मधील कोरोना पार्श्वभूमीवर स्थानिक रहीवाशांच्या समस्या तसेच पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रलंबित असलेल्या नागरी समस्यांबाबत गणेश नाईक समर्थक असलेले जनसेवक गणेश भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेवून त्यांच्यांशी चर्चा केली. आयुक्तांनी समस्या समजावून घेवून त्या सोडविण्यासाठी सकारात्मक आश्वासनही दिले. यावेळी कोरोना समस्यांबाबत व प्रभागातील नागरी समस्यांबाबत गणेश भगत यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांना विस्तृतपणे एक निवेदनही सादर केले.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात गणेश भगत यांनी सुरूवातीलाच, नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात नेरुळ नोडमधील प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६,१६ए, १८ या विभागाचा समावेश होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून आम्हाला सहकार्य मिळत नसल्याचे स्पष्टपणे सांगत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
गणेश भगत यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनामध्ये प्रभागातील सोसायटीतील सदनिकांमध्ये अथवा रो-हाऊसमध्ये कोरोना रूग्ण सापडल्यास पालिका प्रशासनाकडून कधीही वेळेवर संबंधित ठिकाणी जंतुनाशक फवारणी (सॅनिटायझेशन) केली जात नाही, अनेकदा केलीच जात नाही. यामुळे आम्हाला अनेकदा स्थानिक रहीवाशांच्या जिवित रक्षणासाठी स्वखर्चाने जंतुनाशक फवारणी करावी लागत आहे. कोरोना रूग्ण आढळल्यास त्यास उपचारासाठी आम्हाला पालिकेत जागा भेटत नाही. ऑक्सिजन व व्हेन्टिलेटरही उपलब्ध होत नाही. करदात्या नागरिकांच्या उपचारासाठी आम्ही पाठपुरावा करतो, त्यामागे आमचा व्यक्तिगत स्वार्थ नसतो, परंतु ज्या ठिकाणी आम्हाला व्हेटिंलेटरसाठी नाही म्हणून सांगितले जाते, त्याच ठिकाणी थोड्या वेळात अन्य राजकारण्यांना व्हेटिंलेटर कसे उपलब्ध होते? मग आम्ही संतप्त होवुन पालिका रूग्णालयाची अथवा सिडको एकल्झिबिशन सेंटरची तोडफोड करायची का? पालिका दररोज कोरोना रूग्णांची आकडेवारी प्रसिध्द करते. परंतु या आकडेवारीसोबत दररोज पालिका रूग्णालयात कोरोना रूग्णांसाठी किती जागा शिल्लक आहे, व्हेटिंलेटर किती जागा आहेत याचीही दररोज यादी प्रकाशित केल्यास नवी मुंबईकरांना धावपळ करावी लागणार नाही. नवी मुंबई शहरातील खासगी रूग्णालयांवर पालिकेचा काहीही अकुंश नाही. भरमसाठी बिल आकारले जातात. केवळ मेडीक्लेम आहे म्हणून लयलुट सुरू आहे. बिलामध्ये बेड जास्त लावणे, एकाच घरातील सदस्य एकाच रूममध्ये असले तरी प्रत्येकाला पीपीकिटचा खर्च जास्त लावणे, अनेकदा लहान मुलांना केवळ पोट साफ होण्यासाठी जुलाबाच्या गोळ्या दिल्या जातात, बाकी काही नाही. बिल मात्र ५५ ते ७० हजार सहा ते सात दिवसाकरिता आकारतात. लयलुटीने त्रस्त झालेल्या ग्राहकांसाठी पालिकेने प्रत्येक विभाग अधिकारी कार्यालयात स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष स्थापन करणे आवश्यक आहे. प्रभागात आजही धोकादायक वृक्ष व ठिसूळ फांद्या कायम आहेत. त्यामुळे लवकर छाटणी न झाल्यास जिवित व वित्तहानी होण्याची भीती आहे. पदपथावर शेवाळ पसरून पदपथ निसरडे झाले आहेत. पादचाऱ्यांना अपघात होण्याची भीती आहे. पालिका प्रशासनाला ब्लिचिंग पावडर टाकून सफाई करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. तथापि पालिका प्रशासनाकडून सहकार्य मिळत नाही. दुर्घटना झाल्यावर कार्यवाही होणार आहे काय? पथदिवे गेल्या काही दिवसापासून बंद आहेत. काही ठिकाणी दिवसाआड बंद असतात. लोकांना अंधारात ये-जा करावी लागते. आता प्रशासक असले तरी लोक नगरसेवक काम करत नाही म्हणून आमच्यावर नाराज होतात. पालिका काम करत नाही, खापर मात्र आमच्यावर फोडले जाते. पावसाळीपूर्व कामाचा एक भाग म्हणून जी नालेसफाई केली जाते, ती व्यवस्थित होत नाही. आजही गटारांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा तुंबलेला दिसून येतो. दैनंदिन मार्केट परिसराची दररोज स्वच्छता होत नसल्याने त्या ठिकाणी कायमच बकालपणा पहावयास मिळतो. प्रभागात डेब्रिज ठिकठिकाणी आहे. ते उचलण्याबाबत पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून सहकार्य मिळत नाही, आदींचा उहापोह केला आहे. आयुक्तांनी सर्व समस्या जाणून घेताना त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे सकारात्मक संकेत गणेश भगत यांना दिले.