नवी मुंबई : बेलापु्रच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे कडवट समर्थक असणारे समाजसेवक पांडुरंग आमले यांनी प्रभाग ७६च्या रहीवाशांकरिता उपयुक्त ठरेल अशा पध्दतीने बनविलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे झालेल्या दिनदर्शिका सोहळ्यात आमदार मंदाताई म्हात्रे यांनी कोरोना महामारीच्या काळात पांडुरंग आमले यांनी सर्वच आघाड्यांवर उल्लेखनीय कार्य केल्याचे सांगत आमले यांच्या कार्याची प्रशंसा केली.
यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ जगताप, सानपाडा-जुईनगर मंडळ अध्यक्ष डॉ. श्रीमंत जगताप, भाजपा तालुका सरचिटणिस रमेश शेटे, निलेश वर्पे, तालुका मंडळ उपाध्यक्ष पंकज दळवी, मंडळ सचिव चंद्रकांत सरनौबत, तालुका महिला मोर्चा मंडळ अध्यक्षा आज्ञा गव्हाणे, महिला मोर्चाच्या मंडळ महामंत्री प्रियंका वाडगये, मंडळा तालुका सचिव सुलोचना निंबाळकर, समाजसेवक सुनील नाईक यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
या दिनदर्शिकेच्या माध्यमातून कोरोना काळात प्रभाग ७६च्या रहीवाशांसाठी व सानपाडा विभागातील अन्य रहीवाशांसाठी केलेल्या कार्याची माहिती भाजपाच्या पांडुरंग आमले यांनी स्थानिक रहीवाशांना देण्याचा प्रयत्न केला आहे. काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळालाच पाहिजे, नि:स्वार्थीपणे लोकांसाठी अहोरात्र कार्य करणारा कार्यकर्ता जर नगरसेवक झाला तर विभागातील नागरी समस्या सुटण्यास वेळ लागत नाही व सुविधांच्या उपलब्धतेतून परिसराचे नंदनवन होण्यास फारसा वेळ लागणार नसल्याचे सांगताना भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी एकप्रकारे प्रभाग ७६चा भाजपाचा उमेदवारच जाहिर केला असल्याची चर्चा स्थानिक रहीवाशांमध्ये सुरू झाली आहे. प्रभाग ७६ मध्ये घरोघरी जावून दिनदर्शिकेचे वितरण करताना रहीवाशांना आपण नववर्षाच्या शुभेच्छा देणार असल्याची माहिती यावेळी पांडुरंग आमले यांनी दिली.