
स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ / ९८२००९६५७३
नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ मध्ये देशात तृतीय आणि राज्यात सर्वप्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेस लाभले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने आजवर प्रत्येक वर्षी आपले राष्ट्रीय मानांकन उंचावत नेलेले आहे. त्यामुळे ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ ला सामोरे जाताना महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून २ ऑक्टोबरला आयोजित विशेष कार्यक्रमात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘निश्चय केला – नंबर पहिला’ असा निर्धार जाहीर करीत देशातील प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे मानांकन प्राप्त करण्यासाठी नागरिकांच्या उत्स्फुर्त सहभागातून सज्ज असल्याचे जाहीर केले होते.
त्यानुसार ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ च्या अनुषंगाने करावयाच्या स्वच्छताविषयक विविध कामांचे नियोजन करण्यासाठी आयोजित केलेल्या विशेष बैठकीत आयुक्तांनी स्वच्छताविषयक विविध बाबींचा विस्तृतआढावा घेतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, प्रशासन व परिमंडळ १ उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परिमंडळ २ उपआयुक्त अमरिश पटनिगिरे, उद्यान उपआयुक्त मनोजकुमार महाले उपस्थित होते.
स्वच्छतेमध्ये देशातील मानांकन सतत उंचावणारे शहर म्हणून नवी मुंबई ओळखली जाते, त्यामुळे नवी मुंबईकडून सर्वांच्याच मोठ्या अपेक्षा असतात. त्यानुसार यावर्षीच्या सर्वेक्षणात अधिक जोमाने काम करण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणेने सज्ज होण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. त्याकरिता महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी विभागाविभागांमध्ये प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्वच्छताविषयक कामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
‘सर्वेक्षण ही परीक्षा असली तरी, स्वच्छता ही सवय व्हायला हवी’ असे आग्रहपूर्वक सांगत आयुक्तांनी स्वच्छता ही लोकसहभागाशिवाय शक्य नाही, त्यामुळे एकेका नागरिकाला स्वच्छतेचे महत्व पटण्यासाठी व ते त्याच्या कृतीत उतरण्यासाठी प्रभावी जनजागृती करावी आणि यातून स्वच्छता ही प्रत्येकाची सवय व्हावी यावर अधिक भर दिला जावा असे स्पष्ट केले.
कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी म्हणजे घरातूनच कचऱ्याचे नागरिकांकडून ओला, सुका व घरगुती घातक अशा ३ प्रकारे वर्गीकरण केले जाण्यावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे सांगत याकडे अधिक काटेकोर लक्ष देण्याची व नागरिकांमध्ये या अनुषंगाने जागरूकता निर्माण करण्यासाठी भरीव प्रयत्न करावेत असे आयुक्तांनी निर्देशित केले.
त्यासोबतच ओला कचरा निर्माण होतो, त्याच ठिकाणी नागरिकांकडून खत टोपली (Compost Basket) सारख्या साहित्याचा वापर करून खतनिर्मितीद्वारे कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणे, सार्वजनिक व सामुहिक शौचालये सुस्थितीत ठेवणे, गांवठाण व झोपडपट्टी भागातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष केंद्रीत करणे, सार्वजनिकरित्या कचरा टाकला जातो अशी ठिकाणे स्वच्छ व सुशोभित करून नागरिकांची मानसिकता बदलणे, तलावांची नियमित स्वच्छता राखणे, मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो अशा सोसायट्या, वसाहती, संस्था यांनी आपल्या आवारातच खत प्रकल्प राबविण्यासाठी १०० टक्के कार्यवाही करणे अशा विविध बाबींवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या.
कोव्हीड काळात स्वच्छतेला काहीसे दुय्यम महत्व दिले गेले. तथापि ता कोव्हीडची तीव्रता कमी होत असताना स्वच्छतेचा आरोग्याशी असलेला परस्परसंबंध लक्षात घेऊन यापुढीस काळात शहर स्वच्छतेकडे अधिक बारकाईने लक्ष देऊन स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिल्या नंबरचे ध्येय नजरेसमोर ठेवत जोमाने कामाला लागण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.