भारतीय लोकशाहीचा इतिहास चाळला असता आयाराम-गयाराम संस्कृती पहावयास मिळते. राजकारणात आता निष्ठा, श्रध्दा हा भाग आता गौण झाला असून पदासाठी, अर्थकारणासाठी राजकीय वाऱ्याचा अंदाज बांधत आयाराम-गयाराम संस्कृतीचे अस्तित्व राजकीय सारीपाटावर पहावयास मिळते. १९५२ साली आपल्या देशामध्ये सार्वत्रिक निवडणूकांना सुरूवात झाल्यानंतर अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीतच आयाराम-गयाराम पर्व सुरू झाले आहे. अर्थात आयाराम-गयाराम नाट्यामागे स्वार्थ अथवा राजकीय अस्तित्वाचा भाग असला तरी त्यास मतभेद, तात्विक वाद, जनसेवा आदी शब्दांचा मुलामा देत मतदारांची तसेच लोकांची सर्रासपणे दिशाभूल करण्याचाच एक भाग असतो. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणूकीचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. वास्तविकपणे नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल २०२० मध्येच होणार होती. परंतु कोरोनासारख्या जागतिक महामारीने जगभरात तांडव नृत्य करण्यास जानेवारीच्या सुरूवातीपासून सुरूवात केली. त्या तांडव नृत्याचे पडघम नवी मुंबई शहरावर उमटले. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जवळपास आता आठ महिने झालेली नाही. परंतु आता कोणत्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होण्याच्या हालचाली सुरू झाल्याने निवडणूक कार्यक्रम जाहिर होण्याचे सावट आता नवी मुंबई शहरावर दिसू लागले आहे. दोनच दिवसापूर्वी नवी मुंबईतील दिघा परिसरातील भाजपच्या तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय आयाराम-गयाराम संस्कृती येत्या महिनाभरात जोरदारपणे उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिघ्यातील तीन नगरसेवक जाताच भाजपामधून अजून किमान १५ ते २० नगरसेवक फुटणार असल्याच्या चावडी गप्पा जोरदारपणे सुरु झाल्या असल्याने सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर उघडपणे चिंतेचे सावट दिसू लागले आहे. घणसोली कॉलनीतील माथाडी चळवळीशी संबंधित असलेला पाटील परिवार लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार, भिमाशंकरच्या सावलीत पालिका राजकारणात नावारूपाला आलेला एक घटकही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या छावणीत प्रवेश करणार असल्याचीही चावडी गप्पा जोरदार रंगू लागल्या आहेत. त्यातच मोठी खळबळजनक चावडी अफवा म्हणजे महापौरपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेली व गेल्या काही महिन्यापासून महापौरपदाच्या खुर्चीकडे नेत्र लावून बसलेली महिला राजकारणीही निवडणूक लढविण्यासाठी प्रभागच नसल्याचे लवकरच शिवबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. अर्थात या चावडी गप्पा खऱ्याच ठरतात असे नाही. प्रत्येकाने आपल्या राजकीय आकलनानुसार राजकीय चावडीवर गप्पा मारताना बांधलेले ते ‘एक’ निष्कर्ष असतात. मात्र चावडी गप्पामधून राजकीय बदलाचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहे, याचे आकलन होण्यास मदत होत असते. नवी मुंबईचे बलाढ्य राजकीय प्रस्थ असणाऱ्या गणेश नाईकांनी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यावेळी अर्धशतकाहून अधिक नगरसेवकांचे पाठबळ त्यांच्याकडे होते. त्यानंतर नाईकांसाठी आजवर तुर्भ्याच्या गडाची रखवालीदारी करणारा कुलकर्णी परिवार कमळाची साथ सोडून शिवबंधनात अडकला. अर्थात नाईकांसाठी हा नवीन धक्का नाही. विजय चौगुले, एम.के.मढवी यांच्यासह अनेक मातब्बर नाईकांच्या छावणीतील एकेकाळचे मातब्बर, कालपरत्वे नाईकांची साथ सोडून अन्य राजकीय वाटचालीशी समरस झाले. त्यातून नाईकांच्या साम्राज्याला तडे गेले अथवा खिंडार पडले, असा कोणताही प्रकार घडला नाही. राजकीय सारीपाटावर भरती-ओहोटी ही येतच असते. ओहोटी व भरतीची तीव्रता ही जनाधारावर अवलंबून असते. लोकसभा अथवा विधानसभा निवडणूकीत नाईकांवरील नवी मुंबईचे प्रेम कमी-जास्त झाले असले तरी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत नवी मुंबईकरांनी गणेश नाईकांच्या नेतृत्वावर भरभरून प्रेम करताना केवळ आणि केवळ गणेश नाईकांच्या नेतृत्वाखालीच नवी मुंबई महानगरपालिकेचा पर्यायाने नवी मुंबई शहराचा कारभार चालेल याची काळजी घेतलेली १९९५ सालापासून झालेल्या सार्वत्रिक निवडणूकांपासून पहावयास मिळत आहे. नाईकांच्या छावणीत अनेक सरदार आले आणि गेले. परंतु नवी मुंबई महापालिका नाईकांपासून हिरावून घेण्यात आजतागायत कोणालाही यश मिळालेले नाही. सध्या महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लवकरच लढविली जाणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉग्रेसच्या एकत्रित नेतृत्वाखाली निवडणूक लढण्याची महाविकास आघाडीकडून जंगी तयारीही गेल्या काही महिन्यापासून केली जात आहे. महाविकास आघाडीला महापालिकेवर सत्ता काबीज करताना भाजपाचे पर्यायाने गणेश नाईकांचे राजकीय वर्चस्व संपुष्ठात आणायचे आहे. त्यासाठीच इतका खटाटोप नवी मुंबई पातळीवर महाविकास आघाडीतील राजकीय रथी-महारथींकडून सुरू झालेला आहे. सत्ताधारी भाजपचे नगरसेवक फोडून आगामी महापालिकेत आपले संख्याबळ वाढविण्यासाठी महाविकास आघाडीचे काही घटक पडद्याआडून जोरदार प्रयत्न करू लागले आहेत. दिघा व तुर्भेचा गड शिवबंधनात समाविष्ट झाल्याने शिवसेनेच्या छावणीत पर्यायाने महाविकास आघाडीच्या छावणीत उत्साहाचे वारे संचारू लागले आहेत. तसेच भाजपच्या काही नगरसेवकांनी खासगीत संभाषण करताना राष्ट्रवादीचा पुन्हा पान्हा फुटू लागल्याने घड्याळाची टीकटीक वाढण्याची शक्यता वाढीस लागली आहे. परंतु राजकारणात कधीही काहीही होवू शकते. नाईक परिवार हा नवी मुंबईत गेली काही दशके नवी मुंबईकरांच्या गळ्यातील ताईत आहे. फिनिक्स पक्षाप्रमाणे यापूर्वीही नवी मुंबईच्या राजकारणात नाईक परिवाराने गरूडभरारी मारल्याचे नवी मुंबईकरांनी जवळून पाहिले आहे, अनुभवले आहे. नाईकांना भाजपा या एकाच संघटनेतील नाराजांची समजूत काढावी लागणार आहे? पण महाविकास आघाडीचे काय? महापालिका निवडणूका लढविणे हे संघटनेतील तळागाळातील कार्यकर्त्याचे स्वप्न असते. त्यासाठी पाच वर्षे ते आपल्या घराकडे, घरातील सदस्यांकडे फारसे लक्ष न देता जनसेवेमध्ये स्वत:ला झोकून देत असतात. स्वत:चा नावलौकीक वाढविताना पक्षाचा जनाधार वाढविण्याचे कार्य तळागाळातील प्रमुख कार्यकर्ते करत असतात. महापालिका निवडणूक लढवून नगरसेवक बनणे ही त्यांची महत्वाकांक्षा असते. त्यात महाविकास आघाडी एकत्रित आल्यामुळे तीन पक्षांपैकी कोणातरी एकाच पक्षाच्या उमेदवाराला निवडणूक लढविण्याची संधी मिळणार आहे. एकाच पक्षात एकाला तिकिट मिळाल्यावर उर्वरित इच्छूक नाराज होतात. ते बंडखोरी करतात, इतर पक्षातून निवडणूक लढविण्यासाठी चाचपणी करतात अथवा इतर पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी व आपल्या पक्षाचा उमेदवार पाडण्यासाठी कार्यरत होतात. मग अशावेळी तीन पक्षाच्या इच्छूक मातब्बरांची नाराजी काढण्यात त्यांच्या नेतेमंडळींना कितपत यश येईल, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. भाजपामधून मातब्बरांचा ओघ महाविकास आघाडीच्या दिशेने जावू लागल्याने आयाराम प्रस्थापितांना निवडणूकीचे तिकिट फायनल झाल्यातच जमा असते. यामुळे भाजपला पर्यायाने नवी मुंबई भाजपच्या महापालिका निवडणूकीची सूत्रे सांभाळणाऱ्या नाईक परिवाराला एका एका जागेसाठी तब्बल तीन पक्षातील मातब्बरांमधून कोणा एकाला निवडण्याची संधी उपलब्ध झालेली असणार. मार्च महिन्याच्या अखेरिस अथवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या मध्यावर नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीची आचारसंहिता लागणार असल्याचे महापालिका मुख्यालयात बोलले जात आहे. कोरोना काळात नवी मुंबई शहरात सर्वाधिक कार्य नाईक परिवाराने पर्यायाने भाजपाने केलेले आहे. नाईक परिवाराखालोखाल नाईकांच्या समर्थकांनी पर्यायाने भाजपच्या माजी नगरसेवकांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी प्रभागाप्रभागात कार्य केले आहे. त्याखालोखाल शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी कोरोना काळात कार्य केले आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात नवी मुंबईकरांना मदतीचा हातभार देताना पुढाकार घेणाऱ्या विजय नाहटा यांनी शिवसेनेची तळागाळातील खरी ताकद असणाऱ्या नवी मुंबई शिवसेनेतील शाखाप्रमुखांनाही दर महिन्याला आर्थिक मदत करताना नाहटांनी एकप्रकारे संघटनात्मक जबाबदारीचे पालन करताना उपनेतेपदाला न्याय देताना नाहटा यांनी या कार्याचा फारसा गाजावाजा केलेला नाही, हे उल्लेखनीय आहे. भाजपाच्या बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनीही धान्यापासून जेवणाचे डब्बे पुरविण्याचे कार्य करताना एका मातृतुल्य राजकारणी महिलेचे दर्शन यानिमित्ताने नवी मुंबईकरांना घडवून आणले. भाजप व शिवसेनेच्या तुलनेत कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे कार्य कोरोना काळात फारसे प्रभावी नसल्याचे पहावयास मिळाले आहे. महापालिका निवडणूकीच्या आचारसंहितेचे बिगुल वाजण्यापूर्वीच आयाराम-गयाराम नाट्याचा प्रयोग सुरू झाला आहे. भाजपाच्या छावणीतील संदीप नाईकरूपी दुरदृष्टी असणारे प्रगल्भ नेतृत्व या घडामोडी शांतपणे पाहत आहे. हे नेतृत्व कधीही आपल्या कामाचा गाजावाजा करत नाही. कोरोना काळात सर्वाधिक धान्याचे वाटप संदीप नाईकांच्याच मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली झालेले आहे. कोरोना काळात परप्रांतिय ज्यावेळी त्यांच्या मुळगावी जात होते, त्यातील अधिकाधिक लोकांना चार माणसांचे जेवण पुरेल असे जेवणाचे डब्बे उपलब्ध करून देण्याचे कार्यही संदीप नाईकांनी केलेले आहे. पण या कार्याबाबत एकही ओळ वर्तमानपत्रात छापून येणार नाही अथवा एकही फोटो प्रकाशित होणार नाही याची संदीप नाईकांनी काटेकोरपणे काळजी घेत आपल्या नि:स्वार्थी जनसेवेला प्रसिध्दी कधी मिळवून दिली नाही. कोरोनाचा उद्रेक वाढला, त्यावेळी रसायनी येथील कोरोना सेंटरमध्ये महिला रूग्णांची परिस्थिती भयावह बनली होती. मासिक पाळीच्या वेळी वापरावयाचे वस्त्रही त्यांच्याकडे घाईगडबडीत न्यावयास विसरल्यामुळे नव्हते. अशा किमान ३० ते ३५ महिलांची रसायनी येथील कोव्हिड सेंटरमध्ये समस्या निर्माण झाली. अशावेळी संदीप नाईकांच्या नेरूळमधील एका सर्वसामान्य मित्राला रात्रीच्या वेळी ही परिस्थिती समजली. त्या मित्राने संदीप नाईकांना फोन करून उठवून ही कल्पना दिली. अशावेळी कोणत्याही नगरसेवकाला अथवा पदाधिकाऱ्याला संदीप नाईकांनी सूचना केली नाही. स्वत: साधी गाडी चालवित त्या नेरूळमधील आपल्या गरीब मित्राला घेवून नेरूळच्याच एका मेडीकलमधून किमान १०० महिलांना पुरेल इतके महिलांसाठी संबंधित वस्त्र साहित्याची खरेदी करून संदीप नाईक रसायनीला गेले व स्वत: गाडीतून न उतरता आपल्या मित्रांसमवेत ते साहीत्य संबंधित महिलांना पाठवून दिले. याही गोष्टीचा संदीप नाईकांनी कधी गाजावाजा केला नाही अथवा प्रसिध्दीचा आधार घेतला नाही. त्यामुळे ज्या ज्या प्रभागात भाजपातून गयाराम तिकडचे आयाराम झाले आहेत, त्या तेथील अनेक नाराज मातब्बर संदीप नाईकांना स्वत:हून संपर्क साधू लागले आहेत. त्यामुळे काही नगरसेवक गेल्यानंतरही संदीप नाईकांची संयमी मुद्रा नवी मुंबईच्या राजकारणातील वादळाची चाहूल स्पष्टपणे दाखवित आहे. संदीप नाईकांचे आपल्या वडीलांवर म्हणजेच लोकनेते गणेश नाईकांवर बेफाम प्रेम. नाईकसाहेबांच्या चेहऱ्यावर हास्य दिसावे हीच संदीप नाईकांच्या जीवनाची महत्वाकांक्षा आहे. महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवून नाईकसाहेबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी संदीप नाईकांच्याही निश्चितच पडद्याआडून हालचाली गतीमान झाल्या असणार. आता लवकरच आयाराम-गयारामाच्या घटना वाढतील. केवळ आचारसंहिता जाहीर झाल्यावरच नाहीतर निवडणूकीचा एबी अर्ज भेटेपर्यत आयाराम-गयारामाच्या हालचाली सुरूच राहतील. बिगुल वाजल्यावर निवडणूकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. तोपर्यत चाचपणी होतच राहणार आणि आयाराम-गयारामांच्या हालचालीही वाढतच राहणार.
- संदीप खांडगेपाटील…