
नवी मुंबई– “स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण 2020” मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस देशातील स्वच्छ शहरांमध्ये “तृतीय” क्रमांकाचा पुरस्कार आज ऑनलाईन ‘स्वच्छ महोत्सव’ समारंभात केंद्रीय नागरी विकास मंत्री ना.हरदीपसिंह पुरी यांनी जाहीर केला.
मंत्रालयामधून महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक व माजी प्रधान सचिव मनिषा म्हैसकर तसेच नवी मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर, माजी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे आणि इतर मान्यवर या स्वच्छ महोत्सव समारंभात ऑनलाईन सहभागी झाले होते.
सध्याची कोरोना प्रभावित परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारच्या नागरी कार्य व गृहनिर्माण मंत्रालयाच्या (MoHUA) वतीने या स्वच्छ महोत्सव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन ऑनलाईन करण्यात आले होते.
या स्वच्छ महोत्सवात ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ मध्ये सहभागी संपूर्ण देशभरातील 4 हजाराहून अधिक शहरांमधून नवी मुंबई शहराला देशातील ‘तृतीय’ क्रमांकाचे स्वच्छ शहर तर महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून गौरविण्यात आले आहे.
‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार रेटींग प्राप्त करणा-या देशातील 6 शहरांमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील ‘फाईव्ह स्टार मानांकन’ प्राप्त एकमेव शहर आहे. तसेच हागणदारीमुक्त शहरांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस ‘ओडीएफ डबल प्लस रेंटिंग’ प्राप्त आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने दरवर्षी राज्यातील प्रथम क्रमांक कायम राखत राष्ट्रीय स्तरावरील मानांकन नेहमीच उंचावत नेले आहे. हीच परंपरा यावर्षीही कायम राखत गतवर्षी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2019’ मध्ये देशातील सातव्या क्रमांकाचे मानांकन यावर्षी 4 क्रमांकांनी उंचावत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ मध्ये देशातील तृतीय क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून झेप घेतली आहे.हा पुरस्कार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी एकात्म भावनेने केलेल्या स्वच्छताविषयक जाणीवांचा व प्रत्यक्ष स्वच्छता कार्याचा असल्याचे सांगत आयुक्त अभिजीत बांगर यांनी हा राष्ट्रीय बहुमान समस्त स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांना समर्पित केला आहे.
केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन मार्फत सुरू केलेल्या स्वच्छता ॲपवरही नागरिक प्रतिसादाची नोंद घेण्यात आली होती. तसेच स्वच्छ भारत मिशनच्या राष्ट्रीय केंद्रातून कोणत्याही नागरिकास दूरध्वनी करून शहरातील स्वच्छतेविषयी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे 1969 या टोल फ्री क्रमांकावरून तसेच वेब पोर्टलवरूनही स्वच्छताविषयक प्रश्नावलीतून नवी मुंबईतील नागरिकांचे अभिप्राय जाणून घेण्यात आले होते. नवी मुंबई महानगरपालिकेने केलेले स्वच्छताविषयक काम व त्याला नागरिकांना सकारात्मक प्रतिसाद देत दिलेला सक्रिय सहभाग यामुळेच नवी मुंबई महानगरपालिकेस देशातील तृतीय क्रमांकाच्या शहराचा बहुमान प्राप्त झाला आहे.
घरात निर्माण होणा-या कच-याचे ओला व सुका असे घरातच वर्गीकरण करून कचरा गाड्यांमध्ये वेगवेगळा देण्यात तसेच कचरा वाहतुकीसाठी अत्याधुनिक आर.एफ.आय.डी. तंत्रप्रणाली राबविण्यात नवी मुंबई नेहमीच आघाडीवर होती. तुर्भे एम.आय.डी.सी. येथील शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी खत व प्लास्टिक ग्रॅन्युल्स तसेच फ्युएल पॅलेटस् निर्मिती प्रक्रिया केली जात असून आता बांधकाम, पाडकाम कचरा अर्थात डेब्रिजच्या सुयोग्य विल्हवाटीसाठी सी अँड डी वेस्ट प्लान्ट कार्यान्वित करीत घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणा-या अनेक सोसायट्या, उद्योग, हॉटेल्स, उद्योग समूह यांनी आपल्या आवारातच ओल्या कच-यापासून खत प्रकल्प कार्यान्वित केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळा तसेच उद्यानांमध्येही खत प्रकल्प सुरू करण्यात आले. झोपडपट्टी भागात ‘झिरो वेस्ट स्लम मॉडेल’ हे राम नगर, दिघा येथे यशस्वीरित्या राबविण्यात आले.
जूनी क्षेपणभूमी शास्त्रोक्त रितीने बंद करून त्याठिकाणी फुलविण्यात आलेल्या निसर्गोद्यानात साकारलेली ‘स्वच्छता पार्क’ ही अभिनव संकल्पना 1 लाखाहून अधिक नागरिकांनी विशेषत्वाने मुलांनी भेट देऊन यशस्वी केली. शहरातील साफसफाई विहीत वेळेत व योग्य रितीने केली जात असल्याचे निरिक्षण व नियंत्रण करण्यासाठी राबविलेली ‘स्मार्ट वॉच’ संकल्पना उपयोगी ठरली.
“स्वच्छ सर्वेक्षण 2020” मध्ये “माझा कचरा – माझी जबाबदारी” या भूमिकेतून व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात आली. त्यामुळे विविध उपक्रमांतून शहरात स्वच्छतेची चळवळ उभी राहिली. यामध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार यांच्याप्रमाणेच लोकप्रतिनिधींचाही सक्रीय सहभाग लाभला. विविध विभांगामध्ये राबविलेल्या स्वच्छताविषयक अनेक उपक्रमांतून तसेच चित्रकला, निबंध, वक्तृत्व, शॉर्टफिल्म्स, गणेशोत्सव, स्वच्छ सोसायटी – रुग्णालय – शाळा महाविद्यालय – हॉटेल्स अशा स्पर्धा, रॅली, स्वच्छता मोहिमा अशा विविध कार्यक्रमांमध्ये नवी मुंबईकर नागरिक मोठ्या संख्येने सक्रीय सहभाग झाले व सर्वांनी मिळून शहरात स्वच्छतेचा जागर केला.
या स्वच्छता कार्यात तत्कालीन महापौर व सर्व लोकप्रतिनिधी तसेच तत्कालीन आयुक्त यांचेसह महापालिका अधिकारी-कर्मचारी, विशेषत्वाने सफाई कामगार आणि स्वच्छतेविषयी जागरूक प्रौढ, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, स्वच्छता सैनिक असलेले विद्यार्थी, मुले, विविध संस्था-मंडळे अशा सर्व घटकांनी आपले अमूल्य योगदान दिलेले असून त्या सर्व नागरिकांचे अभिनंदन करीत यापुढील काळात कोरोनाशी लढाई लढत असताना आरोग्याशी संबंधित असणारा स्वच्छतेसारख्या महत्वाच्या विषयाकडे अधिक जागरूकतेने लक्ष देत हे मानांकन उंचावून आपल्या नवी मुंबई शहराला देशात नंबर वन आणण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करूया असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.