
बिहार राज्याच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीकडे देशाच्या राजकीय नजरा खिळल्या आहेत. नितीशकुमार यांना जेडीयू, भाजपा, लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) यांच्यातच प्रामुख्याने लढत आहे. कॉंग्रेस, समाजवादी पार्टी, बसपा, लोजपा हे राष्ट्रीय राजकारणात अस्तित्व दाखविणाऱ्या राजकीय पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी खरी लढत ही प्रामुख्याने जेडीयू-भाजपा युती आणि आरजेडी व मित्र पक्ष यांच्यातच होणार आहे. भाजपाला प्रत्येक राज्यामध्ये तसेच देशामध्ये सत्तासुकाणूमध्ये प्रथम क्रमांक पटकावण्याची असलेली महत्वाकांक्षा जगजाहिर आहे. भाजपाने देशाच्या कानाकोपऱ्यात आपली राजकीय पाळेमुळे विस्तारताना त्या त्या देशामध्ये मित्र पक्ष शोधले, आपला विस्तार केला, नंतर त्याच पक्षांना कमजोर करत त्यांचे त्या त्या राज्यात थडगे उभारण्यास भाजपाने कोणतीही दयामाया दाखविली नसल्याची अनेक राजकीय उदाहणे देशात पहावयास मिळतात. सत्तेसाठी भाजपाला कोणताही राजकीय पक्ष अस्पृश्य नाही हे भाजपाने अनेक राज्यात सत्ता मिळविताना दाखवून दिले आहे. अडवाणी-वाजपेंयीची भाजपा आणि मोदी-शहांची भाजपा यात आता जमिन आसमानचा फरक पहावयास मिळत आहे. अडवाणी व वाजपेयी यांची भाजपा जनाधाराचा आदर करणारी होती, तर मोदी-शहांची भाजपा सत्तासंपादनाची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी अन्य पक्षसंघटना फोडण्याला, अन्य पक्षातील नेतेमंडळींना खेचण्यात, संख्याबळ वाढविण्यात कोणाचीही मुलाहिजा बाळगत नसल्याचे अलिकडच्या काळात अनेक राजकीय उदाहरणातून स्पष्ट झाले आहे. गोव्यामध्ये एकेकाळी सत्ताधारी असणारा महाराष्ट्र गोमतंक पक्ष. आज त्या पक्षाचे गोव्याच्या राजकारणात फारसे अस्तित्वही पहावयास मिळत नाही. भाजपशी संगत केल्याचे परिणाम गोव्यामध्ये मगोपला भोगावे लागले. आज त्याच गोव्यामध्ये भाजपा सत्तेवर आहे.उत्तर प्रदेशात रामंदिराचा मुद्दा घेवूनही भाजपाला फारसे बहूमत नव्हते. कल्याणसिंगासारखे महारथी असूनही भाजपाला सत्तेसाठी इतरांचा आधार घ्यावा लागत असे. त्यावेळी बसपा अथवा अन्य पक्षांशी युती करून, वेळ पडल्यास अडीच वर्षाचा फॉर्म्यूला वापरून भाजपा उत्तर प्रदेशात सत्ता संपादन करत गेली. आज उत्तर प्रदेशात भाजपा सत्तेवर आहे. सपा व बसपाचा पालापाचोळा उडाला आहे. कॉंग्रेसच्या अस्तित्वालाही घरघर लागलेली आहे. आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थानसह अन्य काही राज्यात भाजपाचा सत्तेकडील प्रवास याच स्वरूपात राहीलेला आहे. इतर राज्यात भाजपाला त्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यात फारसे अडथळे आले नाहीत, त्यांचे नियोजन यशस्वी झाले व त्यातून फोडा व संख्याबळ मिळवून राज्य करा या षडयंत्रीय संकल्पनेला खतपाणी मिळत गेले. भाजपाच्या या रणनीतीला छेद देण्याचे काम महाराष्ट्राने व बिहारने केले आहे. एकेकाळी छोटा भाऊ म्हणून भाजप मोठा भाऊ असणाऱ्या शिवसेनेच्या गळ्यात गळा घालून ‘ही दोस्ती तुटायची नाही’ असे मैत्रीचे गोडवे गात शिवसेनेचा जनाधार कमी करत आपण मोठे भाऊ बनण्याचे स्वप्न भाजपचे पूर्ण झाले, पण शिवसेना मात्र संपली नाही. भाजपच्या या राजकीय रणनीतीला लगाम घालण्यासाठी शिवसेनेने कायम राजकीय विरोधक राहिलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसशी महाविकास आघाडी करत सत्ता मिळविली व भाजपला सत्तेपासून लांब ठेवले. बिहारमध्ये भाजपला स्वबळावर सत्ता मिळणे तुर्तास अशक्य असल्याने त्यांनी जेडीयूची साथ धरली आहे. यापूर्वी जेडीयू व भाजपात मतभेद होवून वादही झाले होते. मागील विधानसभा निवडणूक जेडीयू व आरजेडीने एकत्र लढवून सत्ताही मिळविली होती. तथापि आरजेडीशी जेडीयूचे मतभेद होताच भाजपाने जेडीयूला पाठींबा देत मैत्री पुन्हा घट्ट करण्याचे संकेत दिले. भाजपा हा विश्वासपात्र मित्र पक्ष नसल्याचे भारतीय राजकारणात वेळोवेळी स्पष्ट झालेले आहे. बिहारमध्ये भाजपच्या जागा जास्त आल्या तरी मुख्यमंत्री जेडीयूचाच होईल, असे भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारच्या निवडणूक प्रचारदरम्यान स्पष्ट केले असले तरी जेडीयूला गाफील ठेवण्याची भाजपाची ही खेळी मानली जात आहे. अर्थात राजकारणात मुरब्बी असलेल्या जेडीयूचे सर्वेसर्वा नितीशकुमार यांना भाजपाची ही खेळी परिचित असणारच. भाजपाला बिहारमध्ये स्वबळावर सत्ता आणायची आहे. राज्यात क्रमांक एकवर पक्ष आणायचा आहे. बिहारात जेडीयूला शह देण्यासाठी व जेडीयूच्या संख्याबळात घट यावी यासाठी भाजपने बिहारमध्ये लोजपाचा वापर सुरू केले असल्याची चर्चा सुरू आहे. लोजपा हा भाजप व जेडीयूच्या युतीतून बाहेर पडला आहे. लोजपा भाजपवर काहीही टीका करत नसून केवळ जेडीयू आणि नितीशकुमारांवर टीका करत आहे. तसेच लोजपाने भाजपा उमेदवारांच्या विरोधात नाही तर केवळ जेडीयू व अन्य पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवार दिले आहेत, यातच भाजपची खेळी स्पष्टपणे दिसून येते. निवडणूक निकालानंतर संख्याबळ स्पष्ट झाल्यावर भाजपचा खरा चेहरा पुन्हा एकवार समोर येण्याची शक्यता आहे. जेडीयूला सत्तासंपादनात संख्याबळ कमी पडल्यास अथवा केवळ लोजपाला बरोबर सत्तासंपादनाचे संख्याबळ मिळाल्यास भाजपा कोणत्याही क्षणी जेडीयूची साथ सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बिहारचे निवडणूक समीकरण आजही आरजेडी, जेडीयू, भाजपा या तीन पक्षावरच अवलंबून असून लोजपा जेडीयूचे किती उमेदवार पाडतो आणि भाजपचे किती आमदार निवडून येतात यावरच भाजपचे बिहारातील सत्तासंपादनेची समीकरणे अवलंबून असणार आहे.
- सौ. सुवर्णा खांडगेपाटील
- संपादक : नवी मुंबई लाईव्ह.कॉम
- संपर्क : ९८२००९६५७३
- Navimumbailive.com@gmail.com