संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२०००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com
– Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : उद्यानांची नियमित स्वच्छता आणि देखभाल तसेच तातडीने आवश्यक दुरूस्ती या महत्वाच्या बाबींची दक्षता घेत उद्यान सहाय्यकांनी आपापल्या क्षेत्रातील उद्यानांची स्थिती सुधारण्याकडे बारकाईने लक्ष द्यावे, त्यासाठी दररोज उद्यानांना भेटी द्याव्यात व आवश्यक सुधारणा करून घ्याव्यात असे निर्देश देत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यापुढील काळात उद्यानांची स्थिती पाहण्यासाठी कुठेही अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार असून कामात निष्काळजीपणा आढळल्यास जबाबदारी निश्चित करण्यात येईल असे स्पष्ट संकेत दिले.
उद्यान विभागाच्या १६ डिसेंबर रोजीच्या बैठकीत दिलेल्या निर्देशांचा आढावा घेताना प्रत्येक ठिकाणची आधीची व आत्ताची छायाचित्रे पाहून आयुक्तांनी सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती जाणून घेतली. या आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, उद्यान उप आयुक्त मनोज महाले, उद्यान सहाय्यक आयुक्त अनंत जाधव तसेच सर्व विभागांचे उद्यान सहाय्यक उपस्थित होते.
प्रत्येक काम करताना आपले त्या कामाशी असलेल्या उत्तरदायित्वाची जाणीव ठेवली पाहिजे. उद्यानांची स्वच्छता व देखभाल दुरुस्ती तत्परतेने झालीच पाहीजे अशाप्रकारे काम करावे अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. लेखी अथवा सोशल मिडीयावरून प्राप्त झालेल्या तक्रारींचे निवारण २४ तासापेक्षा कमी वेळेत झालेच पाहिजे व तक्रार प्राप्त झाल्यानंतर १ तासात त्याठिकाणी पोहचलेच पाहिजे असे कडक निर्देशही त्यांनी दिले.
कंत्राटदाराकडून व त्याच्या कामगांराकडून काम करून घेणे ही आपली जबाबदारी आहे असे उद्यान सहाय्यकांना सूचित करण्यात आले. सध्या उद्यानाच्या कामासाठी उपयोगात असलेल्या ॲपमध्ये उद्यान सहाय्यकाने दाखल केलेल्या तक्रारींबाबत कंत्राटदाराकडून तक्रार निवारण झाले नसले तरी निवारण केल्याचे दाखविले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. ही नोंद चुकीची असल्याचे नमूद करण्याचा पर्याय ॲपवर उपलब्ध असणे आवश्यक आहे. तशा प्रकारचा बदल ॲपमध्ये करून घेण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले.
आपल्या उद्यानांना पूर्वीपेक्षा अधिक आकर्षकता प्राप्त करून देणे हे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून काम करताना उद्यानांची केवळ नियमित देखभाल व दुरुस्ती यापुढे जात उद्यानातील हिरवळ, झाडे आवश्यकतेनुसार पुनर्जिवित करण्यावर भर द्यावा अशाही सूचना आयुक्तांनी केल्या. सध्या बंद असलेल्या उद्यानांचा आढावा घेऊन ती कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करावे तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व उद्यानांची वेळ समान असावी व ती ठळकपणे प्रदर्शित करावी असे आयुक्तांनी सूचित केले.
जास्त वर्दळ असणाऱ्या उद्यानांकडे विशेष लक्ष द्यावे असे निर्देश देत उद्यानांप्रमाणेच शहरातील सुशोभित जागा, चौक यांच्याही सुशोभिकरणाकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यामध्ये विशेषत्वाने चौकांमध्ये लावण्यात आलेली वृक्षरोपे, फुलझाडे यांची सलगता मधली काही फुलझाडे नसली तर खंडीत झाल्यासारखी विशोभित दिसते. त्याठिकाणी तशीच वृक्षरोपे लावून गॅप फिलींग करून शोभा वाढविण्यावर भर देण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. उद्यान उप आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनीही विविध उद्यानांना दररोज भेटी द्याव्यात आणि त्यांचे स्वरुप चांगले होण्यासाठी सूचना कराव्यात तसेच सूचनांच्या पूर्ततेवर बारकाईने लक्ष द्यावे असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले, उद्याने ही शहराचे वैभव असल्याने उद्यान विभागातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून झोकून देऊन काम करावे व उद्यानांच्या स्थितीत आमुलाग्र सुधारणा घडवून आणावी असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सूचित केले.