संदीपखांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२०००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
पनवेल : मुलींसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मंगळवारी शहरासह जिल्ह्यातील विविध संघटनांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल येथील कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेली माजी आदर्श नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, माजी नगरसेविका अनुराधा ठोकल, माजी सभापती काशीनाथ पाटिल, नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, सारिका भगत उपस्थित होते.
१८ व्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची जयंती पनवेलमध्ये साजरी करण्यात आली. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे दाम्पत्य १८ व्या शतकात समाजाचा मोठा विरोध पत्कारत स्त्री-शिक्षणासाठी केलेल्या कार्यासाठी ओळखले जाते. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला. भारतातील पहिली महिला शिक्षिका होण्याच आणि शिक्षित महिला होण्याचाही मान सावित्रीबाई फुले यांना जातो. आपल्या शाळेत प्रामुख्याने त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलींना शिक्षण दिले. केवळ महिला शिक्षिका म्हणूनच सावित्रीबाई फुले यांचे कार्य महान नाही. तर जवळपास दीडशे वर्षांपूर्वी त्यांनी स्त्री-पुरुष समानतेचा हक्क मिळावा यासाठी आग्रही भूमिका मांडली होती. स्त्रीभ्रूणहत्या रोखणे आणि इतरही सामाजिक सुधारणांसाठी सावित्रीबाई यांनी निकराचे प्रयत्न केले.
सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या ९ व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्यांचे पती ज्योतिबा फुले हे थोर समाजसुधारक आणि लेखक होते. ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरत देशाला वेगळी दिशा दिली. त्यासाठी त्यांनी १८५४ मध्ये एक शाळा काढली. या शाळेचे वैशिष्ट्य असे की, ही शाळा भारतातील महिलांसाठी सुरु झालेली पहिली शाळा होती. या शाळेत शिकवण्यासाठी त्यांना शिक्षक मिळाला नाही. त्यामुळे ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांनाच प्रथम शिक्षण दिले आणि या शाळेत शिक्षिका म्हणून उभे केले.