
नवी मुंबई : एमआयडीसी मंडळातील अनेक अधिकारी चांगले काम करीत आहेत परंतु
काही अधिकारी स्वतःच्या आणि ठराविक व्यक्तींच्या फायद्यासाठी नवी मुंबईच्या सार्वजनिक
सुविधांमध्ये बाधा आणत असून अशा प्रवृत्तींना लोकशाहीच्या चौकटीत जाब विचारण्यात येईल,असा
इशारा ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व ऐरोलीचे भाजपा आमदार गणेश नाईक यांनी दिला
आहे. एमआयडीसी भागातील समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी त्यांनी केली आहे.
लोकनेते गणेश नाईक यांनी मंगळवारी एमआयडीसीच्या महापे येथील विभागीय
कार्यालयास भेट दिली. विभागीय अधिकारी सतिष बागल यांच्याकडे औद्योगिक परिसरातील समस्या
इंत्यभूत मांडल्या. झोपडपट्यांमधून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवासी त्रस्त
आहेत, याकडे लक्ष वेधत पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सांगितले. झोपडपट्यांचा एसआरएच्या
माध्यमातून विकास करण्याची मागणी केली. हा विकास स्थानिक प्राधिकरणाच्या माध्यमातूनच
करावा. अनेकवेळा काही अधिकारी बांधकाम व्यावसायिकांच्या भल्यासाठी सार्वजनिक वाहतुकीस
किंवा इतर जन सुविधेस अडथळा ठरेल, अषाप्रकारे संगणमताने भुखंडांचे प्लॉटिंग करतात.
हे थांबायला हवे असे स्पष्ट करताना एमआयडीसीकडून मिळणारे नागरी सुविधा भुखंड नवी मुंबई
महापालिका बगिचे, रिक्षा स्टॅन्ड, स्वच्छतागृहे इत्यादी नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी
उपयोगात आणते. त्यामुळे सुविधा भुखंडांचे हस्तांतरण एमआयडीसीने नवी मुंबई महापालिकेला
विनामुल्य करावे, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी केली. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमधून
प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने नोकरी रोजगार उपलब्ध करून देण्याची सुचना त्यांनी एमआयडीसीच्या
अधिकाऱ्यांना बैठकीत केली. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना महिन्यातून एकदा लोकनेते आ. गणेश
नाईक भेटणार असून केलेल्या मागण्यांवर किती कार्यवाही झाली याचा पाठपुरावा नियमितपणे
करणार आहेत. प्रामुख्याने औद्योगिक भागांना पाणी पुरवठा करण्यासाठी एमआयडीसीने बारवी
धरण बांधले. हे धरण एका महापालिकेला देण्याचे घाटत असल्याचे आ.गणेश नाईक यांनी सांगितले.
बारवी धरणातून नवी मुंबई महापालिकेच्या वाट्याचा पाणीकोटा कमी करण्याचा प्रयत्न झाल्यास
रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा देखील लोकनेते आ. गणेश नाईक यांनी दिला. एमआयडीसी
भागात अनेक ट्रक आणि केमिकलसह इतर माल वाहतुक करणारे टॅंकर शेकडोच्या संख्येने येत
असतात. ते कुठेही थांबत असल्याने वाहतुककोंडी होत असते. यावर उपाय म्हणून एमआयडीसीने
या वाहनांसाठी स्वतंत्र टर्मिनल बांधावेत. एमआयडीसीकडे असलेले भुखंड वाणिज्यिक वापरासाठी
न ठेवता लोक सुविधांसाठी त्यांचा वापर करावा, अशी सुचना लोकनेते गणेश नाईक यांनी एमआयडीसीच्या
अधिकाऱ्यांना केली. गणेश नाईक यांनी मांडलेल्या समस्यांवर निश्चितच तोडगा काढू, असे
आश्वासन विभागीय अधिकारी बागल यांनी दिले आहे. एमएमआरडीएच्या निर्माणाधिन ऐरोली काटई
या उडडाणपूलाच्या कामाची देखील लोकनेते गणेश नाईक यांनी पाहणी केली. यावेळी एमएमआरडीएचे
अधिक्षक अभियंता प्रकाश भांगरे, तांत्रिक सल्लागार आकार अभिनवचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना
प्रकल्पाच्या प्रगतीबददल सविस्तर माहिती दिली. मुंबईतून नवी मुंबईमार्गे कल्याण-डोंबिवलीकडे
जाण्यासाठी आणि परतीच्या प्रवासासाठी हा मार्ग उपयुक्त असल्याचे मत आमदार गणेश नाईक
यांनी नोंदवले. आपल्या आमदार पदाच्या कार्यकाळात माजी आमदार संदीप नाईक यांनी या मार्गावर
नवी मुंबईसाठी चढणे आणि उतरण्यासाठी मार्गिका ठेवण्याची महत्वाची सुचना केली होती.
त्यानुसार ही सोय एमएमआरडीएने केल्याची माहिती अधिक्षक अभियंता भांगरे यांनी दिली.
ठाणे बेलापूर मार्गावरील प्रवास अधिक गतीमान व्हावा यासाठी आ. गणेश नाईक यांनी हा मार्ग
सिग्लनविरहित करण्याची संकल्पना मांडली आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून या मार्गावर
दोन उडडाणपूल आणि एक भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. पूर्वीचा ठाणे ते वाशी
हा तासभराचा प्रवास आता २० ते २५ मिनिटांवर आला आहे. हा प्रवास अधिक गतीमान आणि सुरक्षित
करण्यासाठी हा मार्ग सिग्लनविरहीत करण्याची सुचना नाईक यांनी केली असता त्यास एमएमआरडीएचे तांत्रिक सल्लागार आकार अभिनव
तसेच अधिक्षक अभियंता भांगरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ऐरोली दिवा गाव येथील
जैवविविधता केंद्राला देखील आमदार गणेश नाईक यांनी भेट देवून हे पर्यटन स्थळ अधिक विकसित
करण्यासाठी काय सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत याचा आढावा त्यांनी घेतला. या ठिकाणी
असलेल्या जेटटीची पाहणी केली. या ठिकाणी स्थानिक कोळी, आगरी, बांधवांचा पारंपारिक वहिवाटीचा
अधिकार, दशक्रिया संबधीचे विधीचा अधिकार इत्यादींवर रोख आणता कामा नये, अशी भुमिका
त्यांनी कांदळवन अधिकाऱ्यांसमोर मांडली. त्यास वन अधिकाऱ्यांनी होकार दर्शविला. ऐरोलीतील
होल्डिंग पॉण्डमध्ये उडडाणपुलाच्या खांबासाठी भराव टाकल्याची तक्रार स्थानिक माजी नगरसेवक
अशोक पाटील आणि पर्यावरण प्रेमींनी नाईक यांच्याकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने
नाईक यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता पर्यावरण खात्याने या कामासाठी
ठेकेदाराला परवानगी दिल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र पिलरचे काम पूर्ण झाल्यावर
हा भराव काढण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले. पिलरचे काम झाल्यावर हा भराव
काढून टाकण्यात येईल, होल्डिंग पॉन्डची साफसफाई करण्यात येईल, याबाबतचे लेखी आश्वासन
देण्याची सुचना नाईक यांनी केली असता अधिकाऱ्यांनी ती मान्य केली.मंगळवारच्या दौरा
प्रसंगी आ. नाईक यांच्या समवेत माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे,
माजी महापौर सागर नाईक, ज्येष्ठ नगरसेवक अंनत सुतार, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत
आणि माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी नगरसेवक
चद्रंकांत पाटील, माजी नगरसेवक नविन गवते, माजी नगरसेवक राम आशिष यादव माजी नगरसेवक शशिकांत भोईर, माजी
नगरसेवक अमित मेढकर, समाजसेवक विकास झिजांड, समाजसेवक सुरेश पाल, गणेश मेढकर आदींनी
एमआयडीसी संबंधात आपल्या प्रभागांतील समस्या आ. गणेश नाईक यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांसमोर
मांडल्या.