नवी मुंबई : नवी मुंबई पालिका प्रशासनात काम करणाऱ्या मूषक नियत्रंण कामगारांचे दोन महिन्याचे थकीत वेतन तातडीने देण्याची मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे. याच संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही लेखी निवेदन देताना वारंवार मुषक नियत्रंण कामगारांचे वेतन विलंबाने होत असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनात कंत्राटी पध्दतीने सुमारे ७५ मुषक नियत्रंण कामगार काम करत आहे. आज जानेवारी महिन्याची ५ तारीख संपली तरी या मूषक नियत्रंण कामगारांचे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे वेतन झालेले नाही. कोरोना काळात या कामगारांनी घरी न बसता मूषक नियत्रंणात ठेवण्याची व दररोज कामावर येवून प्रशासनाला सहकार्य करण्याची कामगिरी केली आहे. एकतर मुषक नियत्रंण कामगारांचे वेतनही तुटपुंजेच आहे. महागाईच्या काळात या कामगारांना वेतन विलंबाने देणे अडीच हजार कोटी रूपयांच्या ठेवी असणाऱ्या महापालिका प्रशासनाला भूषणावह बाब नाही. विशेष म्हणजे मूषक नियत्रंण कामगार काम करत असताना त्यांच्यासमवेत फोटो काढणारे राजकारणी त्यांच्या थकीत वेतनाबाबत कधीही पालिका प्रशासनाला जाब विचारत नाही, ही शरमेची संतापजनक बाब आहे. याप्रकरणी नवी मुंबई महानगरपालिकेतील संबंधितांना मूषक नियत्रंण कामगारांचे दोन महिन्याचे थकीत वेतन तातडीने देण्याचे निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे व राज्य सरकारकडे केली आहे.