नवी मुंबई : सानपाडा सेक्टर १५ मधील एका गृहनिर्माण सोसायटीतील अंर्तगत वादाला राजकीय झालर लागली असून यामुळे भाजपातील अंर्तगत वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. सोसायटीतील कामासंदर्भात निबंधकांकडे तक्रारीवरून भाजपाच्या वॉर्ड अध्यक्षाला भाजपाकडून महापालिका निवडणूक लढवू पाहणाऱ्या प्रबळ इच्छूकांकडून बघून घेण्याची धमकी देण्यात आली आहे. भाजपा वॉर्ड अध्यक्षांनी याप्रकरणी सानपाडा पोलिस ठाण्यात भाजपाकडून निवडणूक लढवू पाहणाऱ्या इच्छूकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपाचा संबंधित वॉर्ड अध्यक्षांनी वयाची सत्तरी उलटली असून वॉर्ड अध्यक्ष हे बेलापुरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे गेल्या अनेक वर्षापासून कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात आहेत.
सानपाडा पामबीच भागातील भुमीराज अॅबोड गृहनिर्माण सोसायटीतील अंर्तगत वादामुळे भाजपामध्येच गृहकलह उफाळून येण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणामुळे समर्थकांसाठी नेतेमंडळीतच संघर्ष होण्याची भीती आता भाजपा कार्यकर्त्याकडून व्यक्त केली जात आहे.
भुमीराज अॅबोड या गृहनिर्माण सोसायटीतील रिपेरिंग व पेण्टींग कामाबाबत सोसायटीतील रहीवाशी श्रीपाद पत्की (वय वर्षे ७३) यांनी उपनिबंधकाकडे तक्रार केली होती. श्रीपाद पत्की हे सानपाडा पामबीच भागातील सुपरिचित व्यक्तिमत्त्व असून पामबीच भागातील ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सचिव आहेत. परिसरात त्यांनी मोठ्या प्रमाणावर सातत्याने वृक्षारोपणही केले आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी गरीब मुलांना शिकविण्याचे कार्यही केले आहे. ते भाजपाचे प्रभाग ७७ चे वॉर्ड अध्यक्ष असून परिसरातील रहीवाशांमध्ये त्यांची एक चांगली प्रतिमा आहे. श्रीपाद पत्की हे गेल्या अनेक वर्षापासून बेलापुरच्या भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे निकटवर्तीय समर्थक म्हणूनही सानपाडा परिसरात प्रसिध्द आहेत.
श्रीपाद पत्की यांनी गृहनिर्माण सोसायटीतील कामकाजाबाबत केलेल्या तक्रारीवरून उपनिबंधक सुनावणीसाठी सोसायटी आवारात आले असता सोसायटीचे अध्यक्ष भाऊ भापकर आणि सोसायटीचे सचिव साहेबराव भांगरे यांनी पत्की व त्यांच्या मुलाला श्रीकांत पत्की यांना ‘आता तुम्हाला वैयक्तिक पाहून घेतो’ अशी धमकी दिली असल्याचे सांगत पत्की यांनी भापकर आणि भांगरे यांच्याविरोधात सानपाडा पोलिस ठाण्यात तक्रारही (एनसी) दाखल केली आहे. यावेळी श्रीकांत पत्की यांनी भाऊ भापकर यांनी यापूर्वीही आपणास फोन करून पकडून मारणार असल्याची धमकी दिल्याचे सांगितले. अशा माणसाला नगरसेवक केल्यास जगणे अवघड होवून बसणार असल्याची भीती श्रीकांत पत्की यांनी व्यक्त केली.
भाऊ भापकर हे देखील गेली काही वर्षे राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी काही महिन्यापूर्वीच शिवसेनेतून भाजपात प्रवेश केला आहे. भापकर हे प्रभाग ७५ मधून भाजपकडून निवडणूक लढविण्यास उत्सूक आहेत. तथापि पत्की यांच्याशी झालेल्या वादामुळे तसेच पत्की हे भाजपाच्या स्थानिक आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे समर्थक आहेत व भाजपाचे वॉर्ड अध्यक्षही आहेत. सोसायटी आवारातील कार्यकर्त्यामधील वाद आता भाजपाच्या वरिष्ठ नेतेमंडळीसाठी प्रतिष्ठेचा विषय बनण्याची शक्यता भाजपात व्यक्त केली जात आहे.