
नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील केशरी शिधापत्रिकाधारकांचे ऑनलाईनमध्ये नाव नसेल व पांढरी शिधापत्रिकाधारकांना उत्पन्नाचा दाखला देवून किमान २ महिने महापालिकेमार्फत धान्य उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेनेच्या माजी नगऱसेविका सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात केशरी शिधापत्रिकाधारकांची संख्या लक्षणीय आहे. तथापि ऑनलाईन प्रक्रियेत या शिधापत्रिकाधारकांची नावे नाहीत. त्यामुळे कोरोना काळात ऱाज्य सरकारकडून वितरीत करण्यात आलेल्या स्वस्त दरातील धान्य योजनेचा लाभ मिळाला नाही. याशिवाय अनेकांची आता आर्थिक परिस्थिती नसतानाही पूर्वीच्या उत्पन्नाच्या आधारावर त्यांच्याकडे पांढरे रेशनकॉर्ड आहे. परंतु सेवानिवृत्त पेन्शनवर त्यांना उदरनिर्वाह करावा लागत आहे. असे असतानाही केवळ मागील उत्पन्नाच्या आधारावर त्यांच्याकडे पांढरे रेशनकार्ड आहे. त्यामुळे त्यांची आता शिधापत्रिकेवरील धान्य न मिळणे, कोणत्याही सोयीसवलतींचा लाभ न मिळणे अशी कोंडी होत आहे. आपण आमच्या म्हणण्यामागील सत्यता जाणून घेतल्यास केशरी व पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांची होत असलेली ससेहोपट आपल्या निदर्शनास येईल. नवी मुंबईतील पांढऱ्या रेशनकार्डधारकांना सध्या नव्याने उत्पन्नाचा दाखला काढण्यास सांगून त्यांनाही शिधावाटप योजनेत समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी शिवसेनेच्या सुनिता मांडवे यांनी केली आहे.
महापालिका प्रशासनाने शहरातील एनओजींनाही आवाहन करून त्यांना नवी मुंबईतील केशरी व पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांनाही महापालिकेच्या माध्यमातून धान्य वितरीत करण्याचे आवाहन करावे. आपण स्वत: याकामी पुढाकार घेवून केशरी शिधापत्रिकाधारकांचे ऑनलाईनमध्ये नाव नसेल व पांढरी शिधापत्रिकाधारकांना उत्पन्नाचा दाखला देवून किमान २ महिने महापालिकेमार्फत धान्य उपलब्ध करून देणेबाबत अभियान लवकरात लवकर सुरू करून कोरोना काळात संबंधितांना दिलासा देण्याचे काम करावे व संबंधितांना महापालिकेच्या माध्यमातून प्रती माणसी दर महिन्याला ५ किलो तांदूळ, ५ किलो गहू, १ किलो तुरडाळ देण्याची व्यवस्था लवकरात लवकर करावीअसे सुनिता मांडवे यांनी केली आहे.