प्राजक्ता वाघमारे
नवी मुंबई : प्रभाग ८६ मधील सारसोळे व नेरूळ सेक्टर सहामधील मार्गफलकांची दुरावस्था दूर करून डागडूजी तसेच सुशोभीकरण करण्याची मागणी सारसोळे गावचे ग्रामस्थ व महापालिका ‘ब’ प्रभाग समितीचे माजी सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.महापालिका प्रभाग ८६ मध्ये सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसराचा समावेश होत आहे. या परिसरात आपण अंर्तगत भागातील रस्त्यावर तसेच चौकात फिरल्यास येथील मार्गफलकांची पूर्णपणे दुरावस्था झालेली असून त्या ठिकाणी बकालपणा आलेला आहे. मार्गफलकावरील माहिती असणाऱ्या पाट्या नाहीशा झाल्या असून केवळ चौथरेच पहावयास मिळतात. अनेक ठिकाणचे चौथरेही तुटलेले आहेत. अन्य सेक्टर व गावांमध्ये नव्याने स्टील रॉड व फायबरमध्ये मार्गफलक बसविण्यात आले आहेत. मग प्रभाग ८६ मधील सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरात अशा प्रकारे मार्गफलक का बसविण्यात आले नाहीत. अनेक वर्षापासून मार्गफलकांची दुरावस्था असतानाही पालिका प्रशासनाकडून डागडूजी तसेच सुशोभीकरण करण्यात आलेले नाही. यासंदर्भात विभाग कार्यालयात १३ ऑक्टोबर २०२० रोजी निवेदनही सादर केलेले आहे. तथापि प्रशासनाकडून या पत्राची दखल न घेण्यात आल्याने पुन्हा समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून देण्यासाठी हा पत्रव्यवहार करत असल्याचे मनोज मेहेर यांनी निवेदनात म्हटले आहे.