
नवी मुंबई : मार्च २०२० च्या सुरुवातीलाच मुंबई, नवी मुंबई, रायगड व ठाणे जिल्ह्यात परदेशातून परतलेल्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. हळूहळू या रोगाचा संसर्ग स्थानिकांना होण्यास सुरवात झाली. प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारतात कोरोनाची लागण वेगाने झाली. अपूरी माहिती, नवखी उपचार पद्धती, अनाकलनीय आजारांची लक्षणे यामुळे सर्वच ठिकाणी चिंता व भयप्रद वातावरण निर्माण झाले होते.
स्थापनेपासूनच सर्वसामान्यांचे रुग्णालय असा विश्वास संपन्न केलेल्या डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयाने या संकटकाळात शासनाला सर्वतोपरी सहकार्य करत हरतऱ्हेचा पुढाकार घेतला आहे. नवी मुंबईतील डॉ. डी. वाय पाटील समूहाचे अध्यक्ष डॉ विजय पाटील यांच्या पुढाकाराने रुग्णालयात कोरोना संकटाचे गांभीर्य पाहता तातडीने रोगनिदान व उपचार सुरू करण्यात आले. याशिवाय समाजातील सर्व घटकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी, नवी मुंबईतील शहरी वा गावठाण तसेच झोपडपट्टी अशा सर्वच भागात रुग्णालयातील डॉक्टरांसह नवी मुंबई महापालिकेच्या साहाय्याने स्क्रिनिंग कॅम्प भरविण्यात आले. त्याबाबत जनजागृती करण्यात आली. त्यास सकरात्मक प्रतिसाद मिळत गेला. कोरोनाने धारण केलेले गंभीर स्वरूप व त्यामुळे सातत्याने वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन, नवी मुंबई, पनवेल व ठाणे या तीन महापालिकांच्या हद्दीतील नागरिकांसाठी व पोलिस बांधवांसाठी डॉ. डी वाय पाटील रुग्णालयात बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभागात आजपर्यंत ३ हजारहून जास्त रुग्णांवर उपचार केले गेले आहेत. याशिवाय रुग्णालयातील अतिदक्षता व स्क्रिनींग विभागात २० हजारांहून जास्त रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. दररोज तपासणी केलेल्यांत भर पडत असून यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या ‘ब्रेक दि चेन’ या उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे. ३०० बेडच्या आयसीयूद्वारे तीनही महापालिका क्षेत्रातील रहिवाशांना व मुंबई, पनवेल, रायगड परिसरातील बऱ्याच रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय नॉन कोविड व इतर आजारांवरसुद्धा अशा कठीण परिस्थितीत, रुग्णालयाचे सीईओ, डीन यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग, स्त्रीरोग विभागासहीत सर्व विभाग चालू ठेवून तज्ञांद्वारे रुग्णांना उपचारांतून दिलासा देण्यात येत आहे.
- यापुढेही साथरोग संकट काळात वैद्यकीय कर्तव्यास कायम प्राधान्य राहील- डॉ विजय पाटील
नवी मुंबई, पनवेल आणि ठाणे महापालिकेच्या सर्व रहिवाशांवर ओढवलेल्या साथरोगामुळे व उदभवलेल्या वैद्यकीय संकटाच्या लढ्यात डॉ. डी वय पाटील रुग्णालय खंबीर आहे. रुग्णांना सर्वतोपरी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत आहोत. डॉ. डी वाय पाटील रुग्णालयाचा सर्वसामान्यांचे रुग्णालय हा विश्वास अधिक दृढ व्हावा यासाठी काटेकोरपणे काळजी घेत आहोत. रुग्णालयातील व्यवस्थापकीय टीम व डॉक्टरांच्या सहकार्याने रुग्णांना मदत करु शकलो याचा मला आनंद वाटतो. महापालिका आयुक्तांचे सहकार्य वेळोवेळी मिळत असून त्यांच्या सहकार्याने केले जाणाऱ्या उपययोजना व उपक्रम योग्य पद्धतीने सुरू आहेत. यापुढेही साथरोग संकटकाळात वैद्यकीय कर्तव्यास कायम प्राधान्य राहील अशी प्रतिक्रिया डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ विजय पाटील यांनी दिली.